Savadhan's Blog


विटीदांडूचा खेळ.

Posted in खेळ by savadhan on 02/04/2010
Tags:

विटीदांडूचा खेळ
आजकालच्या क्रिकेटच्या जमान्यात विटीदांडूचा खेळ आता खेड्यातून सुद्धा गायब झाला आहे असं म्हंटलं तर ते वावगं ठरू नये.५० वर्षापूर्वी आम्ही खेळत असलेला विटीदांडूचा खेळ अजूनही जसाच्या तसा माझ्या मनात घर करून आहे.५-६ सें.मी लांबीची विटी आणि ३०-३५ सें.मी. लांबीचा दांडू असायचा करंज नाहीतर बाभळीच्या लाकडाचा. कुठं तरी एखाद्या छोट्याशा पटांगणात २-३ सवंगडी जमले की आमचा खॆळ सुरू व्हायचा. साधारणतः वार्षिक परिक्षा संपल्या की हे असले खेळ खॆळणं चालू व्हायचं. जमिनीवर एक विटीच्या आकाराचा छोटासा खड्डा करायचा त्याला आम्ही गद म्हणत असू.त्यावर आडवी विटी ठेऊन ती दांडूने कोलायची, दुसर्‍या भिडूने त्या विटीने मग त्या गदीवर ठेवलेल्या दांडूस टिपायचे. जर नेमकं दांडूस टीपले तर डावात बदल होऊन विटी कोलण्याची संधी त्याच्याकडे व विटी झेलण्याचे काम पहिल्याकडे द्यायचे.जर विटी गदीपासून दूर पडली तर दांडूने विटीपर्यंतचे अंतर मोजायचे.या प्रत्येक दांडूच्या अंतरास विशिष्ट नाव दिलेले असायचे. असे सात दांडू झाले की एक झूल झाली असे म्हणायचे आणि त्याची नोंद करायची.एक दांडू अंतरास एरापाव, दोन दांडू अंतरास दोराचिटी,याप्रमाणे तीन-मेरामिठी,चार-चारीघोडा,पाच-पारिगाय.सहा-डोळा,सात-झूल असं मोजत असत.ही सात नांवे म्हणजे विटीच्या सात स्थितींची नांवे होत. एरापाव म्हणजे पायाच्या पंजावर विटी ठेऊन दांडूने विटी उडवणे, दोराचिठी-दांडू हातात धरून बोटावर विटी तोलून,मेरामिठी-हातात दांडू धरून मुठीवर विटी ठेऊन,चारीघोडा-दांडू हातात धरून करंगळी व तर्जनीवर विटी तोलून,डोळा-दांडू हातात व विटी डोळ्यावर ठेऊन तर झूल म्हणजे विटी गदीवर ठेऊन दांडूने कोलणे. असा हा मजेशीर खेळ तासन तास चालू असायचा.ज्याच्या जास्त झूली होतील तो विजयी व्हायचा.
माझे मुस्लिम मित्र वर नमूद केलेल्या विटीच्या स्थितीना हेल्पाव, हेटारिंगी,तिरिमिरी,नाल्घोडा,हिंदूस्थानी,मुसल्मानी, चकोट या नावांनी संबोधत असत.एकूण या खेळात खूप मजा यायची. गरीबातला गरीब मुलगाही हा खॆळ खेळू शकायचा हे या खेळाचे वैशिष्ठ्य. या खेळाचे पुनरुज्जीवन करायला पाहिजे असं मला वाटतं. आपल्याला काय वाटते?  आपण असे खेळ खेळला असाल तर त्याविषयी अवश्य मत व्यक्त करा.

Advertisements