Savadhan's Blog


वाहनांचे भोंगे-हॉर्न(HORN) म्हणजे ध्वनीप्रदूषण——!!

Posted in मराठीप्रेमी,social by savadhan on 20/06/2010
Tags: , ,

वाहनांचे भोंगे-हॉर्न(HORN) म्हणजे ध्वनीप्रदूषण——!!
भारतभर वेगळ्यावेगळ्या छोट्या मोठ्या गावातून हिंडलो,भटकलो तेव्हा उगीचच वाहनाचा भोंगा वाजवण्याची विकृती ही एक सर्वसामान्य समस्या असल्याचे दिसून आले.त्यातल्या त्यात वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न्स ! वास्तविकतः आपण हॉर्न न वाजवता रस्त्याने जाऊ शकतो, वाहन चालवू शकतो,याची जाणीवच वाहन चालकास नसल्याचे दिसून येते.मी गेली १८ वर्षे मोटरसायकल वापरत आहे पण मला कधीही अपवाद वगळता हॉर्न वाजवण्याची गरज पडली नाही.मुळात माझ्या मोटरसायकलचा टुर्रर्र—-असा वाजणारा बारीक आवाजातला हॉर्न फक्त मला आणि माझ्या आजूबाजूस दोन मिटर परीघातच ऐकू येणारा असल्याने मला तो वाजवण्याची इच्छा होत नसावी. पण हॉर्न न वाजवता मी जाऊ शकतो ही वस्तुस्थिती आहे. मग इतरांनासुद्धा तसं जाणं का अशक्य असावं असा मला प्रश्न पडतो.जेव्हा मी रस्यावर वाहतुकीत अडकलेलो असतो तेव्हा इतर वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न वाजत असतात ते पाहून त्यांची किंव येते,आणि मनात संतापही उफाळून येतो. आपल्या हॉर्नमुळे वाहतुकीची धीमी गती वाढणार नसते हे ठाऊक असूनही हेलोक हॉर्न वाजवून गोंधळात भरच घालत असतात याची या बहाद्दरांना जाणीवच नसते. कर्णकर्कश हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषण करणे म्हणजे हा एक अपराध आहे असं मला वाटतं.
आपल्या आजूबाजूच्या लोकांना, पादचारी इसमांना, जनावरांना,इतर वाहनांना आपण आल्याचे कळावे, त्यांचे लक्ष वेधावे,त्यानी काळजी घ्यावी,आपला मार्ग निर्धोक करावा आणि आपल्याला आपल्या गतिने जाऊ द्यावे या हेतुने आपण हॉर्न वाजवतो.इथंपर्यंत सगळं ठिक आहे.पण पुढे काही कारणाने वाहतुक तुंबली असेल तर असं अनिर्बंधपणे दीर्घकाळ कर्णकटू हॉर्न वाजवण्याचे प्रयोजन काय?
पुण्यात मी गणेशमळा परीसरात राहतो.सिंहगड रस्ता आता बराच रूंद झाला आहे.या रस्यावरची वाहतुक अनेक पटीने वाढली आहे. [signal] हिरवा सिग्नल मिळण्याची वाट पाहणे याना कमीपणाचे वाटते की काय? देव जाणे ! या सिग्नलचा अर्थ काय असतो हे तरी याना ठाऊक असतं कां असा प्रश्न पडतो.वाहनासाठी लाल सिग्नल असला तरी सर्व बाजूने वाहने वेगाने हॉर्न वाजवत येत असतात.उलट दिशेने [रॉंग साईड]येणारी वाहने,सायकली, स्कूटर्स यामुळे सिग्नलला पादचारी मार्गावरून हा रस्ता ओलांडून पलीकडच्या बसथांब्यावर जायचे असेल तर एक दिव्य पार पाडण्यासारखे असते.कुत्री भुंकावीत तसे वाहनांचे हॉर्न्स पादचारी मंडळीवर सर्व बाजूनी भुंकत असतात.याला काय म्हणावे?
इतर देशात मात्र हॉर्न वाजवणे हे रानगट समजले जाते. कितीही वेगात वाहतुक असली, कितीही वाहनांची गर्दी असली तरी एखादा पादचारी रस्ता ओलांडत असेल तर सर्व वाहने शांतपणे थांबलेली असतात.रस्ता ओलांडण्यासाठी थांबलेल्या इसमास वाहन थांबवून सुहास्य वदनाने हात हालवून रस्ता ओलांडण्याची खूण करतात असा अनुभव मी न्युयॉर्क,सिंगापूर,थायलण्ड,मलेशिया या देशात घेतला आहे. मग येथेच असे कां? कोठे गेली इथली संस्कृती ?
