Savadhan's Blog


VFS सॆंटर पुणे,मुंबई-अनुभव

VFS सॆंटर पुणे,मुंबई-अनुभव
आजरोजी अनेकांना काहीना काही कारणांने अमेरिका,युरोप किवा इतरत्र परदेशी जायचा प्रसंग येतो.तरूण उच्चविद्याभूषित लोकांना फारसा त्रास न होता व्हिसा हातात पडतो. ते ज्या कंपनीत काम करत असतात ती कंपनी त्यांच्या मदतीला असते. प्रश्न असतो ज्याना अशी मदत उपलब्ध नसते त्यांचा.मग अशावेळी एजंटाची मदत घेण्याशिवाय गत्यंतर नसते. तरीही VFS सॆंटर पुणे,मुंबई येथील व्यवस्था कशी आहे,आपण काय काळजी घ्यावी ? इथल्या वेळा काय असतात, याबाबतची माहिती आपल्याला निश्चित उपयोगी पडेल.
पुण्यातील VFS सेंटर चे कार्यालय हे सोहराब हॉल मध्ये पहिल्या मजल्यावर आहे. हा सोहराब हॉल पुणे रेल्वे स्टेशनच्या अगदी मागच्या बाजूस आहे. पुणे रेल्वे स्टेशनच्या बसस्टॉपवर उतरले की तेथून चालत ५-७ मिनिटात आपण सोहराब हॉल मध्ये आपण पोचू शकतो.बसस्टॉपपासून रेल्वेस्टेशन समोरून चालत रेल्वेचा ओव्हरब्रिज ओलांडलून पुढे येणारा आडवा रस्ता ओलांडून पलिकडे गेले की समोरच सोहराब हॉल आहे. किंवा शिवाजीनगरकडून आरटीओ समोरच्या रस्त्यावरुन ला मेरिडियन हॉटेल च्या पुढे गेलो की पुणे रेल्वे स्टेशनचा दादरा पूल (ब्रिज) ओलांडून पुढे जाताच सिग्नल च्या आधीच डाव्या बाजूस सोहराब हॉल आहे. येरवड्याकडून नगर रस्त्याने आलो तर संगम ब्रिज ओलांडून जहांगीर हॉस्पिटल कडे यायचे.जहांगीर च्या पुढे येणार्‍या चौकात सिग्नल ओलांडून लगेच उजवीकडे रिक्षा वळवून घेऊन ती सोहराब हॉलसमोरच थांबवावी लागते. तेथे कोपर्‍यावरच रिक्षा स्टॅंण्ड आहे.
आपण रेल्वेने पुणे रेल्वे स्टेशनवर आलात तर आत रेल्वे फलाटावरच हमालाला विचारून घ्यावे. रेल्वेच्या समोरच्या गेटकडे न जाता मागच्या बाजूस सोहराब हॉलकडेच रेल्वेच्या दादर्‍यावरुन पायी यावे. २-४ मिनिटात आपण सोहराब हॉलसमोर पोचू शकता.
सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत VFS सॆंटर उघडॆ असते.दुपारी १ते२ जेवणाची सुट्टी असते. व्हिसाच्या कामासाठी परगांवाहून येणार्‍या लोकांना याबाबतची काही्ही माहिती उपलब्ध होत नाही असे माझ्या ध्यानात आले. सोहराब हॉलच्या दरवाजात सुरक्षा कर्मचारी असतात.ते आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करतात. जे लोक स्वतःची चारचाकी घेऊन येतात त्यांना सोहराबहॉल समोरच्या आवारात थोडा वेळ गाडी थांबवता येते. त्यासाठी सुरक्षा कर्मचारी आपल्याला मदत करतात.

