Savadhan's Blog


विद्युत कायद्यातील काही व्याख्यांचा आढावा.

विद्युत कायद्यातील व्याख्या
२००३ च्या विद्युत कायद्यातील तरतुदींचा थोडक्यात आढावा .
२००३ चा विद्युत कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी भारतीय विद्युत कायदा १९१० मधील तरतुदीनुसार आणि त्याखाली तयार करण्यात आलेली १९५६ ची भारतीय विद्युत नियमावली इ.नुसार विजेच्या संदर्भातील कामकाज चालत असे. भारत स्वतंत्र झाला इ.स.१९४७ ला पण इ.स.२००३ उजाडले तरी अजूनही १९१० चाच कायदा वापरात होता. विजेची गरज वाढत चालली होती,त्याप्रमाणात मागणी पण वाढत चालली होती.ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणाबरोबरच सर्वत्र वीजपुरवठा व्हावा, विद्युत उद्योगाच्या विकासास मदत व्हावी म्हणून चालना देण्याच्या उद्देशापोटी,विद्युत निर्मिती,विद्युत वहन,विद्युत वितरण आणि विजेचा वापर व विद्युत-व्यावसायिक व्यापार याबाबतच्या कायद्याचे, नियमावलींचे एकत्रीकरण करणे आवश्यक वाटू लागले होते. त्याअनुषंगाने वीजदराची तर्कनिष्ठ पुनर्रचना करण्याचा,सब्सिडीच्या बाबतीत पारदर्शक धोरणाची खात्री देण्याचा, पर्यावरणानुकूल कार्यक्षम धोरणास प्रोत्साहन देण्याचा,केंद्रीय विद्युत प्राधिकरण गठित करण्याचा, विद्युत नियामक आयोगाच्या स्थापनेचा आणि याचिका-लवादाच्या (अपेलेट ट्रायब्युनल) आस्थापनेविषयीचे विचार प्राधान्यक्रमाने समोर आले.
विद्युत कायदा २००३ मध्ये वरील विचाराच्या अनुषंगाने भारतीय विद्युत कायदा १९१०,विद्युत (पुरवठा) अधिनियम १९४८ आणि विद्युत नियामक आयोग अधिनियम १९९८ चे एकत्रीकरण करण्यात आलेले आहे. सर्वसामान्य माणसास वीजेसंदर्भातील वेगवेगळ्या कायद्यासाठी विनाकारण इकडेतिकडे भटकावे लागू नये या उद्देशाने २००३चा कायदा साधा नि तर्कनिष्ठ करण्यात आला आहे असे दिसून येते.
२००३चा विद्युत कायदा हा एकूण १८ भागात व १८५ कलमात विभागला असून या कायद्याच्या १ल्या भागात कायद्याचे नांव आणि या कायद्यात वापरलेल्या अनेक महत्वाच्या विद्युत संकल्पनाच्या स्पष्टीकरणासाठी त्यांच्या व्याख्या देण्यात आल्या आहेत. एखाद्या शब्दसंचाचा शब्दकोषात जरी काही अर्थ दिलेला असला तरी कायदेशीरदृष्ट्या येथे दिलेल्या व्याख्येनुसारच त्या त्या बाबींचा अर्थ समजण्यात येतो हे आपण ध्यानात घेणे आवश्यक असते. कलम १ नुसार या कायद्याचे नांव ” विद्युत अधिनियम (कायदा) २००३ असे आहे.या आधीच्या कायद्याचे “भारतीय विद्युत अधिनियम १९१०” असे नाव होते. त्यातील ’भारतीय” हा शब्द जाणीवपूर्वक गाळण्यात आला आहे, हे ध्यानात घ्यावे.जो कायदा भारतीयांनी, भारतीयांसाठी, भारतीय संसदेने मंजूर केला आहे त्याला “भारतीय” असे संबोधण्याचे प्रयोजन नाही.मात्र हा कायदा “जम्मू-काश्मिर” वगळून उर्वरीत भारतासाठी लागू होईल असे ही येथे नमूद केले आहे.
कलम २ मध्ये एकूण ७७ बाबींच्या व्याख्या दिलेल्या आहेत.नमुन्य़ादाखल काही व्याख्या आपण येथे पाहणार आहोत.[कंसात कलम-उपकलम क्र.नमूद केला आहे]
[२(८)] “स्वांतसुखाय विद्युत निर्मिती यंत्र”[ कॅप्टीव जनरेटींग प्लॅंट]:- केवळ स्वतःच्या उपयोगासाठी विद्युत निर्मिती करण्याकरीता उभारलेला विद्युत जनित्र संच. एखाद्या सहकारी संस्थेने त्याच संस्थेच्या सभासदांच्या वापरासाठीच हा जनित्र संच प्रामुख्याने वीज निर्मिती करेल.अशा प्रकारच्या तरतूदीमुळेच मी याला “स्वांतसुखाय” असा शब्द योजला आहे, आणि तो जास्त समर्पक असाच आहे. पुढे ८ जून २००५ ला याबाबत एक स्पष्टीकरण देण्यात आले. वापरकर्त्या सदस्यांची जनित्र संचात किमान २६ टक्के मालकी हक्क असला पाहिजे आणि दरवर्षी एकूण उत्पादन केलेल्या विद्युत उर्जेच्या किमान ५१ टक्के वीजेचा वापर स्वतः सदस्यानी केला पाहिजे. असे असेल तरच त्यास “स्वांतसुखाय” (कॅप्टीव) समजण्यात येईल. [म्हणजेच ७४ टक्के भांडवल इतर वैध मार्गाने उभारुन आणि प्रचलित नियमानुसार ४९टक्के निर्मित-वीज वीजकंपनीस देऊन एखादी संस्था कॅप्टीव जनरेटींग प्लॅंट बाळगू शकेल अशी तरतूद त्यावेळी केलेली होती.]
२(१२) [को-जनरेशन]-सहनिर्मिती :-एकाच प्रक्रिये दरम्यान वीजनिर्मितीसह किंवा वीजनिर्मितीशिवाय एकाचवेळी दोन किंवा दोनपेक्षा अधिक ’उपयुक्त-उर्जेची’ निर्मिती होत असेल तेव्हाच या प्रक्रियेत “सहनिर्मिती” होत आहे असे समजावे.
२(१४) [कॉन्झरवेशन]-“उर्जा-संतुलन” :-विद्युत उर्जेचा संतुलित वापर व्हावा म्हणून वीजवापराची किंवा वीजपुरवठ्याची कार्यक्षमता वाढवल्यामुळे वीजेच्या खपात होणार्‍या घटीस “उर्जा-संतुलन” असे समजावे.
२(१५) ग्राहक:-ग्राहक कुणाला म्हणावे ते या व्याख्येने स्पष्ट केले आहे. शासनाने किंवा अनुज्ञाप्तीधारक कंपनीने किंवा या कायद्यानुसार वीजपुरवठा करण्याचा व्यवसाय करणार्‍या कोणाही व्यक्तीने किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यान्वये वीजपुरवठा वापरणारी व्यक्ती किंवा इतर कोणीही व्यक्ती, जिच्या संचमांडणीस वीज पुरवठा करण्यासाठी ती संचमांडणी शासनाच्या किंवा वीजकंपनीच्या वीजपुरवठासंचास जोडली असेल, अशी त्या संचमांडणीची उपभोक्ती व्यक्ती होय. [म्हणजे ती संचमांडणी ज्या व्यक्तीच्या ताब्यात असेल, जी त्याचा उपभोग घेत असेल मग ती मालक असेल किंवा भाडेकरू असेल तरी ती ग्राहक असेल असा याचा अर्थ होतो.]
२(१९)[डिस्ट्रीब्युशन सिस्टिम]-वितरण प्रणाली :- पारॆषण (ट्रॅन्समिशन) वाहकावरील वीजवितरणाचा बिंदू किंवा वीजनिर्मिती केंद्रास जोडण्याचा बिंदू आणि ग्राहक-संचमांडणीचा आरंभ बिंदू यास जोडावयाच्या इतर सुविधेसह असणारी वायर-प्रणाली होय.
[आपण रोजच्या व्यवहारात पारेषण, वीजवितरणाचा बिंदू (डिलिवरी पॉईंट्स), सुविधा (फॅसिलिटीज) या तांत्रिक शब्दांचा आवर्जुन उपयोग केला तर या व्याख्या समजण्यात अडचण येणार नाही.अन्यथा हे सर्व अगम्य आणि बोजड वाटण्याचा संभव असतो.]
२(२०)[इलेक्ट्रीक लाइन]-विद्युत वाहिनी:- कोणत्याही कारणासाठी वीज-वाहून नेण्याकरीता वापरण्यात येणारा वाहक आणि त्याला आधार देणारे खांब, मनोरा इ.सह वीज वहनासाठी येथे जोडलेली इतर सर्व यंत्रोपकरणे व सामुग्री यांचा यात समावेश होतो.
२(२२) [इलेक्ट्रीक प्लॅंट] विद्युत साधन सामग्री:- पारेषण, वितरण किंवा वीजपुरवठयासाठी वापरण्यात आलेले कोणतेही विद्युत साधन,यंत्र,उपकरण याचा यात समावेश असेल.मात्र वीजवाहिनी,विद्युत उर्जामापक,आणि ग्राहकाच्या नियंत्रणात असलेल्या इतर विद्युत उपकरणाचा यात समावेश नसेल.[म्हणजे वीज निर्मिती पासून ग्राहकाच्या वीजपुरवठ्याच्या आरंभ बिंदूपर्यंत वापरण्यात आलेल्या सर्व साधनसामग्रीचा,यंत्रोपकरणाचा यात समावेश असतो.]
२(३०)[जनरेटींग स्टेशन]-विद्युत जनन केंद्र:-आरोहित्र (स्टेपप ट्रॅन्स.),स्विचगियर,स्विचयार्ड,केबलसह वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणार्‍या / ठरवलेल्या आवारासह, इतर संबंधीत कोणतीही इमारत/वसाहत, संबंधीत जलाशय आणि अन्य सर्व (स्थापत्य,यांत्रिकी,विद्युत)इ.अनुषंगिक कामे यांचा यात समावेश असेल.मात्र उपकेंद्राचा यात समावेश नसेल.
२(४१)[लोकल अथॉरिटी]-स्थानिक प्राधिकारी:-ग्रामपंचायत,नगरपालिका,महानगरपालिका किंवा राज्य/केंद्र शासनाच्या नियंत्रणाखाली एखाद्या क्षेत्रासाठी अधिकृतपणे जबाबदारी सोपवलेला अधिकारी किंवा बंदर आयोगा सारखे कायदेशीर अधिकारी हा स्थानिक प्राधिकारी असेल.
२(४९)[पर्सन]-व्यक्ती:- कोणतीही कंपनी,सामुदायक मंडळ किंवा संघटन,व्यक्तिगत संयुक्त मंडळ किंवा न्यायालयीन नियुक्त व्यक्तीचा या व्याख्येत समावेश असेल.[ही व्याख्या काळजीपूर्वक पहा. “व्यक्ती” म्हटल्यावर आपल्या मनासमोर काय येते आणि या व्याख्येने काय अभिप्रेत आहे ते समजून घेणे आवश्यक ठरते.]
२(५०)[पॉवर सिस्टिम]-शक्ति प्रणाली:- निर्मिती केंद्र,पारेषण वाहिनी,उपकेंद्र,जोड-वाहिन्या,भार-प्रेषण उपक्रम (लोड-डिस्पॅच अक्टीविटी),मुख्य वा इतर वितरण वाहिनी,उपरी तारमार्ग,सर्वीस लाईन्स,आणि कामे यापैकी काहीसह निर्मिती,पारेषण,वितरण यांच्या विविध अंगासह वीजपुरवठा करणारी यंत्रणा यांचा यात समावेश असेल.
येथे आपण मोजक्याच काही शब्दांच्या-शब्दसमुहांच्या व्याख्यांची माहिती घेतली आहे.नमुन्यादाखल पाहिलेल्या या व्याखेवरून आपल्याला येथे दिलेल्या व्याख्या कशा व किती महत्वाच्या आहेत हे ध्यानात येईल असे वाटते.तसेच मूळ कायदा[अधिनियम] हे इंग्रजीत असल्याने एखाद्या शब्दाचा,वाक्यांशाचा काय अर्थ घ्यायचा याबाबतचे स्पष्टीकरण तेथे त्या भाषेत जे दिले असेल तेच ग्राह्य धरावे असे स्पष्ट निर्देश संशयास्पद स्थिती टाळण्यासाठी म्हणून दिलेले असतात.
मराठी ही समृद्ध भाषा आहे. तिचे शब्दवैभव जरी अफाट असले तरी रोज अनेकानेक तांत्रिक शब्दांची भर पडत आहे. त्याअनुषंगाने आपण जाणिवपूर्वक जेथेजेथे शक्य असेल तेथेतेथे सुलभ मराठी शब्द वापरण्याचा निर्धार करूया. म्हणजे तांत्रिक बाबी सुद्धा सहजतेनं आपल्याला मराठीत मांडणं सोयीचं होईल.

