Savadhan's Blog


दुधाचे भाव वाढले पुढे काय ?

हल्ली वर्तमानपत्र वाचायला घेतलं रे घेतलं की भाव वाढल्याची बातमी हमखास माझ लक्ष वेधून घेते. आज काय भाज्यांचे भाव वाढले, तर कधी दूधाचे भाव वाढले.अशीच “जिल्हा दूध संघाने खरेदीचे दर वाढविले” ही बातमी.आताशा ’दर वाढले’ असे शब्द वाचले की पोटात गोळा उठतो. आपल्याला अजून कोठे काटकसर करावी लागणार याचा विचार सुरू होतो. सेवानिवृत्त होताच मोटारसायकल बंद करून जास्तीत जास्त पायी चालण्याचा परिपाठ ठेवला. जरा दूर जायचे असेल तर लवकर निघून बसनेच जायचे. अगदीच आवश्यकता असेल तेव्हाच रिक्षाचा वापर करायचा,वगैरे वगैरे. आता “दर वाढले” हे शब्द वाचताच विचार चक्र सुरु झाले. परत एकदा बातमी वाचली तेव्हा कोठे डोक्यात प्रकाश पडला की ’दूध खरेदीचे दर’ वाढले म्हणून ! मग जरा स्थिरावलो, मनातच म्हंटले ” ठिक आहे, आपल्या खिशाला आज चाट नाहीए तर !” संघाने खरेदीचे दर वाढवून दूध उत्पादकांना दिलासा दिला आहे. काही हरकत नाही. त्यांचे ही काही प्रश्न असणारच नाही का? त्यांना ही जरा यामुळे चार पैसे जास्त मिळतील ! असा विचार मनात चालू होता आणि क्षणार्धात एक विचार मनात चमकून गेला सोयादूधाचा. सोयादूधाचा पर्यायी दूध म्हणून वापर करता येईल असं नुकतंच कशात तरी वाचलं होतं. पण त्यात त्याची कृती दिली नव्हती. कोठे मिळेल याची कृती ? जालकावर शोध घेऊन पहावे, असं ही एकदा मनात येऊन गेलं.असेच दोन दिवस निघून गेले. हा विषय मी विसरून पण गेलो.
घरी आलेल्या पाहुण्यांच्या पाहुणचारात दोन दिवस असेच निघून गेले. वर्तमानपत्राकडे दुर्लक्ष झाले.हे असं नेहमीच घडतं. महत्वाच्या बातम्या दूरदर्शनवर पाहायला मिळाल्याने जूने पेपर वाचण्याच्या फंदात मी सहसा पडत नाही. पण झालं काय की बेकरीतून लादीपाव आणला होता.बेकरीवाल्याने तो पेपरमध्ये बांधून दिला होता.लादीपाव काढून घेऊन तो पेपरचा तुकडा टेबलवर तसाच घडी घालून ठेवला होता. दुसर्‍या दिवशी सकाळी चहा पीत बसलो होतो तेव्हा सहजच माझं लक्ष त्या पेपरच्या तुकड्यावरील एका चौकटीकडे गेलं. विषय होता —-”सोयाबिनपासून दूध करण्याची कृती”
दूधाचे दर वाढल्यापासून लोक पर्यायाच्या शोधात असावेत असं मला जाणवलं.मी एकटाच याचा शोध घेतोय असं काही नाही. पण येथे फक्त दूध कसे तयार करतात याचीच माहिती दिली होती.मागं एकदा मी असंही वाचलं होतं की सोयाबिन मध्ये ट्रिप्सिन विरोधी घटकद्रव्य असून ते विषारी असते,त्यामुळे कच्चे सोयाबिन पचनास जड जात असते, म्हणून सोयाबिन भाजून घेतल्यास विषारी द्रव्याचा परीणाम होत नाही असं आणि पचनास पण हलके होते, असं मी वाचलं होतं.याविषयी या लेखात काहीच उल्लेख नव्हता.पण जी काही माहिती दिलेली आहे, ती केव्हांही लोकांना उपलब्ध असावी म्हणून येथे देत आहे.
निवडलेले सोयाबिन २४ तास पाण्यात भिजत घालावेत.त्याची टरफले पटकन निघण्यासाठी त्यात थोडेसे सोडियम कार्बोनेट टाकावे. टरफले काढून सोयाबिन वाळवावे.आणि मग त्याचे पीठ दळून आणावे.एक भाग सोयाबिन पीठ व तीन भाग पाणी घेऊन हे मिश्रण मिक्सर मधून फिरवून घ्यावे.तयार झालेल्या एक कप पीठाच्या मिश्रणात सात कप पाणी घालून ढवळावे म्हणजे सोया दूध तयार होईल. हे दूध नेहमीच्या दूधाइतकेच पौष्टीक असते.या दूधाचे दही, पनीर,ताक इ.तयार करता येते.शास्त्रीय दृष्टीकोनातून या दूधाची उपयुक्तता नेहमीच्या दूधाइतकीच असल्याचे आढळून आले आहे.अन्नशास्त्राच्या पुस्तकात सोयाबिनमधील प्रथिनांचे प्रमाण त्याच्या वजनाच्या ४३.२% व ४३२ कॅलरीज उष्मांक मिळतात असते असं नमूद केले आहे. माणसाला त्याच्या किलोग्रॅम मधील जितके वजन असेल तितके ग्रॅम प्रथिनांची रोज गरज असते असेही यात नमूद केले आहे.
मग हा प्रयोग करून पहायला काय हरकत आहे ? जादा माहिती येथे वाचा

http://www.soya.be/soy-milk.php

Advertisements