Savadhan's Blog


सुरक्षित-गॅस सिलिंडर

Posted in सामाजिक,सुरक्षा by savadhan on 08/04/2010
Tags: ,

सकाळी सहजच नेहमीप्रमाणे फिरत निघालो होतो.एप्रिलची एक तारीख होती.रस्त्यावरच गॅस सिलींडरची गाडी उभी होती. गाडी ओलांडून पुढे जाईपर्य़ंत गाडीतील हमालाने वरून एक सिलिंडर रस्त्याच्या कडॆला टाकले.उत्सुकतेपोटी गॅस सिलिंडरचे मी निरीक्षण करू लागलो.दोन दिवासापूर्वीच याविषय़ी एक इंग्रजी लेख मी वाचला होता. त्यानुसार घरातला गॅस सिलिंडर मी आधीच पाहिला होता.मनात विचार आला की इथं आता बरीच सिलिंडर्स आहेत,तेव्हा पाहूया जरा तपासून !
खाली टाकलेल्या सिलिंडर रिंगच्या तीन पैकी एका बाजूवर A10 असं लिहिलं होतं. सिलिंडर वितरकांन ते सिलिंडर बाजूला काढून ठेवलं होतं.मला वाटलं कुणा ग्राहकाला देण्यासाठी म्हणून ते बाजूला काढून ठेवलं असावं.एवढ्यात नेहमीचा ओळखीचा माणूस तेथे आला आणि त्याने ते सिलिंडर ग्राहकाला देऊ नका म्हणून सांगितलं.ओळखीच्या या माणसास आम्ही ”मामा” म्हणून संबोधतो.सहजच ऊत्सुकतेपोटी मी विचारले,” काय मामा,हे सिलिंडर का बाजूला काढलाय हो? तेव्हा त्यानी सांगितले की ते वापरण्यायोग्य राहिले नाही म्हणून. मला जरा बरं वाटलं की हे लोक खरोखरच सिलिंडर बारकाईनं तपासून ग्राहकांना देत आहेत. चांगली गोष्ट आहे.
आपल्यापैकी बहूतेकांना सुरक्षिततेची ही बाब माझ्याप्रमाणेच माहित नसावी असं मला वाटतं. मी वाचलेल्या लेखानुसार “A10” असं लिहिलेलं सिलिंडर कालबाह्य झालेलं आहे हे माझ्या पण लक्षात आलं होतं. अशा प्रकारे प्रत्येक सिलिंडर रिंगच्या बाजूवर वर नमूद केल्याप्रमाणे एक सुरक्षा-दर्शक अक्षरांक लिहिलेला असतो. त्यावरून हे सिलिंडर वापरण्यास सुरक्षित आहे किंवा नाही ते या कोडवरून समजते. या कोडमधील ABCD ही अक्षरे वर्षाच्या चार तिमाहीचा निर्देश करतात. म्हणजे जाने ते मार्च ही तिमाही A या अक्षराने,एप्रिल ते जून B ने,जुलै ते सप्टेंबर C ने आणि ऑक्टोबर ते डिसेंबर D अक्षराने दर्शवतात. त्यापुढील दोन अंक हे वर्षाचा निर्देश करतात.वरील कोडमधील 10 चा अर्थ इ.स.२०१० असा होतो. आता या कोडचा सुरक्षा संदेश असतो —A10 अशी खूण असलेले हे सिलिंडर मार्च २०१० पर्यंत वापरणे सुरक्षित असते. त्यानंतर ते वापरणे धोकादायक असते.तसेच B10 खूणेचे सिलिंडर जून२०१० पर्यंत सुरक्षित, C10 खूणेचे सप्टेंबर २०१० पर्यंत, D10 खूणेचे सिलिंडर डिसेंबर २०१० पर्यंत वापरणे सुरक्षित असते. थोडक्यात तो अक्षरांक त्या सिलिंडरचे सुरक्षित वापराचे आयुर्मान दर्शवत असतो. इत्यादी इत्यादी.
थोडक्यात या खुणा पाहूनच गॅससिलिंडर घेण्याची दक्षता आपण घेतली पाहिजे हे ध्यानात घ्यावे. सिलिंडर रिंगच्या बाजूवर नमूद केलेला हा अक्षरांक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचा असतो. तो त्या सिलिंडरची कालबाह्यता सांगतो. कालबाह्य झालेलं सिलिंडर वापरणे धोकादायक असते.
हे झालं सुरक्षित सिलिंडरबाबत.पण वितरकाने चुकून ग्राहकास असुरक्षित झालेलं किंवा थोड्याच दिवसात होऊ शकणारं गॅस सिलिंडर दिलं तर काय करायचं ते मात्र माझ्या वाचनात आल नाही. आपल्याला याविषयी माहिती असल्यास अवश्य सांगा बरं का?

Advertisements
सुरक्षित-गॅस सिलिंडर वर टिप्पण्या बंद