Advertisements
विद्युत कायद्यातील काही व्याख्यांचा आढावा. वर टिप्पण्या बंद

होमिओपॅथी महाविद्यालयाची दयनीय अवस्था !

होमिओपॅथी
महाराष्ट्रातील होमिओपॅथी महाविद्यालयाची अवस्था विद्यार्थी व शिक्षकाअभावी दयनीय झाल्याची बातमी आज वर्तमानपत्रात वाचली. तसं याआधी पण अशा प्रकारच्या बातम्या वाचनात आल्या होत्या. आता होमिओपॅथी महाविद्यालयाच्या इमारतीचे ४-५ मजले गायब झाले असल्याची बातमी वाचली आणि तेव्हा शेतातल्या विहिरी गायब झाल्याचे वाचले होते, त्यामुळे डॊक्याला हात लावायची पाळी माझ्यावर आली. पायाभूत सुविधांच्या अभावामुळे दर्जाहिन शिक्षणाकडे सगळयानीच पाठ फिरवली. हे झाली काही कारणं पण अजून एक महत्वाचं कारण आहे तिकडं कोणीच लक्ष देत नाही असं कां ? हा प्रश्न मनात आल्याशिवाय रहात नाही. तो म्हणजे या पॅथीच्या विश्वासार्हतेचा !
१७९० मध्ये सॅम्युएल हानेमान यानी या पॅथीचा पाया घातला. मलेरियासाठी उपयोगी पडणारे, सिंकोना झाडापासून तयार केलेले क्विनाइन त्याने स्वतः टॉनिक म्हणून घेण्यास सुरूवात केली तेव्हा त्यास मलेरीयाची लक्षणे जशी असतात त्याप्रमाणे थंडी भरून आली.यावरून त्याने निष्कर्ष काढला की ज्या औषधाच्या सेवनामुळे जी लक्षणे शरीरात निर्माण होतील त्या लक्षणाच्या रोगावर त्याचा ईलाज करता यॆईल. यासाठी त्याने “लाईक क्युअर्स लाईक” असं सूत्र मांडले. तसेच त्या औषधाची मात्रा जशी उणावत नेऊ [पातळ करु] तसं ते औषध रोगावर जास्त परीणामकारक ठरेल आणि इतर दुष्परीणामही कमी होतील असं त्याने जाहीर केलं. त्याचबरोबर ते पातळ औषधीद्रव्य जितके जोरात हलवू तितके ते जास्त परीणामकारक [पोटेंशी] होईल असंही त्यानं जाहिर केलं.
जोरात हलवून पातळ औषधाची [पोटेंशी] शक्ती वाढवणे-
त्याच्या या उपचार पद्धतीसाठी १८०७ मध्ये हानिमानने ’होमिओपॅथी’ या शब्दाची योजना केली. मराठीत त्यास समचिकित्सा असं म्हणता येईल. रोगाच्या लक्षणासारखी लक्षणं निर्माण करणारे औषध देऊन तो रोग बरा करणे म्हणजे समचिकित्सा होय. यासाठी औषध तयार करण्याची रीत पाहिली की आपल्याला बर्‍याच गोष्टी ध्यानात येतील. एका परीक्षानळीत मूळ औषधाचे १०० रेणू घेतले असं समजू. ते औषध दुसर्‍या परीक्षानळीत एकास दहा या प्रमाणात उर्ध्वपातीत जलाने पातळ केले आणि जोरजोरात हलवले की त्याची [पोटेंशी] रोग बरे करण्याची शक्ती वाढते असं समजले जाते.या दुसर्‍या परीक्षानळीतील १० औषधी-रेणूच्या मिश्रणास १x असं म्हणतात. आता तिसर्‍या परीक्षानळीत १x मिश्रण घेऊन ते एकास दहा या प्रमाणात उ.जलाने पातळ करून जोरजोरात हलवले की या १ औषधी-रेणुच्या मिश्रणाची [पोटेंशी]शक्ती २x झाली असं समजलं जातं.आता चौथ्या परीक्षानळीत २x मिश्रण घेऊन ते एकास दहा या प्रमाणात उ.जलाने पातळ करून जोरजोरात हलवले की शून्य औषधी रेणूच्या मिश्रणाची [पोटेंशी] शक्ती ३x झाली असं समजतात. आणि अशा रीतीने ही पोटेंशी वाढवण्याची प्रक्रिया पुढे ४x,५x ——साठी चालू राहते.
येथे x याचा अर्थ १० असा असतो. म्हणून ४x याचा अर्थ हे औषध १०चा चतुर्थ घात इतकं ते पातळ करण्यात आलं आहे. होमिओपॅथिक औषधनिर्माते मूळ औषधाचा एक भाग ९९ भाग उ.जलात मिसळून ते पातळ करतात. याला १०० [पोटेंशीचं]शक्तीचं औषध म्हणजेच १C [पोटेंशीचं]शक्तीचं औषध म्हणतात. पुनःपुन्हा पातळ करून ते २C, ३C.४C—–इत्यादी [पोटेंशीचं]शक्तीची औषधं तयार केली जातात.बाजारात ३०C [पोटेंशीची]शक्तीची औषधं उपलब्ध असतात.याचा अर्थ या औषधामध्ये मूळ औषध १००चा ३०वा घात म्हणजेच १०चा ६० वा घात इतकं अल्पांश [पातळ केलेलं असल्यामुळे]असतं.किंबहूना जवळजवळ काहीच नसतं.कसं ते पहा .
आता याचं विश्लेषण असं होतं की एक ग्रॅम मूळ औषधात १०चा २४ घात इतके रॆणू असतात आणि ते पातळ करतात १०चा ६० घात इतकं.म्हणजे त्यातील रेणूंच्या एकूण संखेच्या कितीतरी अधिकपट ते पातळ केलेले असते. म्हणजेच ३०c होमिओपॅथिक औषधात शुद्ध पाण्याशिवाय काहीच नसतं असं गणिताने सिद्ध होतं.आणि म्हणूनच संशोधक होमिओपॅथिक उपचार पद्धतीस कशी मान्यता द्यावी असा प्रश्न विचारतात. प्लेसबो परीणामाची ताकद इतकी प्रचंड आहे की जोपर्यंत रुग्णाचा या होमिओपॅथी उपचार पद्धतीवर गाढ विश्वास आहे तोपर्यंतच ती एक चांगली पॅथी म्हणून मान्य असेल. इतकंच नव्हे तर सर्व रोगांपैकी ९० टक्के रोगी हे आपोआप- ”प्लेसबो परिणामामुळे”-बरे होत असतात.ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.एकाही रोगाबाबत महत्वाचा असा ठोस पुरावा न मिळाल्याने विविध आजारासाठी होमिओपॅथी औषधाच्या  घेतलेल्या शेकडो ट्रायल्स निरर्थक ठरल्या आहेत. त्यामुळे संशोधक,शास्त्रज्ञ या उपचारपद्धतीस संपूर्णपणे अमान्य करतात.मग या औषधाने आजार बरा झाला असं वाटतं याचं गुपित समजण्यासाठी   प्लेसबो म्हणजे काय याची माहिती करून घेणं आवश्यक ठरतं. त्यासाठी अधोरेखीत प्लेसबो शब्दावर क्लिक करा.