रस्त्यावर ही अशी परिस्थिती मग इतर ठिकाणी तरी या महोदयांनी थोडी इतर नागरिकांची काळजी घ्यावी.पण तसे होताना दिसत नाही.आजारी,वयोवृद्ध,नुकतीच जन्मलेली बाळं, झाडावरील पक्षी अशाना या हॉर्नचा खूप त्रास होतो हे या महोदयांना का ठाऊक नसते? काही महाभाग सोसायटीच्या एखाद्या इमारतीसमोर उभे राहून कर्णकटू आवाजात दिवस-रात्र यावेळेचं कसलंही सोयरसूतक न पाळता हॉर्न वाजवण्याचे पातक नित्यनेमाने करत असतात.असं करणारे हे सारे इंजिनियर,अकौंटंट,सरकारी नोकर, व्यावसायिक असे साक्षर लोक असतात पण ते सुशिक्षित मात्र नसतात असं खेदाने म्हणावेसे वाटते.कां असं घडावं ? कोणी सांगू शकेल?आपल्या देशातील शिक्षणपद्धतीचं हे अपयश आहे असं म्हणता येईल का? घरातल्या संस्काराचे पण अपयश?
मध्य कर्णात आवाज पोचताच तो जवळजवळ २० पटीने मोठा होऊन ऐकायला येतो. हे ध्यानात घेता आपल्या कानावर ७० डीबीए पेक्षा जास्त पातळीचा आवाज सतत आठ तास पडला तर त्याचे गंभीर परीणाम आपल्याला भोगायला लागतात, हे आपल्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे.[dbA link पहा] http://en.wikipedia.org/wiki/File:Audio23.jpg
] अशा सततच्या आवाजामुळे-
) कानाच्या आतल्या भागास दुरुस्त होऊ न शकणारी अशी कायमची इजा पोचते.
) आपली आवाज ऐकण्याच्या क्षमता कायमची उणावते,
) झोप लागेनासे होते,चिडचिड वाढते, वर्तनात बदल घडून येतो.कार्यक्षमता उणावते.
२) नाडीचे ठोके वाढतात,डोके दुखते,
३) ५ ते १० (एम एम एच जी) इतकी रक्तदाबात वाढ होते, छातीत कळा येऊ लागतात,
४) हृदयविकाराचा झटका येऊ शकतो,
६) पशुपक्षांच्या वर्तनात बदल घडून येतो,त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परीणाम होतो.पर्यावरणावर वाईट परीणाम होतो.
इतके सारे वाईट परीणाम आपण आपल्या वर्तनाने ओढवून घेतो.[karmayog चा दुवा पहा. http://www.karmayog.org/noisepollution/58.htm%5D हे टाळण्यासाठी काही करता येणार नाही का?
होय, निश्चितपणे करता येईल असं मला वाटतं.
१] शक्य असल्यास कायदेशीरपणॆ कर्णकर्कश हॉर्नच्या उत्पादनावर बंदी घालणं. गुणवत्ता प्रमाणपत्राशिवाय उत्पादनास व विक्रीस बंदी घालणं.
२] दुचाकी,कार,रिक्षा,टेम्पॊ सारखी तिनचाकी-चारचाकी वाहने यांना असे कर्णकटू हॉर्न वापरण्यास बंदी घालणं
३] वाहन वापरण्याची परवानगी देण्यापूर्वी तपासणी करून असे हॉर्न वापरणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र घेणे, प्रतिज्ञापत्राचा भंग झाल्यास त्यास इंधन न मिळण्याची व्यवस्था करणं. वाहनासह वाहन परवाना जप्त करणं, ड्रायव्हींग परवाना जप्त करणं,
४] दर ३-५ वर्षानी ड्रायव्हिंग परवानाधारकास सक्तिचे प्रशिक्षण देणे.आणि त्याची सांगड कायद्याने वाहनाच्या विम्याशी घालणं.त्याने घेतलेल्या प्रशिक्षणाची नोंद त्याच्या परवान्यावर करणं इ. इत्यादी.
मी सुचवलेले उपाय १००% अमलात आणणे शक्य आहे असं मी म्हणत नाही, पण मग आपल्याला काही उपाय सुचतो ?
[ For additional information 1] http://en.wikipedia.org/wiki/File:Audio23.jpg
2] http://en.wikipedia.org/wiki/File:Ath-byage.png 3] ] http://timesofindia.indiatimes.com/articleshow/4522168.cms —-driver suspended for honking at Chennai 4] http://mohanbn.com/blog/?p=1115 – why do you honk horn ?
5]http://www.photobesity.com/1990/08/cell-phone-wuile-driving-bad-idea.html

Advertisements
वाहनांचे भोंगे-हॉर्न(HORN) म्हणजे ध्वनीप्रदूषण——!! वर टिप्पण्या बंद