आता आपण गेटच्या डाव्या बाजूने VFS सॆंटर कडे जायचे असते. समोरच VFS सॆंटर चा सुरक्षा गार्ड बसलेला दिसतो. त्याच्याकडून VFS सॆंटर मध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवेशिका घेऊन पहिल्या मजल्यावर जायचे. VFS सॆंटर च्या दाराशीच दुसरा गार्ड असतो.त्याला ती प्रवेशिका दाखवून मगच VFS सॆंटरमध्ये आपल्याला प्रवेश मिळतो. आतमध्ये दोन खिडक्यावर व्हिसासंबंधीची कागदपत्रे तपासून घेतली जातात. आपला क्रमांक आल्यावर आपल्याला त्या खिडकीशी बोलावले जाते. साधारण १५ते२० मिनिटात काम आटोपून आपण येथून बाहेर पडू शकतो. ही झाली पुण्याची कथा.

आता मुंबई VFS सॆंटर ची कथा. मुंबईचे VFS सॆंटर हे महालक्ष्मी मंदिराच्या समोर आहे. दादर स्टेशनला उतरून सरळ टॅक्सीने गेलात तर काही अडचण येत नाही. आपल्याला फारसा त्रास होण्याचा प्रश्न येत नाही.पण आपण स्वतःची चारचाकी घेऊन जाणार असाल तर मात्र अनेक प्रश्नांना
आपल्याला सामोरं जावं लागतं. कंपनीच्या वाहनाने आपण जात असाल तर आपण काहीच काळजी करण्याचं कारण नसतं. त्यांचं ते नहमीचं काम असल्यानं आपण निश्चिंत राहून व्हिसासाठीची मुलाखत देऊ शकता. पण जेव्हा आपण स्वतःच्या जबाबदारीवर मुलाखतीसाठी जात असतो तेव्हा बर्‍याच गोष्टींची आधी माहिती करून घेणे आवश्यक ठरते. काही महत्वाचे मुद्दे:-
१) मुलाखतीच्या वेळेपूर्वी किमान एक तास तेथे हजर असणे आवश्यक.
२) मुलाखतीची वेळ सकाळी ८-३० ते ९-३० दरम्याची असेल तर परगांवच्या लोकांना आदल्या दिवशी मुंबईत राहयाला जावे लागते. दूतावासाच्या आसपास एका रात्रीसाठी प्रत्येकी रु. ३०००/- पर्यंत लॉजभाडे पडू शकते. आसपासच्या उपनगरात आपली रहाण्याची सोय होत असेल तर ते उत्तम ठरते.सकाळी ५-४५ वा. ठाण्याहून टॅक्सीने निघाल्यास VFS सॆंटर ला पोचण्यास एक तास लागतो. ठाण्यात मुलुंड नाक्याजवळच्या चांगल्या लॉजमध्ये एका रात्रीस एका माणसास रु.६००/-पर्यंत भाडे पडू शकते. शक्यतो राहण्याची व्यवस्था खाजगी ओळखीच्या ठिकाणी झाली तर ते जास्त निर्धोक असते. नाहीतर VFS सॆंटर जवळच्या लॉजमध्ये जास्त भाडे भरून राहणे सोयीचे ठरते.VFSसेंटरच्या जवळपास कोठेही चांगले हॉटेल किंवा रेस्टॉरंट नाही. मात्र शेजारीच एक दुकान आहे तेथे बिस्किटे,चिवड्याचे पाकिट,पाण्याची बाटली इ. मिळू शकते.
३) मुंबईत- हाजीअलीजवळ -महालक्ष्मी मंदिराजवळ हे VFS सॆंटर आहे. या सॆंटरची मदत घ्यायची असेल तर त्यासाठी प्रत्येकी रू२५०/- इतके शुल्क भरावे लागते. अन्यथा आपण थेट दूतावासाकडे जाऊ शकता. पण प्रवासात आपण खूप थकलेलो असतो,अशा वेळी हातपाय तोंड धुऊन ताजेतवाने होऊन मुलाखतीस जाणे जास्त श्रेयस्कर असते.