हे सारं ध्यानात घेतलं तर होमिओपॅथी महाविद्यालये आजारी कां आहेत ते लक्षात यायला वेळ लागणार नाही.असं जर आहे तर हे जनता जनार्दनाच्या समोर कां मांडण्यात येत नाही ? कशाला अशा महाविद्यालयावर जनतेचा पैसा खर्च करावा? यावर भारतीय विद्वानानी, विचारवंतानी चर्चा करुन योग्य तो मार्ग काढला पाहिजे असं वाटत नाही कां? सत्य कटू असतं ते असं !

pl.reqad this http://www.guardian.co.uk/lifeandstyle/2010/jan/29/sceptics-homeopathy-mass-overdose-boots

होमिओपॅथी महाविद्यालयाची दयनीय अवस्था ! वर टिप्पण्या बंद

सातपातकं !

सातपातकं-”त्यात-विस-पचामा”
पाप आणि पुण्य याविषयी कोणी बोलू लागलं की लोक त्याला वेड्यातच काढतात. कसलं पाप आणि कसलं पुण्य ? असं काही नसतं असं म्हणून अनेक उदाहरणं देऊन पटवण्याचा प्रयत्न सुरू होतो. अमक्याने अमुक इतक्या वाईट गोष्टी केल्या तरी तो मजेत जगतोय. तमक्यानं लोकांना इतकी मदत करूनही तो दुःखात, हाल-अपेष्टात दिवस काढतॊय. इत्यादी. आपल्याला पण मग वाटायला लागतं, खरं काय ? हे की ते ? विचारवंत,संत, महंत यांचं काय सांगणं असतं या बाबत ? त्यांच्यातही एक वाक्यता कोठे आहे ? तेही एकमेकांना नावं ठेवत असतात. मी सांगतो ते बरॊबर, माझ्या मार्गानं गेलात तर तुम्हाला निश्चित मुक्ती मिळणार,वगैरे.
महात्मा गांधीनी सात पातकांचा उल्लेख केला आहे. ”त्यात विस पचामा” चा अभाव हि ती सात पातके आहेत असं ते म्हणतात.त्याग,तत्व,विवेक,सचोटी,परिश्रम,चारित्र्य आणि मानवता या अभावी केलेली कर्मे ही पातके होत असं ते ठासून सांगतात. म.गांधीजीनी एकेका तत्त्वाचा संबंध एकेका व्यवसायाशी जोडलेला आहे. हे कुणाला पटेल कुणाला नाही पटणार ! पण ते काय म्हणतायत ते समजून घ्यायला काय हरकत आहे ? नंतर ठरवता येईल काय करायचे ते ! नाही का? ”त्यात विस पचामा” !
त्यागाशिवाय केलेल्या उपासनेला काहीही अर्थ नाही. त्याग न करता उपासना करणे म्हणजे ते पातकच होय असं म. गांधीजी म्हणत. उपासना करायची असेल तर ती तन,मन,धन अर्पून करावी असं साधू संतानीपण सांगितले आहे. जरा विचार केला तर या म्हणण्यात बरेच तथ्य आहे असं आपल्याला दिसून येते. विद्येची उपासना करायची आहे त्याग करावा लागेल.सत्कर्माची उपासना करायची आहे त्याग करावा लागेल. त्याग करून,लोक कल्याण साधणारं असं जे प्राप्त होईल ते पुण्यप्रद असेल.अन्यथा ते पापच ठरेल. जे कर्म लोक-कल्याणासाठी असेल तेच श्रेयस्कर होय.
तत्वाशिवाय राजकारण म्हणजे पातक होय.तत्वहिन राजकारणाला गांधीजीनी पापकर्म संबोधलं आहे. राजेशाहीत राजा आपल्या राजधर्माचं पालन करण्याचा प्रयत्न करत असे.त्याच्यावर तसे संस्कार होत असत.प्रजेच्या सुखासाठी राजा स्वतःचं बलिदान द्यायलाही मागे पुढे पहात नसे. आजचे राजकारणी काय करत आहेत? समर्थ रामदास म्हणतात-जाणावे पराचे अंतर । उदासीनता निरंतर । नीतिन्यायासी अंतर ।पडोच नेदावे॥ [दासबोध द११स५/६]. नीतिन्यायाशिवाय राजकारण करणे हे अनुचित होय. दुःख दुसर्‍याचे जाणावे । —बरे वाईट सोसावे । समुदायाचे ॥ असं तत्वाचं राजकारण करावे. असा प्रेमळ सल्ला समर्थ देतात. आणि म्हणूनच गांधीजी तत्वाशिवाय राजकारणाला पातक म्हणतात.
विवेकाशिवाय (आनंद)मौजमजा भोगणे म्हणजे पातक कर्म होय.[pleasure without conscience.] हे तिसरं कर्म अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटते. विवेक म्हणजे सद्‍सद्विवेक होय. सद्‍सद्विवेकाशिवाय मौजमजेसाठी जे कर्म होईल ते पापकर्मच होय. मिरवणूक काढणे, रंग खॆळणे, महोत्सव साजरा करणे इ. मध्ये सद्‍सद्विवेक जागृत ठेऊन इतरांना त्रास हॊणार नाही, नियमांची पायमल्ली हॊणार नाही अशा पद्धतीने आनंद उपभोगणे अपेक्षित असते. पण जेव्हा विवेकाशिवाय केलेल्या कर्मातून आनंद-मौजमजा मिळते ते पातक कर्मच असते, हे ध्यानात घेणे आवश्यक्क आहे.
सचोटीशिवाय उद्योग,व्यापार करणे म्हणजे पातक कर्म होय. उद्योग,व्यवसाय,व्यापारामध्ये सचोटी शिवाय यश मिळत नाही. आपण एकदाच एखाद्यास फसवू शकता, पण फसणारा पुन्हा आपल्याकडे येत नाही,इतकेच नव्हे तर तो इतरांनाही आपल्या पापकर्माबाबत जागे करून आपल्याकडे येण्यास मज्जाव करतो.परीणाम आपल्या व्यवसायावर होतो. व्यवसाय वाढीसाठी सचोटीची आवश्यकता असते. सचोटी असेल तर बाजारार आपल्या शब्दाची किंमत वाढते. त्यालाच आपण पत असं म्हणतो.
परिश्रमाशिवाय संपत्ती मिळवणे हे पातक कर्मच होय. भ्रष्टाचार हे या पातक कर्माचं ज्वलंत उदाहरण होय.आजरोजी या पातक कर्माचा सर्वत्र संचार झाला आहे. याचा संबंध नीतिमत्तेशी आहे. नीतिमत्ता गुंडाळून ठेवली की हे पातक कर्म वाढीस लागतं. संतसज्जनानी अशा प्रकारे परिश्रमाशिवाय संपत्ती मिळवण्यास प्रतिबंध केला आहे. अशा संपत्तीचा उपभोग घ्यायला सगळे पुढे असतात पण त्यामुळे होणार्‍या पापामध्ये वाटेकरी हॊण्यास कोणी पुढे येत नसते.
चारित्र्याशिवाय ज्ञानसंपादन हे पातक कर्मच होय. ज्ञानदान सत्पात्री करावे असं म्हंटलं जातं. ज्याला ज्ञान द्यावयाचे त्याने त्या ज्ञानाचा उपयोग समाजकल्याणासाठी केला पाहिजे. उदा- अणुउर्जेचा वापर चारित्र्यवान व्यक्ति मानवी जीवन सुखावह करण्यासाठी करेल तर दुष्ट व्यक्ती या ज्ञानाचा उपयोग संपूर्ण समाजास वेठीस धरण्यासाठी करेल.विमान विद्या, रसायन विद्या,स्फोटक विद्या,मानसोपचार शास्त्र इत्यादी सर्व विद्या अविचारी /दुष्ट व्यक्तींच्या हाती पडली तर काय होतं ते समा्ज अनुभवतोय. याप्रमाणे कोणतंही ज्ञान असो ते मिळवणारी व्यक्ती चारित्र्यवान असली पाहिजे. वैद्यकीय ज्ञान,भौतिक विज्ञान,गणित ज्ञान,इ.प्रत्येक शाखेतील ज्ञानसंपादन करणारी व्यक्ती ते घेण्यास योग्य, लायक, आणि चारित्र्यवान असावी. अन्यथा हे पातक कर्म घडेल. मला हे दुधारी पातक कर्म वाटते. ज्ञानदान करणारा आणि ज्ञानसंपादन करणारा असे दोघेही पातक कर्म करतात असं वाटतं. म. गांधीजी या पातक कर्माला knowledge without character असं संबोधतात.
मानवनिरपेक्ष विज्ञान हे पातक कर्म होय. विज्ञानातील शोध हे मानवाच्या उन्नत्तीसाठी,मानवी जीवन सुखावह करण्यासाठी असले पाहिजेत. प्रत्यक्षात मात्र यापेक्षा वेगळी परिस्थिती आढळते. अणुबॉंम्बने संपूर्ण गावेच्या गावे बेचिराख करण्याचे, अवघे जीवन उध्वस्त करण्याचे कारणच काय ? काय साध्य झाले यामधून ? या गावातील सर्वसामान्यांनी असा कॊणता गुन्हा केला होता म्हणून त्यांना या अणूबॉम्बच्या वर्षावास सामोरं जावं लागलं ? म्हणून विज्ञानाची मानवनिरपेक्षता म.गांधीना पापकर्म आहे असं वाटते.
वरील “त्यात विस पचामा”ची पातक कर्मे आपल्या हातून घडणार नाहीत याची काळजी आजचा माणूस घेईल का? असा प्रश्न येतोय का मनात? येत असेल तर आपल्याला गांधीजींच म्हणणं पटतय असं समजायला हरकत नाही. अन्यथा ——!!!

