Savadhan's Blog


अमेरिकन महिलांचा हक्कासाठीचा लढा .

Posted in मराठीप्रेमी,social by savadhan on 14/05/2010
Tags: , ,

अमेरिकन महिलांचा हक्कासाठीचा लढा –महत्वाचे मुद्दे
अमेरिकन महिलांना जवळ जवळ दोनशे वर्षाच्या लढ्यानंतर मिळालेले स्वातंत्र्य आणि हक्क याची माहिती येथे दिली आहे. शंभर वर्षापूर्वी महिलांवर अनेक बंधने होती त्या मानाने आज रोजी अमेरिकन महिलांना कल्पनातीत अशा अनेक हक्काच्या संधींचा आणि स्वातंत्र्याचा लाभ झाला आहे. त्याचा फायदा जगातील इतर राष्ट्रातील महिलांना पण झाला.अमेरिकन महिलांना काय आणि कुठल्या प्रकारचे हक्क मिळाले आहेत ते जाणून घेणे महत्वाचे आहे असे मला वाटते. जिज्ञासूनी अधिक माहितीसाठी ERAवाचावे .एलिस पॉल नावाच्या कायदेतज्ञ असलेल्या महिला संघटनेच्या नेत्याने पहिल्यांदा १९२३ साली ERA चा मसूदा लिहून तो कॉंग्रेस समोर विचारासाठी सादर केला.शेवटी २२मार्च १९७२ ला सिनेटसह प्रतिनिधीगृहाची २/३ बहुमताने मंजूरी मिळाली आणि हा मसूदा इतर राज्यांच्या मंजूरीसाठी पाठवून देण्यात आला.यासाठी सात वर्षाची दिलेली मुदत ३०जून १९८२ पर्यंत वाढवून दिली तेव्हा घटनेनुसार ३/४ म्हणजे ३८ राज्यांऐवजी ३५ च राज्यांनी या मसूद्यास मंजूरी दिलेली असल्याने याचा समावेश अद्याप अमेरिकेच्या घटनेत झालेला नाही. या ERA ने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. विषमलिंगी विवाहाप्रमाणेच समलिंगी विवाहास कायद्याने संमती, अविवाहित महिलेस हवे असल्यास कायद्याने अपत्य प्राप्तीचा हक्क इ.इ.१९८२ पासून कॉंग्रेसच्या प्रत्येक सभेसमोर ERA पुन:विचारार्थ ठेवण्यात आले.२००७-०८ च्या ११० व्या सभेनंतर आता २००९-१० च्या १११व्या सभेसमोर ते पुनः विचार विनिमयासाठी येण्याची अपेक्षा आहे. खाली एकेका मुद्यावर संक्षिप्त टिपणी देत आहे.
१] ४ जून १९१९ ला अमेरिकन कॉंग्रेसने १९ व्या राज्यघटना दुरूस्तीने अमेरिकन महिलांना मतदानाचा हक्क प्राप्त करून दिला.
{भारतीय महिलांना सुद्धा आजरोजी मतदानाचा हक्क आहे. मात्र भारतातील महिलांची संख्या एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ ५०% असूनही संसदेत तेवढे प्रतिनिधीत्व तर सोडाच पण ३३% [ हा आकडा कुठून आणला ते मला ठाऊक नाही ] प्रतिनिधीत्व देण्यातही अनेक अडथळे निर्माण केले जात आहेत.} अमेरिकेतील महिलांना संसदेत किती टक्के प्रतिनिधीत्वाचा हक्क आहे ते येथे नमूद केलेले नाही.
२] अमेरिकन महिलांना पुरूषांच्या बरोबरीने म्हणजे पुरुषांइतकेच वेतन घेण्याचा हक्क कायद्याने दिला आहे.लिंगावर आधारीत वेतनात भेदभावास आता प्रतिबंध करण्यात आला आहे. १९३८ च्या फ़ेअर लेबर स्टॅंडर्ड ऍक्ट ने स्त्री-पुरुषांना किमान वेतनाची हमी दिली आहे. आणि म्हणूनच इक्वल राईट्स अमेंडमेंट्स ला स्री-पुरुष समानता दाखवण्यासाठी Women’s Equality Amendment असंही म्हंटलं जातं.
[भारतात समान काम समान वेतन कायदा आहे. तसेच भारतीय महिलांना आयकरातही विशेष सवलत मिळत आहे. ]
३] जे काम पुरुष करतात ते काम करण्याचा हक्क १९६४ च्या सिविल राईट्स् ऍक्ट ने अमेरिकन महिलांना मिळालेला आहे. तसेच नोकरभरतीसाठी लिंगाधारीत जाहिराती देणे बेकायदेशीर समजण्यात येत आहे.
[ भारतातही कोणत्याही नोकरीसाठी स्त्रियांना अपात्र समजण्यात येत नाही किंवा नाकारण्यात येत नाही.बस चालक,बसवाहक,रिक्षाचालक,पोस्टवुमन,अभियंता,इ. अशा विविध सेवासाठी स्त्रियांची निवड होत आहे. ]
४] महाविद्यालयीन शिक्षण घेण्याचा हक्क अमेरीकन महिलांना मिळाला आहे. १८७० मध्ये अमेरिकेत एकूण संख्येच्या २० टक्के महाविद्यालयीन विद्यार्थिनी होत्या आज रोजी त्यांची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे.
[ भारतात ही महाविद्यालयीन मुलींची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून येते,गेल्या दोन दशकांत त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असल्याचे दिसून येते.]
