Savadhan's Blog


होमिओपॅथी महाविद्यालयाची दयनीय अवस्था !

होमिओपॅथी
महाराष्ट्रातील होमिओपॅथी महाविद्यालयाची अवस्था विद्यार्थी व शिक्षकाअभावी दयनीय झाल्याची बातमी आज वर्तमानपत्रात वाचली. तसं याआधी पण अशा प्रकारच्या बातम्या वाचनात आल्या होत्या. आता होमिओपॅथी महाविद्यालयाच्या इमारतीचे ४-५ मजले गायब झाले असल्याची बातमी वाचली आणि तेव्हा शेतातल्या विहिरी गायब झाल्याचे वाचले होते, त्यामुळे डॊक्याला हात लावायची पाळी माझ्यावर आली. पायाभूत सुविधांच्या अभावामुळे दर्जाहिन शिक्षणाकडे सगळयानीच पाठ फिरवली. हे झाली काही कारणं पण अजून एक महत्वाचं कारण आहे तिकडं कोणीच लक्ष देत नाही असं कां ? हा प्रश्न मनात आल्याशिवाय रहात नाही. तो म्हणजे या पॅथीच्या विश्वासार्हतेचा !
१७९० मध्ये सॅम्युएल हानेमान यानी या पॅथीचा पाया घातला. मलेरियासाठी उपयोगी पडणारे, सिंकोना झाडापासून तयार केलेले क्विनाइन त्याने स्वतः टॉनिक म्हणून घेण्यास सुरूवात केली तेव्हा त्यास मलेरीयाची लक्षणे जशी असतात त्याप्रमाणे थंडी भरून आली.यावरून त्याने निष्कर्ष काढला की ज्या औषधाच्या सेवनामुळे जी लक्षणे शरीरात निर्माण होतील त्या लक्षणाच्या रोगावर त्याचा ईलाज करता यॆईल. यासाठी त्याने “लाईक क्युअर्स लाईक” असं सूत्र मांडले. तसेच त्या औषधाची मात्रा जशी उणावत नेऊ [पातळ करु] तसं ते औषध रोगावर जास्त परीणामकारक ठरेल आणि इतर दुष्परीणामही कमी होतील असं त्याने जाहीर केलं. त्याचबरोबर ते पातळ औषधीद्रव्य जितके जोरात हलवू तितके ते जास्त परीणामकारक [पोटेंशी] होईल असंही त्यानं जाहिर केलं.
जोरात हलवून पातळ औषधाची [पोटेंशी] शक्ती वाढवणे-
त्याच्या या उपचार पद्धतीसाठी १८०७ मध्ये हानिमानने ’होमिओपॅथी’ या शब्दाची योजना केली. मराठीत त्यास समचिकित्सा असं म्हणता येईल. रोगाच्या लक्षणासारखी लक्षणं निर्माण करणारे औषध देऊन तो रोग बरा करणे म्हणजे समचिकित्सा होय. यासाठी औषध तयार करण्याची रीत पाहिली की आपल्याला बर्‍याच गोष्टी ध्यानात येतील. एका परीक्षानळीत मूळ औषधाचे १०० रेणू घेतले असं समजू. ते औषध दुसर्‍या परीक्षानळीत एकास दहा या प्रमाणात उर्ध्वपातीत जलाने पातळ केले आणि जोरजोरात हलवले की त्याची [पोटेंशी] रोग बरे करण्याची शक्ती वाढते असं समजले जाते.या दुसर्‍या परीक्षानळीतील १० औषधी-रेणूच्या मिश्रणास १x असं म्हणतात. आता तिसर्‍या परीक्षानळीत १x मिश्रण घेऊन ते एकास दहा या प्रमाणात उ.जलाने पातळ करून जोरजोरात हलवले की या १ औषधी-रेणुच्या मिश्रणाची [पोटेंशी]शक्ती २x झाली असं समजलं जातं.आता चौथ्या परीक्षानळीत २x मिश्रण घेऊन ते एकास दहा या प्रमाणात उ.जलाने पातळ करून जोरजोरात हलवले की शून्य औषधी रेणूच्या मिश्रणाची [पोटेंशी] शक्ती ३x झाली असं समजतात. आणि अशा रीतीने ही पोटेंशी वाढवण्याची प्रक्रिया पुढे ४x,५x ——साठी चालू राहते.