Pl.follow this link http://www.doctorhugo.org/gandhi.html

सातपातकं ! वर टिप्पण्या बंद

तांत्रिक महाविद्यालयीन योजनांद्वारे सामाजिक विकास-एक नम्र आवाहन !

तांत्रिक महाविद्यालयीन योजनांद्वारे सामाजिक विकास-एक नम्र आवाहन !
केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने सामाजिक विकास साधण्यासाठी एक उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी तांत्रिक महाविद्यालयीन योजनांचा उपयोग करून घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय-कौशल्य विकसन मंडळाने इ.स.२०२० पर्यंत ५००दशलक्ष कुशल कर्मचारी तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.मंडळाचे हे ध्येय साध्य करण्यासाठी विविध मंत्रालयीन विभागांनी कंबर कसली आहे.[http://www.education.nic.in/tech/Guidelines-CDTP.pdf येथे संपुर्ण तपशिल पहा]
या योजनेची मुख्य वैशिष्ट्ये आणि उपक्रम असे असतील–
१) तंत्रशास्त्र आणि प्रशिक्षण याची किती गरज आहे याचा शोध घेणे
२) निवड केलेल्या गटास कौशल्य-विकसन प्रशिक्षण देणे.
३) उत्पादनात वाढ व्हावी म्हणून उचित तंत्रशास्त्राचा प्रसार करणे.
४) झोपडपट्टी रहिवाशी आणि खॆडूत लोकांना तांत्रिक व इतर सहाय्यक सेवा उपलब्ध करून देणे.
५) महत्वाच्या आणि अत्याधुनिक तांत्रिक प्रगतीबाबत संबंधित गटास माहिती देणे
.
वरील उपक्रम यशश्वी करण्यासाठी तांत्रिक महाविद्यालयाची निवड करण्यात येईल आणि त्यांचे मार्फत त्या भागाची तांत्रिक गरज काय आहे याचा शोध घेण्यात येईल. तिथल्या स्थानिक गरजांनुसार व मागणीनुसार प्राधान्याने विविध व्यावसायिक-तांत्रिक कौश्यल्याचे ३ते६ महिने कालावधीचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येईल. असे कुशल प्रशिक्षित स्वयंरोजगार निर्माण करु शकतील अशी व्यवस्था करण्यात येईल. त्यासाठी संबंधीत इच्छुक गटास योग्य ते तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येईल.
तांत्रिक आणि सहाय्यक सेवा-
ग्रामीण भागात हल्ली विविध प्रकारची यंत्रसामुग्री वापरली जाते. त्यात शेतीसाठी तसेच बिगर शेतीसाठी म्हणून अद्यावत यंत्रोपकरणांचा समावेश होतो. अशा यंत्रोपकरणांची देखभाल,दुरुस्ती आणि डागडूजीची सोय त्याच भागात होण्यासाठी तांत्रिक महाविद्यालयानी पुढाकार घेऊन याविषयांचे अद्यावत प्रशिक्षण देण्याची योजना आखली पाहिजे, असं शासनाचं धोरण आहे. यात खालिल गोष्टींचा प्रामुख्याने समावेश असेल.
१) यंत्रोपकरणांची जागेवरच किरकोळ दुरुस्ती व देखभाल.
२) ग्रामसमुहास तांत्रिक सेवा देणारी सेवाकेंद्रे.[सर्विस सेंटर्स]
३) अशी सेवाकेंद्रे आणि दुरुस्ती केंद्रे यात प्रामुख्याने ग्रामस्थांचा सहभाग राहील असे पाहणे.
४) ग्रामीण भागात ठराविक दिवसांच्या अंतराने तांत्रिक सेवा मेळावे भरवणे.
५) प्रशिक्षित मनुष्यबळाचा वापर करून ग्रामीण स्तरावर तांत्रिक सल्ला-सेवा उपलब्ध करुन देणे.

यासाठी ग्रामीण स्तरावर ग्रामस्थांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी शेतकरी मेळावे,प्रदर्शने,चर्चासत्रे इ. आयोजन करण्यात येईल. रेडिओ, टि.व्ही, व्हि.डी.ओ.वर्तमानपत्रे, जाहिराती वगैरे, या माध्यमांचा मुक्त हस्ते वापर करण्यात येईल.
आर्थिक पाठबळ-
ही सामाजिक विकासाची ही योजना राबवण्यासाठी तांत्रिक महाविद्यालयाची [पॉलिटेकनिक्स] निवड करण्यात येईल.केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या-उच्च शिक्षण विभागातर्फे [Ministry of Human Resourses Developement -Dept.of Higher Education] जास्तीत जास्त २० लाख रुपयांचे अनुदान तांत्रिक महाविद्यालयाच्या प्राचार्याकडे/ संचालकाकडे देण्यात येईल.तसेच दरवर्षी पुनरावृत्ती अनुदान म्हणून जास्तीत जास्त १७ लाख रूपये देण्यात येतील. अशा प्रकारची आर्थिक तरतूद या मंत्रालयाने केलेली आहे.
या योजनेचा लाभ घेण्याची पात्रता-
[AICTE] ने मान्यता दिलेली तांत्रिक महाविद्यालयाना या योजनेत भाग घेता येईल.पूर्वोत्तर राज्ये,डोंगराळ आणि सीमावर्तीय भाग आणि मागासवर्गीय अनुसूचित-जाती-जमाती,[SC/ST]अल्पसंख्यांकाचे जिल्हे-येथील तांत्रिक महाविद्यालयाना [पॉलिटेक्निस] प्राधान्य देण्यात येईल.
वरील योजनेची अंमलबजावणी प्रभावी झाल्यास देशाचा विकास आणि भरभराट हॊण्यास हातभार लागेल. हा दृष्टीकोन समोर ठेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,लोणारे, महाड,जिल्हा रायगड यांच्या सहकार्याने ”सर्वांगिण मोफत प्रशिक्षण प्रतिष्ठान, शिवथरघळपायथा,ता.महाड जि.रायगड” ही संस्था गेली पाच वर्षे निरलसपणे आणि समर्पित भावनेने विद्युत तांत्रिक मोफत प्रशिक्षणाचा लाभ रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील काही शाळांतील विद्यार्थीना देत आहे. यामध्ये प्रामुख्याने इयत्ता ९वी आणि १० वी च्या इच्छुक मुलांची निवड विद्युत तांत्रिक प्रशिक्षणासाठी करण्यात येत असते. या विद्युत तांत्रिक मोफत प्रशिक्षणासाठी प्रतिष्ठान ने दक्षवीजतंत्री ही पुस्तिका मोफत उपलब्ध करून दिलेली आहे.[याची माहिती देणारा लेख येथे वाचा-[ https://savadhan.wordpress.com//2010/01/30/वीजतंत्री-मोफत-प्रशिक्ष किंवा http://mr.wordpress.com/tag/social/ ] परीणामस्वरूप या भागात विद्युत तांत्रिक विषयाशी संबंधीत कामासाठी वायरमन,इलेक्ट्रीशियन यांची उपलब्धता वाढत असल्याचे दिसून येत आहे. हे दृश्य केंद्र शासनाच्या धोरणांशी सुसंगत असेच आहे.
आम्ही या पत्रकाद्वारे नम्र विनंती करतो की आपल्या सहभागासह केंद्र शासनाच्या अनुदानाचा लाभ घेऊन अशा प्रकारचे मोफत प्रशिक्षण इतर व्यावसायिक विषयासाठी [जसे- वेल्डर,मोटर-रिवांडींग,विद्युत उपकरणे-दुरुस्ती व देखभाल,हाऊस वायरींग इ.] राबवण्यासाठी समाजातील विद्युत कंत्राटदार, विद्युतव्यावसायिक,  विद्युतसंघटना, उत्पादक आणि इतर सर्व प्रकारचे उद्योजक यानी पुढे येऊन शासनाचा हा उपक्रम यशस्वी करण्यास हातभार लावावा. जेणेकरून त्याभागात या प्रशिक्षित मनुष्यबळाचा उपयोग आपण आपल्या व्यवसाय वाढीसाठी करू शकाल. आणि याचसाठी येत्या ४-६ महिन्यात विद्युत व्यावसायिकांचा मेळावा घेण्याचा आमचा मानस आहे.या कामात महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या  विद्युत कंत्राटदार महासंघाने सक्रिय सहभाग घेण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