४) स्वतःच्या चारचाकीने गेलात तर VFS सॆंटर समोर गाडी पार्क करण्याची व्यवस्था नाही हे ध्यानात घ्यावे. तसेच सकाळी १० पासून ट्रॅफिक जामचा त्रास सुरू होतो हे ध्यानात घेऊन पुरेसे लवकर भरपूर वेळ हाताशी ठेऊन शांत चित्ताने जावे.VFS सॆंटर पासून थॊडेसे पुढे जाऊन महानगर पालिकेच्या वाहानतळावर आपली चारचाकी आपण पार्क करू शकतो.
५) आपण VFS सॆंटर मध्ये प्रवेश करण्यापूर्वी तेथील गार्ड आपली मुलाखतीची वेळ विचारून घेतो आणि त्याप्रमाणे तो आपल्याला आत मध्ये सोडतो.
६)आत आपल्याला एक फॉर्म भरून द्यावा लागतो.
७) त्यानंतर आपल्याजवळ जर काही वस्तु- चावी,मोबाईल,सीडी,सूट्केस वगैरे असेल तर त्या वस्तू आपण दूतावासात घेऊन जाऊ शकत नाही. अशा सर्व वस्तु ठेवण्यासाठी आपल्याला लॉकर दिला जातो. आपल्याला एक टोकन नंबर दिला जातो.
८) मुलाखतीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे आपण फक्त प्लॅस्टीक पिशवीतूनच घेऊन जाऊ शकता हे ध्यानात ठेवावे.
९) आतमध्ये आपल्याला चहा, कॉफी, नाश्ता दिला जातो. आपली मुलाखतीची वेळ झाली असल्यास आपला नंबर पुकारला जातो. VFS सॆंटर बाहेर आपल्याला दूतावासाकडे घेऊन जाण्यासाठी एक बस ठवलेली असते.
१०) त्या बसने आपल्याला दूतावासासमोर सोडण्यात येते. तेथे रांगेने आपल्याला आतमध्ये तपासणी करून सोडण्यात येते. आत जाताना आपल्याजवळ औषधाच्या गॊळ्याची स्ट्रीप असेल तर ती सुद्धा आपल्याला बरोबर घेता येत नाही हे ध्यानात घ्यावे.मात्र सुट्टी नाणी असल्यास तपासून मग आत जाता येते.
११) आत मध्ये इतर सगळे सोपस्कार–हातचे ठसे वगैरे पार पाडल्यावर आपला नंबर पुकारतील तसे त्या खिडकीसमोर जाऊन आपण मुलाखत द्यायची असते.
१२) एक विशेष बाब ध्यानात ठेवावी ती म्हणजे शक्यतो सर्व खिडक्यांच्या मध्यभागी बसावे म्हणजे जे नंबर पुकारले जातात ते नीट ऐकू येतात. यासाठी सतत सजग राहावे. कारण आपला नंबर पुकारल्यावर आपण गेला नाहीत तर आपली मुलाखत रद्द होऊ शकते. मुलाखत आपण मराठी भाषेत देणार असल्याचे आधीच जाहीर केले असेल तर आपण मराठीत बोलू शकता. अनेकदा तेथे पोचल्यावर आपल्याला मराठी दुभाषकाची गरज पडली तर  तो उपलब्ध करून दिला जातो किंवा हिंदी दुभाषकावर भागवावे लागते. म्हणून मुलाकत मराठीत देणार असल्याचे आधीच जाहीर करावे म्हणजे दुभाषकाची कटकट रहात नाही.
१३) मुलाखत संपल्यावर आपला व्हिसा मंजूर हॊणार असेल तर तो VFS सॆंटर मधून दुसर्‍यादिवशी दुपारी घेऊन जाऊ शकाल असे सांगण्यात येते. अन्यथा तो आपल्याला VFS सॆंटर च्या कुरियर सेवेद्वारे घरपोच मिळू शकतो.
१४) जर व्हिसा नामंजूर होणार असेल तर त्यांनी घेतलेल्या रिमार्क्स सह आपला पासपोर्ट आपल्या हातात परत दिला जातो.
मला वाटते माझी ही माहिती आपल्याला मार्गदर्शक ठरेल.अधिक माहितीसाठी खालील दुव्यावर जा.

http://maps.google.co.in/maps/place?rlz=1C1CHNV_en-ININ352IN353&um=1&ie=UTF-8&q=vfs+pune+office&fb=1&gl=in&hq=vfs+pune+office&hnear=Pune,+Maharashtra&cid=564781647997622146

Advertisements