५] विवाहोत्तर धर्म निवडीचे स्वातंत्र्य अमेरीकन महिलांना मिळाले आहे. पूर्वी ज्या पुरूषाबरोबर विवाह होई त्या पुरुषाचा जो धर्म असेल तोच धर्म त्या महिलेस निर्विवादपणे आपोआप स्वीकारावा लागे.
[ भारतीय महिलांना ही मुभा आहे.आंतरधर्मीय विवाहानंतर पुरुषाचा जो धर्म असेल त्या धर्माच्या चालीरीतीशी त्या विवाहित महिलेस समन्वय साधणे भाग पडते असे प्रत्यक्ष अनुभवास येते.]
६] स्वतःची स्थावर मालमत्ता धारण करण्याचा अधिकार अमेरीकन महिलांना कायद्याने मिळालेला आहे. इ.स.१८०० च्या दरम्यान पतिच्या परवानगीशिवाय अशी मालमत्ता धारण करता येत नसे.
[ भारतात महिलांना कायद्याने वारसाहक्काने स्थावर मालमत्तेत योग्य हिस्सा मिळण्य़ाचा अधिकार मिळाला आहे.तसेच स्वकष्टाने मालमत्ता धारण करण्याचाही हक्क आहे.]
७] १९७८ च्या प्रेग्नंसी डिस्क्रिमिनेशन ऍक्ट नुसार गरोदर असलेल्या किंवा गर्भसंभव असलेल्या अमेरिकन महिलांना नोकरीतील बढतीची संधी नाकारण्यास किंवा नोकरी नाकारण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच गरॊदर स्त्रियांनी गरोदरपणात सक्षमपणे काम करण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांना गरोदरपणाच्या रजेची सक्ती करता येणार नाही.सद्या अमेरिकेत तीन महिने पगारी प्रसुती रजा मिळते.
[भारतातील महिलांना सुद्धा ह्या सवलतींचा फायदा मिळत आहे.अभियांत्रिकी,वैद्यकीय,सेनादले,प्रशासकीय सेवा,शिक्षणसंस्था अशा सर्व ठिकाणी भारतीय महिला सक्षमपणे कार्यरत आहेत.]
८] अवांछित संतती होऊ द्यायची किंवा नाही याबाबत निर्णय घेणाचा हक्क अमेरिकन महिलांना आहे.त्यासाठी आवश्यक असणार्या गर्भनिरोधक गोळ्या, औषधे घेण्याचा, गर्भपाताचा निर्णय घेण्याचा हक्क त्याना आहे.
[ भारतात आजही कायद्याने हे सर्व हक्क भारतीय महिलांना आहेत परंतु सामाजिक आणि कौटुम्बिक दबावाखाली भारतीय स्त्रिया याबाबत निर्णय घेऊ शकत नाहीत असे अनुभवास येते.आजही असंस्कृत कुटुंबात संततीबाबतचे सर्व निर्णय कुटुंबातील इतर लोकच घेतात, त्यामुळे स्त्री-भ्रूण हत्येचे अनेक प्रकार राजरोसपणे घडतात.आता याविषयी कायद्याची बंधने कठोरपणे पाळण्यात येत आहेत.त्यामुळे अशा प्रकारास थोडाफार आळा बसला आहे असे वाटते. ]
९] इच्छा नसेल तर आपल्या पतीबरोबर समागमास नकार देण्याचा हक्क अमेरिकन महिलेस १९७६ नंतर मिळाला.तत्पुर्वी अशा प्रकारचा हक्क त्यांना नव्हता. आजारपणासारख्या काही कारणाने इच्छा नसल्यास समागमाची जबरदस्ती अमेरिकन महिलांवर होत असावी असे वाटते.आता अशा समागमास [ज्यास rape हा शब्द योजला आहे]या कायद्यान्वये प्रतिबंध करण्यात आला असून अमेरिकन महिलांना या कायद्याने संरक्षण दिले आहे.
[भारतातील सुसंस्कृत एकत्र कुटुंबात महिलांना अनेक धार्मिक बंधनाचं पालन करावं लागत असे तसंच ते पुरुषांनाही करावे लागत असे. त्यामुळे अनैच्छिक समागमाचा प्रसंग येत नसे. समागम हा विधीवत आनंदाने करावयाचे आचरण असून तसे संस्कार उभयतांवर झालेले असत.
आता सामाजिक परिस्थिती खूपच बदललेली आहे.आर्थिक,धार्मिक वा अन्य कौटुंबिक कारणामुळे [विभक्त] कुटुंबातील पती-पत्नीमध्ये मतभेद झाल्यास कुटुंबकलहास सुरुवात होते.अशावेळी पत्निची इच्छा नसताना पतीने समागमाची इच्छा व्यक्त केल्यास तिला त्या लैंगिक संबंधास कायद्याने नकार देण्याचा अधिकार असेल मात्र त्यामुळे कलह वाढत जाऊन त्याची परीणती विवाहविच्छेदनात होण्याचीच शक्यता जास्त होईल. (पुर्वीच्या मानाने अलिकडे घटस्फोटाच्या संख्येत वाढ झालीआहे.)भारतीय दंडसंहितेमधील कलम ३७५ पतीपत्नीच्या संबंधास लागू होईल का किंवा त्यासाठी वेगळी अशी तरतूद आहे काय ते पहावे लागेल. जिज्ञासूनी बलात्कार याविषयी लिहिलेला लेख अवश्य पहावा. या ठिकाणी याविषयी तपशीलवार चर्चा अपेक्षित नाही.]

Kiberia Yethe mahilanchi kay avastha aahe te paha .

http://www.amnesty.org/en/news-and-updates/video-and-audio/video-women-kibera-kenya-20090306

Advertisements
अमेरिकन महिलांचा हक्कासाठीचा लढा . वर टिप्पण्या बंद