सुरक्षित-गॅस सिलिंडर

Posted in सामाजिक,सुरक्षा by savadhan on 08/04/2010
Tags: ,

सकाळी सहजच नेहमीप्रमाणे फिरत निघालो होतो.एप्रिलची एक तारीख होती.रस्त्यावरच गॅस सिलींडरची गाडी उभी होती. गाडी ओलांडून पुढे जाईपर्य़ंत गाडीतील हमालाने वरून एक सिलिंडर रस्त्याच्या कडॆला टाकले.उत्सुकतेपोटी गॅस सिलिंडरचे मी निरीक्षण करू लागलो.दोन दिवासापूर्वीच याविषय़ी एक इंग्रजी लेख मी वाचला होता. त्यानुसार घरातला गॅस सिलिंडर मी आधीच पाहिला होता.मनात विचार आला की इथं आता बरीच सिलिंडर्स आहेत,तेव्हा पाहूया जरा तपासून !
खाली टाकलेल्या सिलिंडर रिंगच्या तीन पैकी एका बाजूवर A10 असं लिहिलं होतं. सिलिंडर वितरकांन ते सिलिंडर बाजूला काढून ठेवलं होतं.मला वाटलं कुणा ग्राहकाला देण्यासाठी म्हणून ते बाजूला काढून ठेवलं असावं.एवढ्यात नेहमीचा ओळखीचा माणूस तेथे आला आणि त्याने ते सिलिंडर ग्राहकाला देऊ नका म्हणून सांगितलं.ओळखीच्या या माणसास आम्ही ”मामा” म्हणून संबोधतो.सहजच ऊत्सुकतेपोटी मी विचारले,” काय मामा,हे सिलिंडर का बाजूला काढलाय हो? तेव्हा त्यानी सांगितले की ते वापरण्यायोग्य राहिले नाही म्हणून. मला जरा बरं वाटलं की हे लोक खरोखरच सिलिंडर बारकाईनं तपासून ग्राहकांना देत आहेत. चांगली गोष्ट आहे.
आपल्यापैकी बहूतेकांना सुरक्षिततेची ही बाब माझ्याप्रमाणेच माहित नसावी असं मला वाटतं. मी वाचलेल्या लेखानुसार “A10” असं लिहिलेलं सिलिंडर कालबाह्य झालेलं आहे हे माझ्या पण लक्षात आलं होतं. अशा प्रकारे प्रत्येक सिलिंडर रिंगच्या बाजूवर वर नमूद केल्याप्रमाणे एक सुरक्षा-दर्शक अक्षरांक लिहिलेला असतो. त्यावरून हे सिलिंडर वापरण्यास सुरक्षित आहे किंवा नाही ते या कोडवरून समजते. या कोडमधील ABCD ही अक्षरे वर्षाच्या चार तिमाहीचा निर्देश करतात. म्हणजे जाने ते मार्च ही तिमाही A या अक्षराने,एप्रिल ते जून B ने,जुलै ते सप्टेंबर C ने आणि ऑक्टोबर ते डिसेंबर D अक्षराने दर्शवतात. त्यापुढील दोन अंक हे वर्षाचा निर्देश करतात.वरील कोडमधील 10 चा अर्थ इ.स.२०१० असा होतो. आता या कोडचा सुरक्षा संदेश असतो —A10 अशी खूण असलेले हे सिलिंडर मार्च २०१० पर्यंत वापरणे सुरक्षित असते. त्यानंतर ते वापरणे धोकादायक असते.तसेच B10 खूणेचे सिलिंडर जून२०१० पर्यंत सुरक्षित, C10 खूणेचे सप्टेंबर २०१० पर्यंत, D10 खूणेचे सिलिंडर डिसेंबर २०१० पर्यंत वापरणे सुरक्षित असते. थोडक्यात तो अक्षरांक त्या सिलिंडरचे सुरक्षित वापराचे आयुर्मान दर्शवत असतो. इत्यादी इत्यादी.
थोडक्यात या खुणा पाहूनच गॅससिलिंडर घेण्याची दक्षता आपण घेतली पाहिजे हे ध्यानात घ्यावे. सिलिंडर रिंगच्या बाजूवर नमूद केलेला हा अक्षरांक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचा असतो. तो त्या सिलिंडरची कालबाह्यता सांगतो. कालबाह्य झालेलं सिलिंडर वापरणे धोकादायक असते.
हे झालं सुरक्षित सिलिंडरबाबत.पण वितरकाने चुकून ग्राहकास असुरक्षित झालेलं किंवा थोड्याच दिवसात होऊ शकणारं गॅस सिलिंडर दिलं तर काय करायचं ते मात्र माझ्या वाचनात आल नाही. आपल्याला याविषयी माहिती असल्यास अवश्य सांगा बरं का?

सुरक्षित-गॅस सिलिंडर वर टिप्पण्या बंद

दुधाचे भाव वाढले पुढे काय ?

हल्ली वर्तमानपत्र वाचायला घेतलं रे घेतलं की भाव वाढल्याची बातमी हमखास माझ लक्ष वेधून घेते. आज काय भाज्यांचे भाव वाढले, तर कधी दूधाचे भाव वाढले.अशीच “जिल्हा दूध संघाने खरेदीचे दर वाढविले” ही बातमी.आताशा ’दर वाढले’ असे शब्द वाचले की पोटात गोळा उठतो. आपल्याला अजून कोठे काटकसर करावी लागणार याचा विचार सुरू होतो. सेवानिवृत्त होताच मोटारसायकल बंद करून जास्तीत जास्त पायी चालण्याचा परिपाठ ठेवला. जरा दूर जायचे असेल तर लवकर निघून बसनेच जायचे. अगदीच आवश्यकता असेल तेव्हाच रिक्षाचा वापर करायचा,वगैरे वगैरे. आता “दर वाढले” हे शब्द वाचताच विचार चक्र सुरु झाले. परत एकदा बातमी वाचली तेव्हा कोठे डोक्यात प्रकाश पडला की ’दूध खरेदीचे दर’ वाढले म्हणून ! मग जरा स्थिरावलो, मनातच म्हंटले ” ठिक आहे, आपल्या खिशाला आज चाट नाहीए तर !” संघाने खरेदीचे दर वाढवून दूध उत्पादकांना दिलासा दिला आहे. काही हरकत नाही. त्यांचे ही काही प्रश्न असणारच नाही का? त्यांना ही जरा यामुळे चार पैसे जास्त मिळतील ! असा विचार मनात चालू होता आणि क्षणार्धात एक विचार मनात चमकून गेला सोयादूधाचा. सोयादूधाचा पर्यायी दूध म्हणून वापर करता येईल असं नुकतंच कशात तरी वाचलं होतं. पण त्यात त्याची कृती दिली नव्हती. कोठे मिळेल याची कृती ? जालकावर शोध घेऊन पहावे, असं ही एकदा मनात येऊन गेलं.असेच दोन दिवस निघून गेले. हा विषय मी विसरून पण गेलो.
घरी आलेल्या पाहुण्यांच्या पाहुणचारात दोन दिवस असेच निघून गेले. वर्तमानपत्राकडे दुर्लक्ष झाले.हे असं नेहमीच घडतं. महत्वाच्या बातम्या दूरदर्शनवर पाहायला मिळाल्याने जूने पेपर वाचण्याच्या फंदात मी सहसा पडत नाही. पण झालं काय की बेकरीतून लादीपाव आणला होता.बेकरीवाल्याने तो पेपरमध्ये बांधून दिला होता.लादीपाव काढून घेऊन तो पेपरचा तुकडा टेबलवर तसाच घडी घालून ठेवला होता. दुसर्‍या दिवशी सकाळी चहा पीत बसलो होतो तेव्हा सहजच माझं लक्ष त्या पेपरच्या तुकड्यावरील एका चौकटीकडे गेलं. विषय होता —-”सोयाबिनपासून दूध करण्याची कृती”
दूधाचे दर वाढल्यापासून लोक पर्यायाच्या शोधात असावेत असं मला जाणवलं.मी एकटाच याचा शोध घेतोय असं काही नाही. पण येथे फक्त दूध कसे तयार करतात याचीच माहिती दिली होती.मागं एकदा मी असंही वाचलं होतं की सोयाबिन मध्ये ट्रिप्सिन विरोधी घटकद्रव्य असून ते विषारी असते,त्यामुळे कच्चे सोयाबिन पचनास जड जात असते, म्हणून सोयाबिन भाजून घेतल्यास विषारी द्रव्याचा परीणाम होत नाही असं आणि पचनास पण हलके होते, असं मी वाचलं होतं.याविषयी या लेखात काहीच उल्लेख नव्हता.पण जी काही माहिती दिलेली आहे, ती केव्हांही लोकांना उपलब्ध असावी म्हणून येथे देत आहे.
निवडलेले सोयाबिन २४ तास पाण्यात भिजत घालावेत.त्याची टरफले पटकन निघण्यासाठी त्यात थोडेसे सोडियम कार्बोनेट टाकावे. टरफले काढून सोयाबिन वाळवावे.आणि मग त्याचे पीठ दळून आणावे.एक भाग सोयाबिन पीठ व तीन भाग पाणी घेऊन हे मिश्रण मिक्सर मधून फिरवून घ्यावे.तयार झालेल्या एक कप पीठाच्या मिश्रणात सात कप पाणी घालून ढवळावे म्हणजे सोया दूध तयार होईल. हे दूध नेहमीच्या दूधाइतकेच पौष्टीक असते.या दूधाचे दही, पनीर,ताक इ.तयार करता येते.शास्त्रीय दृष्टीकोनातून या दूधाची उपयुक्तता नेहमीच्या दूधाइतकीच असल्याचे आढळून आले आहे.अन्नशास्त्राच्या पुस्तकात सोयाबिनमधील प्रथिनांचे प्रमाण त्याच्या वजनाच्या ४३.२% व ४३२ कॅलरीज उष्मांक मिळतात असते असं नमूद केले आहे. माणसाला त्याच्या किलोग्रॅम मधील जितके वजन असेल तितके ग्रॅम प्रथिनांची रोज गरज असते असेही यात नमूद केले आहे.
मग हा प्रयोग करून पहायला काय हरकत आहे ? जादा माहिती येथे वाचा

http://www.soya.be/soy-milk.php

आपली अनुपस्थिती जोड्याने मारावे अशी—-!