येथे x याचा अर्थ १० असा असतो. म्हणून ४x याचा अर्थ हे औषध १०चा चतुर्थ घात इतकं ते पातळ करण्यात आलं आहे. होमिओपॅथिक औषधनिर्माते मूळ औषधाचा एक भाग ९९ भाग उ.जलात मिसळून ते पातळ करतात. याला १०० [पोटेंशीचं]शक्तीचं औषध म्हणजेच १C [पोटेंशीचं]शक्तीचं औषध म्हणतात. पुनःपुन्हा पातळ करून ते २C, ३C.४C—–इत्यादी [पोटेंशीचं]शक्तीची औषधं तयार केली जातात.बाजारात ३०C [पोटेंशीची]शक्तीची औषधं उपलब्ध असतात.याचा अर्थ या औषधामध्ये मूळ औषध १००चा ३०वा घात म्हणजेच १०चा ६० वा घात इतकं अल्पांश [पातळ केलेलं असल्यामुळे]असतं.किंबहूना जवळजवळ काहीच नसतं.कसं ते पहा .
आता याचं विश्लेषण असं होतं की एक ग्रॅम मूळ औषधात १०चा २४ घात इतके रॆणू असतात आणि ते पातळ करतात १०चा ६० घात इतकं.म्हणजे त्यातील रेणूंच्या एकूण संखेच्या कितीतरी अधिकपट ते पातळ केलेले असते. म्हणजेच ३०c होमिओपॅथिक औषधात शुद्ध पाण्याशिवाय काहीच नसतं असं गणिताने सिद्ध होतं.आणि म्हणूनच संशोधक होमिओपॅथिक उपचार पद्धतीस कशी मान्यता द्यावी असा प्रश्न विचारतात. प्लेसबो परीणामाची ताकद इतकी प्रचंड आहे की जोपर्यंत रुग्णाचा या होमिओपॅथी उपचार पद्धतीवर गाढ विश्वास आहे तोपर्यंतच ती एक चांगली पॅथी म्हणून मान्य असेल. इतकंच नव्हे तर सर्व रोगांपैकी ९० टक्के रोगी हे आपोआप- ”प्लेसबो परिणामामुळे”-बरे होत असतात.ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.एकाही रोगाबाबत महत्वाचा असा ठोस पुरावा न मिळाल्याने विविध आजारासाठी होमिओपॅथी औषधाच्या  घेतलेल्या शेकडो ट्रायल्स निरर्थक ठरल्या आहेत. त्यामुळे संशोधक,शास्त्रज्ञ या उपचारपद्धतीस संपूर्णपणे अमान्य करतात.मग या औषधाने आजार बरा झाला असं वाटतं याचं गुपित समजण्यासाठी   प्लेसबो म्हणजे काय याची माहिती करून घेणं आवश्यक ठरतं. त्यासाठी अधोरेखीत प्लेसबो शब्दावर क्लिक करा.

हे सारं ध्यानात घेतलं तर होमिओपॅथी महाविद्यालये आजारी कां आहेत ते लक्षात यायला वेळ लागणार नाही.असं जर आहे तर हे जनता जनार्दनाच्या समोर कां मांडण्यात येत नाही ? कशाला अशा महाविद्यालयावर जनतेचा पैसा खर्च करावा? यावर भारतीय विद्वानानी, विचारवंतानी चर्चा करुन योग्य तो मार्ग काढला पाहिजे असं वाटत नाही कां? सत्य कटू असतं ते असं !

pl.reqad this http://www.guardian.co.uk/lifeandstyle/2010/jan/29/sceptics-homeopathy-mass-overdose-boots

Advertisements
होमिओपॅथी महाविद्यालयाची दयनीय अवस्था ! वर टिप्पण्या बंद