आपली अनुपस्थिती जोड्याने मारावे अशी—-!
लग्नाची,बारशाची, समारंभाची निमंत्रणं येतात. कुणी प्रत्यक्ष घरी येऊन देतं,कुणी फोनवरुन देतं,तर कुणी निमंत्रण पत्रिका पाठवून समारंभास येण्याविषयी गळ घालतं.प्रत्येकाची एकेक तर्‍हा असते.मी प्रत्येकवेळी कोण कसं बोलवतंय याचं अगदी बारकाईनं निरिक्षण करत असतो.खरं म्हणजे यात कोण काय चूका करतंय हे पाहण्याचा उद्देश अजिबात नसतो. पण काही वेळेला काय होतं की अशी चूक आपण करत आहोत हे त्या यजमानाच्या गांवीही नसतं.निमंत्रण पत्रिकेचा एक नमूना कोणीतरी दाखवतो,त्यावर पसंतीचा शिक्का मारला जातो आणि ती निमंत्रण पत्रिका सगळ्यांना अगदी दिमाखात वाटली जाते.
मी हे असं गेली अनेक वर्षं पहात आलोय.बरोबर काय,चूक काय याविषयी दैनिकातून अनेकदा लेख लिहून आले आहेत.मग या चूका आपण टाळायला काय हरकत आहे? शिकल्यासवरल्या लोकांनाही जर आपण काय चूक करत आहोत हे ध्यानात येत नसेल तर इतर अडाणी लोकांना काय बोलणार ? म्हंटलं यावर आपण लिहिलं तर ? मी काही कोणी भाषा तज्ञ (तज्ज्ञ?) नाही. तरीही मला यावर लिहिण्याची इच्छा झालीच. त्याला कारण पण तसेच झाले.आजच मला एका सुप्रसिद्ध लेखकाच्या स्मृतीसमारोहाच्या निमित्ताने हॊणार्‍या सोहळ्यास येण्याविषयी निमंत्रण पत्रिका मिळाली. लगेच दुसर्‍याही एका कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका मिळाली. दोन्ही निमंत्रण पत्रिकेत एक वाक्य मला खुणावत होते ” आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे”. मला हे फारच खटकले. हे दोघेही माझी “उपस्थिती प्रार्थनीय” आहे असं म्हणत आहेत. म्हणजे माझी ’उपस्थिती’ प्रार्थना करण्याच्या लायकीची आहे. असं काहीतरी माझ्या मनात घोळू लागलं.मी मनाशीच विचार केला आणि अशा प्रकारच्या इतर शब्दांचा मागोवा घेतला.त्यात मला लगेच सापडलेले शब्द म्हणजे वंदनीय-वंदन करण्यायोग्य, चिंतनीय-चिंतन करण्यायोग्य,आदरणीय-आदर करण्यायोग्य, वगैरे,वगैरे. याविषयीचे माझे मत मी लगेच त्या समारोह आयोजकास कळवले. आणि हे ही सुचवले की आपल्यासारख्याच्या निमंत्रण पत्रिकेत अशा चूका हॊणार नाहीत याची कृपया काळजी घ्यावी,कारण इतर समाज आपलं अनुकरण करत असतो.
मग माझी “अनुपस्थिती” काय करण्यायोग्य असेल ? असा प्रश्न माझ्या मनात आला.अर्थात त्याचे उत्तर आपोआपच प्रार्थना न  करण्याच्या योग्यतेची असेल. म्हणजे कशी असेल? तर—जोड्याने मारण्याच्या योग्यतेची असेल असं उत्तर आलं. अरे बापरे !! खरं म्हणजे आपण प्रार्थना फक्त देवाची करतो, ईश्वराची करतो. सामान्य माणसाची प्रार्थना करण्याचा प्रश्नच येत नाही. पण  कुणीतरी, केव्हातरी ही टूम काढली.लोकांना वाटलं काय सुंदर शब्दयोजना आहे. आणि सगळेच लोक काहीही विचार न करता आपली उपस्थिती “प्रार्थनीय आहे ” असा अयोग्य शब्दप्रयोग करू लागले. मग येथे काय लिहिणे योग्य होईल असं मला एकाने फोन करून विचारले. मी त्यांना सुचवले—–“आपली उपस्थिती अपेक्षित आहे किंवा आपण उपस्थित रहावे ही विनंती किंवा आपल्या उपस्थितीने समारंभास शोभा येईल आणि आम्हाला अतिशय आनंद होईल.” आपल्याला काय वाटते ? आपले मत अवश्य कळवा. मराठी समृद्ध आहेच तिला आणखी समृद्ध करुया !!

परदेशी विद्यापीठे व मोफत शिक्षण !

परदेशी विद्यापीठे व मोफत शिक्षण !
भारतासारख्या विकसनशील देशात आता परदेशी विद्यापीठे शिक्षणासाठी उपलब्ध होत आहेत.या विद्यापीठातून भारतातील खुल्या गटातील गुणवंत विद्यार्थ्याना सहज प्रवेश मिळेल. गुणवंत विद्यार्थ्यांवर त्यामुळे इकडे तिकडे भटकण्याची वेळ येणार नाही. आरक्षणामुळे खुल्या गटातील गुणवंत विद्यार्थ्याना हव्या त्या ठिकाणी आणि हव्या त्या विषयाच्या अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यात अनेकदा अडचणी येत होत्या त्या अडचणीचं आपोआपच निराकरण होईल.एका दृष्टीने विचार करता परदेशी विद्यापीठांचे भारतातील आगमन हे अनेक चांगल्या गोष्टीस खत पाणी घालणारे ठेरावे अशी अपेक्षा आहे.अगदी दोनच दिवसापूर्वी महाराष्ट्रातील एका विद्यापीठातील पदवीपरीक्षेच्या परीक्षा सुरू झाल्यावर, विद्यार्थ्यांनी कॉपी करण्यास परवानगी दिली नाही म्हणून परीक्षेवर दोन-तीन तास बहिष्कार घातला अशी बातमी दैनिकात झळकली होती.नंतर त्या मुलांनी परीक्षा दिली किंवा नाही याविषयी माझ्या वाचनात काही आले नाही. अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यास या परदेशी विद्यापीठांनापण तोंड द्यावे लागेल. ते अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या मागण्याना कसा प्रतिसाद देतील ? कां असल्या मागण्या त्या परदेशी विद्यापीठाकडे आमचे विद्यार्थी करणारच नाहीत.मात्र परदेशी जाणारे भारतीय विद्यार्थी तेथे जे काही नियम असतील त्यांचे काटेकोरपणे पालन करतात असं दिसून येते.
२-३ वर्षापूर्वी एका  पदवीधर (?) मुलाने एका मासिकात एक लेख लिहिला होता. लेखाचा विषय होता ” महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील एकाच अर्हतेच्या पदवीधरांना मुलाखतीसाठी बोलावताना समान निकष कां लावले जात नाहीत?” म्हणजे असं कि पुणे,मुंबई इ. विद्यापीठातील पदवीधरांना झुकतं माप दिलं जातं तर कोल्हापूर,नागपूर इ.इतर विद्यापीठातील पदवीधरांना जरा डावललं जातं.एकाच अर्हतेच्या वेगवेगळ्या विद्यापीठातील उमेदवारांना एकाच फूटपट्टीने मोजावे असं त्या लेखाचा मथितार्थ होता. म्हणजे असं कि कोल्हापूर विद्यापीठाचा बी.ई. आणि नागपूर विद्यापीठाचा बी.ई.याना एकच निकष लावून निवड करावी. एकाअर्थी त्याच म्हणणं अगदी रास्त वाटत होतं. पण त्या पदवीधराने लिहिलेला तो लेख अतिशय सुमार दर्जाचा होता.असं वाटलं कि हा पदवीधर झालाच कसा ? जो पदवीधर आपले विचार मातृभाषेत मुद्देसूद मांडू शकत नाही तो इतर भाषेत तरी काय मांडू शकणार? असा मला प्रश्न पडला.त्या अनुषंगाने मी त्या सद्‍गृहस्थाचे दुसर्‍या एका तांत्रिक विषयावरचे लेख वाचले तर तेथे ही तो आपला विषय मांडण्यात उणा पडत असल्याचे जाणवले.मग तो ज्या विद्यापीठाचा पदवीधर होता, त्या विद्यापीठाचा दर्जा या एकावरून ठरवणे कितपत योग्य ठरेल? येथे शीतावरून भाताची परीक्षा योग्य होईल का? असे प्रश्न मला सतावू लागले. कोणाला कमी किंवा कोणाला अधिक दर्जा द्यावा असा येथे अजिबात हेतू नाही.परंतु संघटनेच्या बळावर आपल्याला हवे ते हिसकावून घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागलेली आहे. त्याला ही परदेशी विद्यापीठे कसं तोंड देतील? कां ती ही प्रवाहपतीत होतील ? सामुदायिक कॉपी सारख्या प्रकरणी काय मार्ग निघेल ? खरं तर याला पुस्तके समोर ठेऊन उत्तरे लिहिण्याची मुभा देणे आणि प्रश्नांची काठिण्य पातळी वाढवणे हा उपाय ठरू शकतो. पण या उपायातील उत्तरार्धाचे पालन होईल का? हे कोण आणि कसे ठरवणार ? काळच याचं उत्तर देईल असं वाटतं.
३-४ वर्षापूर्वी आम्ही ९-१०वीच्या मुलांसाठी १५ दिवसाचा निवासी मोफत प्रशिक्षण वर्ग घेतला होता. मोफत प्रशिक्षण असूनही बहूतांश पालकवर्ग याबाबत उदासीन होता. असं कां, त्याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळचे आमचे अनुभव अतिशय उद्‍बोधक असेच आहेत.याविषयीचा आढावा घेणारा एक लेख मी   येथे  दिलेला आहे,तो पहावा. जवळजवळ ४० % मुलांना मराठी लिहिताच येत नव्हते. मग ही मुले १० वी पर्यंत कसे आली ? ९वी उत्तीर्ण या निकषावर या मुलांची निवड कारकून या पदावर करणं कितपत योग्य ठरावे ? पण सध्या असंच होत आहे असं वाटतं. २००४ साली मी महाराष्ट्र शासनाच्या सेवेत होतो.माझ्याच ऑफिसमध्ये एक एम.ए.झालेली कारकून होती.पण तिला ना मराठी येत होतं ना इंग्रजी.झकमारत तिची सगळी कामं इतर कर्मचारी करत असत. करणार काय? ही बया एम.ए.(मराठी) कशी झाली असेल ? असो.या मुलांपैकी १०वीला ४०% गुणाने उत्तीर्ण झालेल्या मुलांनी पुढे वाणिज्य शाखेतील पदवीसाठी प्रवेश घेतल्याचे आम्हाला समजले. मग या मुलांचा पदवीचा दर्जा कुठल्या प्रकारचा असेल ? अशा पदवीधरांना परदेशी विद्यापीठात कसा प्रवेश मिळू शकेल ? म्हणजे परदेशी विद्यापीठाचा सरसकट सगळ्याना फायदा होईल असं म्हणता येत नाही. शिकण्याची कुवत असूनही गरीबीमुळे ज्यांना शिक्षण घेता येत नाही,त्या मुलांना गुणवत्तेच्या जोरावर पुढील शिक्षणाची दारे आपोआप उघडतील, त्यांना शिष्यवृत्तीचा आधार मिळेल, परदेशी न जाता येथेच त्या दर्जाचे शिक्षण त्या गरीब मुलांना मिळेल.असे काही फायदे होतील असं मला वाटते. आपल्याला काय वाटते?

परदेशी विद्यापीठे व मोफत शिक्षण ! वर टिप्पण्या बंद

प्रकाशाचा वेग म्हणजेच आत्म्याची सद्गती !

प्रकाशाचा वेग म्हणजेच  वेदांतातील आत्म्याची सद्गती !
१९०५ मध्ये आइन्स्टाईनने त्याचा सिद्धांत जगासमोर मांडला. त्यात त्याने सात तत्त्वांचा उहापोह केला. १) अवकाश व २)समय हे दोन्ही सापेक्ष आहेत. ३)अवकाश त्रिमित नाही. ४) भूत-वर्त-भविष्यकाळातून वेळ एकाच दिशेत वाहात नाही. ५) अवकाश व काळ हे एकमेकाशी अत्यंत किचकटपणे संबंधीत असून ते चतुर्मित अवकाश-काल’ व्यक्त करते ७)वस्तुमान हे उर्जेचे रुप आहे. या तत्त्वांच्या आकलनासाठी त्याने काही गणिती समीकरणे मांडली.त्यात त्याने (अ) वेगाचा वस्तुमानावर परीणाम-जेव्हा निरीक्षकासापेक्ष वस्तु गतिमान असते तेव्हा गतिमान वस्तुचा वेग जसा वाढत जातो तसे त्या वस्तुचे वस्तुमान पण वाढत जाते.मात्र त्या वस्तुस वस्तुमान वाढीची जाणिव नसते. (ब)वेगाचा दृग्गोचरतेवर परीणाम-जेव्हा निरीक्षकासापेक्ष वस्तु गतिमान असते तेव्हा तिच्या वेगाच्या दिशेत ती वस्तु संकोच पावत असल्याचे निरीक्षकास दिसते.मात्र प्रत्यक्ष वस्तुस तिच्या वस्तुमानातील संकोचन जाणवत नाही.(क) वेगाचा कालावर परीणाम-गतिचा परीणाम म्हणून काळ व्यक्त होतो असे आइन्स्टाइनचे म्हणणे होते. वस्तुचा वेग जसा वाढेल तसे कालविस्तार पावल्याचे त्या निरीक्षकास दिसते.परंतु प्रत्यक्षात त्या वस्तुस कालविस्ताराचा अनुभव येत नाही. या तिन्हीच्या समर्थनार्थ त्याने तीन समीकरणे मांडली. जुळयांच्या प्रवासाच्या गोष्टीत या तिसर्याम तत्त्वाचा विचार केलेला आहे. त्यासाठीचे गणिती सूत्र समजून घेतले तर जुळ्यांची गोष्ट समजायला त्याची जास्त चांगली मदत होईल, अन्यथा हे काहीतरी गौडबंगाल आहे असेच वाटेल. वेगाचा कालावर परीणाम काढण्यासाठी आइन्स्टाइनने दिलेले सूत्र असे आहे. {सा=का वर्गमूळ [१-(व*व) / (प्र*प्र)] }. या सूत्रात सा=सापेक्ष काळ, का= पृथ्विवर लोटलेला काळ, व=वस्तुचा वेग, आणि प्र=प्रकाशाचा वेग असे गृहित धरलेले आहे. आता या ठिकाणी जेव्हा वस्तुचा वेग प्रकाशाच्या वेगाबरोबर होतो तेव्हा तेव्हा सापेक्ष काळ शून्य होतो. यावरून जेव्हा एखादी वस्तु किंवा व्यक्ति प्रकाश वेगाने प्रवास करेल तेव्हा ती अमर हॊईल,अविनाशी हॊईल, नित्य हॊईल.हिच ती अद्वैत वेदांतातील सद्गती होय. म्हणूनच मृत व्यक्तिच्या आत्म्यास सदगती लाभो ! अशी प्रार्थना हिंदू धर्मीय लोक करतात. इतकेच नव्हे तर मराठीत “थांबला तो संपला” अशी म्हण आहे. माझ्या मते “सतत गतिमान राहणेच श्रेयस्कर” हे जनमानसावर बिंबवण्यासाठीच ही म्हण पडली असावी. “मृतात्म्यास शांती लाभो” हे चक्क इंग्रजीतील “मे सोल रेस्ट इन पीस” चे भाषांतर जे हिंदू धर्मीय मृत व्यक्तीबाबत संबोधणे सर्वथा अयोग्य होय.पण जनसामान्यांना हे कोण सांगणार ?
आता आपण जुळ्याच्या प्रवासाकडे वळूया. एक जुळे समजा वयाच्या १० व्या वर्षी प्रवासास निघाले. एकाने पृथ्वीवर प्रवास करायचा आणि दुसर्यााने अवकाश यानाने अवकाशप्रवास करावयाचा असे ठरवले. समजा अवकाश यानाचा वेग जवळजवळ प्रकाशाच्या वेगाइतका म्हणजे त्याच्या ९०% इतका आहे. आता असे समजा कि पृथ्विवरील ६० वर्षे(का) इतका काळ लोटल्यावर अवकाशप्रवासी पृथ्वीवर आपल्या भावास भेटण्यासाठी परतला. पृथ्वीवरील त्याचा भाऊ नुकतीच त्याची तिशी पार केलेल्या अवकाशप्रवाशास पाहून अचंबित झाला.आपण सत्तरी पार केली तरी माझा जुळा भाऊ तीस-पस्तीसचाच कसा ? असा प्रश्न त्याला पडला असणार नाही का?
हे उदाहण “ट्विन पॅराडॉक्स” म्हणून प्रसिद्ध आहे. आता या उदाहरणात सा=सापेक्ष काळ किती असावा ते शोधावयाचे आहे. का=६० वर्षे हा पृथ्वीवर लोटलेला काळ  दिलेला आहे.वस्तुचा वेग प्रकाशाच्या वेगाच्या ९०/१०० दिलेला आहे. म्हणजेच व=०.९प्र. आता या किमती सा=६० वर्गंमूळ{१-[(०.९प्र) (०.९प्र)] / (प्र*प्र.) } या सूत्रात घातल्यास सा=[६० वर्गमूळ {१-०.८१}]=[६० वर्गमूळ{१९/१००}]=[६वर्गमूळ{१९}]=२६.१वर्षे इतका सापेक्ष काळ आला.अवकाश प्रवासास तो निघाला तेव्हा त्याचे वय १० वर्षे होते,त्यात सापेक्ष काळ मिळवून अवकाश प्रवाशाचे पृथ्वीवर परतल्यावर वय=१०+२६=३६ वर्षे इतके येते.म्हणजे पृथ्वीवाशी ७० वर्षाचा म्हातारा तर अवकाश प्रवासी ऐन तारूण्यात ३६ वर्षे वयाचा ! आहे का नाही विरोधाभास !
तर असा हा प्रकार आहे.वेगाचा कालावर हा असा परीणाम होतो आणि ते गणिताने असे सिद्ध होते.मला हे एवढेच समजले आहे. तसं हे सारं अनाकलनिय असेच आहे !

कडाडणाऱ्या वीजॆ पासून, असॆल हवी सुरक्षा !

गेल्या आठवड्यात आभाळातील वीज अंगावर पडून काही माणसे दगावली अशी बातमी वाचली आणि मला राहवले नाही म्हणून हा लेख लिहायला घेतला. खरं म्हणजे शालेय जीवनापासून याविषयी काय काळजी घ्यावी हे शिकवलेले असते.पण आपण अश्यावेळी तेव्हढे सजग नसतो, जागृत नसतो, सावध नसतो. समाजात वावरत असताना, मुळात कुठल्याच नियमावलीचं पालन करायचंच नाही असं आपल्या मनावर बिंबलेले असते. मग ते वाहतु्कीचे नियम असोत, वीजवापरासंबंधीचे असोत, बांधकामासंबंधी असोत , आगीसंबंधी असोत वा इतर कुठले असोत !! काय करेल प्रशासन, काय करेल पोलीस खाते, काय करेल विद्युत कंपनी, काय करेल निसर्ग? बर्‍याच गोष्टी तर आपणच करायच्या आहेत आपल्या सुरक्षेसाठी ! वाचा नि अंमलात आणा ही कळकळीची नम्र विनंती !!
आभाळातल्या वीजॆपासून धॊका पॊहचू नयॆ, सुरक्षितता मिळावी यासाठी काय काळजी घ्यावी, या बाबत १९९२मध्यॆ कॉक्स नावाच्या अभियंत्यानॆ काही सूचना दिल्या. त्या सूचनांचे पालन केल्यास आपण आभाळातल्या विजेपासून बर्‍याच अंशी सुरक्षित राहू शकतो.
आपल्या घरात आपण वापरत असलेली वीज आणि आभाळातील वीज यात तत्वतः काहिही फरक नसतो,परंतु घरातील विजेचा प्रवाह हा एक ते पाच अम्पियर इतक्या तीव्रतेची तर आभाळातील विजेची तीव्रता वीस ते दोनशे किलोअम्पियर इतकी असते.
जमिनीवर वीज पडतॆ, तॆव्हा जमिनीतून किमान वीसहजार अम्पियर इतका वीजप्रवाह वाहू लागतो. आणि अशावेळी तेथे उभ्या असलेल्या माणसाच्या दोन्ही पायातील अंतरावरील त्या दॊन बिंदूत व्हॊल्टॆजमध्ये वाढ होते.यालाच अर्थ पॊटॆंशियल राइज(EPR) वा स्टॆप व्हॊल्टॆज(Vs) म्हंटले जाते. ऍन्ड्रुज नावाच्या अभियंत्याने हे व्होल्टेज मोजण्यासाठी पुढील सूत्र दिले ते असे Vs = (Iρ/2π)[s/d(d+s)] . या सूत्रात I=current in amperes, ρ=earth resistivity in ohm-M, d= distance to the lightning strike in M , s= dist. Bet.2pts. (step) in M.असे समजतात.
वीज नेहमी जवळच्या आणि वीज प्रवाहास किमान विरोध करणार्‍या मार्गानेच भूमिगत होण्याचा प्रयत्न करते. उघड्यावर चालणार्‍या, खेळणार्‍या किंवा समुद्र किनारी फिरणार्‍या माणसाच्या डोक्यावर/खांद्यावर वीज पडल्यास ती शरीराच्या पृष्ठभागावरून समांतर मार्गाने भूमीगत होते. (As Vhf > ABDV). तसेच जर मनुष्य झाडाजवळून जात असेल तेव्हा वीज पडली तर ती अगोदर झाडावर पडून नंतर माणसावर पडते आणि त्याच्या शरीराच्या पृष्ठभागावरून समांतर मार्गाने भूमिगत होते.पहिला वीजेचा धक्का झाडावर हॊऊन दुसरा धक्का माणसावर झाल्यास त्याची तीव्रता अतिशय धोकादायक पातळीस पोचलेली असते.( V bet. Tree & subject >ABDV results in Second Strike- very dangerous). तसेच माणसाच्या पावलातील अंतर जसजसे वाढत जाते तसतसे स्टेप व्होल्टेज वाढत जाते. हे तत्त्व ध्यानात घेता पावलातील अंतर जितके कमी तितकी सुरक्षितता जास्त असते. भूमिगत होऊ पाहणारा वीजप्रवाह नेहमी सर्वात उंच वस्तुवरच आधी धडकतो, तोच त्याला सर्वात जवळचा मार्ग असतो.त्यामुळे विजांचा गडगडाट चालू असतांना आपण सर्वात उंच वस्तु होता कामा नये. तसेच वीजप्रवाह नेहमीच किमान विरोध करणार्‍या वस्तुवर आधी धडकतो हा मुद्दा ही तितकाच महत्वाचा असतो.
वरील मुद्दे ध्यानात घेता विजांचा गडगडाट हॊत असताना उघड्या मैदानातील माणसाने दोन्ही पाय जवळ घेऊन, उकिडवे बसावे,दोन्ही गुडघ्यात डोके घालून एखाद्या चेंडूसारखा शरीराचा आकार होईल असे पहावे, म्हणजे त्याला जास्तीत जास्त सुरक्षितता मिळते.
आभाळातल्या वीजॆचा मनुष्य दॆहावर निर्माण हॊणारा दाब:-मनुष्य दॆहाचा रॊध( R)=१०००ऒहम्स गृहित धरून किमान तडितपात प्रवाह (I) २० किलो अम्पियर असेल तर डॊकॆ तॆ पाय यातील दाब= IR=Vhf = [२० x१०६] व्हॊल्ट इतका येतो.
हवॆचॆ डायइलॆक्ट्रिक ब्रॆकडाऊन व्हॊल्टॆज (ABDV) =३x१०३ व्हॊल्ट / सॆंमी असतॆ.माणसाची सरासरी ऊंची १७०सॆंमी (गृहित) धरल्यास डॊकॆ तॆ पाय या ऊंचीच्या हवेच्या स्तंभाचे डायइलॆक्ट्रिक ब्रॆकडाऊन व्होल्टेज= ABDV= (३x१०३ x १७०) = [५.१ x१०६ ] व्हॊल्ट यॆतॆ.
[२० x१०६] व्हॊल्ट हॆ माणसाच्या ऊंचीइतक्या हवेच्या स्तंभाच्या व्होल्टेजच्या (ABDV च्या) चौपट असल्यामुळॆ बहुतॆकवॆळा वीजप्रवाह शरीरातून न जाता, शरीराच्या पृष्ठभागावरुन समांतर मार्गाने भूमिगत हॊतो. त्यामुळे शरीरावर गंभिर अशा भाजण्याच्या जखमा होतात. मनुष्य चालत असेल आणि त्याचा हात अगोदर विजेच्या मार्गात आला तर दुसरी काहीही इजा न होता कोपरापसून हात कापल्याप्रमाणे तुटून पडल्याचॆ काही अपघात प्रकरणात दिसून आले आहे. वरील सर्व मुद्दे ध्यानात घेऊन आपण योग्य ती काळजी घेतली तर आभाळातल्या विजेपासून सुरक्षितता मिळू शकते.
याच बरोबरीने काही इतर मुद्देही लक्षात घेऊन त्याची अंमलबजावणी जाणिवपुर्वक करणे आवश्यक ठरते.
जर एखाद्या उंच इमारतीजवळ असतांना विजांचा कडकडाट ऐकू आला तर ताबडतोब त्या उंच इमारतीचा आश्रय घ्यावा. आपण घरात असाल तर घरातील नळ, टेलीफोन,खिडक्या आणि विद्युत उपकरणापासून दूरच राहावे.
जर विजांचा चमचमाट होऊन अर्ध्या मिनिटाच्या आत गडगडाट ऐकू आला तर ताबडतोब मोठ्या इमारतीचा, शाळेच्या पटांगणात असाल तर शाळेचा आश्रय घ्यावा आणि पुढील आर्धा तास त्या इमारतीमध्येच निवांत बसून रहावे.
जर आपण मोटारसायकलने प्रवास करत असाल किंवा इतर कुठल्याही ट्रक्टर सारख्या उघड्या वाहनात असताना विजांचा कडकडाट ऐकू आला तर अशा वाहनापासून ताबडतोब दूर जावे आणि वर नमूद केल्याप्रमाणे चेंडू सारखे शरीराचा आकार करून उकिडवे बसावे. तेच आपण बस सारख्या बंद वाहनात असाल तर आतच बसून रहावे.तेथे आपण सुरक्षित असता हे ध्यानात घ्यावे.

हे सारे सहज लक्षात रहावे यासाठी एक कविता केली आहे. या कवितेत राणा नावाचा एक सिंहाचा छावा आपल्याला आभाळातल्या विजेपासून सुरक्षा हवी असेल तर काय काय काळजी घ्यावी ते गर्जना करुन सांगत आहे.

“छावा हा सिंहाचा” नियम शिकवतॊ सुरक्षॆचा !
सिंहाचा हा छावा, हॊता शूर आणि धीराचा !
सगळीकडॆ फिरुन माहिती गॊळा करायचा !!
नाव त्याचॆ राणा, करतॊ नियमांची गर्जना !
बाबांनॊ ! आभाळातल्या वीजॆपासून असॆल हवी सुरक्षा,
नियम साधॆ जाणा आणि पाळा,हीच करतॊ अपॆक्षा ! पुढे वाचण्यासाठी   येथे जा.

अधिक माहितीसाठी वाचा https://savadhan.wordpress.com/2010/02/25/निसर्गप्रेमी-संत/
अधिक माहितीसाठी हा दुवा पहा http://www.lightningsafety.noaa.gov

पुढील पृष्ठ »