Savadhan's Blog


होमिओपॅथी महाविद्यालयाची दयनीय अवस्था !

होमिओपॅथी
महाराष्ट्रातील होमिओपॅथी महाविद्यालयाची अवस्था विद्यार्थी व शिक्षकाअभावी दयनीय झाल्याची बातमी आज वर्तमानपत्रात वाचली. तसं याआधी पण अशा प्रकारच्या बातम्या वाचनात आल्या होत्या. आता होमिओपॅथी महाविद्यालयाच्या इमारतीचे ४-५ मजले गायब झाले असल्याची बातमी वाचली आणि तेव्हा शेतातल्या विहिरी गायब झाल्याचे वाचले होते, त्यामुळे डॊक्याला हात लावायची पाळी माझ्यावर आली. पायाभूत सुविधांच्या अभावामुळे दर्जाहिन शिक्षणाकडे सगळयानीच पाठ फिरवली. हे झाली काही कारणं पण अजून एक महत्वाचं कारण आहे तिकडं कोणीच लक्ष देत नाही असं कां ? हा प्रश्न मनात आल्याशिवाय रहात नाही. तो म्हणजे या पॅथीच्या विश्वासार्हतेचा !
१७९० मध्ये सॅम्युएल हानेमान यानी या पॅथीचा पाया घातला. मलेरियासाठी उपयोगी पडणारे, सिंकोना झाडापासून तयार केलेले क्विनाइन त्याने स्वतः टॉनिक म्हणून घेण्यास सुरूवात केली तेव्हा त्यास मलेरीयाची लक्षणे जशी असतात त्याप्रमाणे थंडी भरून आली.यावरून त्याने निष्कर्ष काढला की ज्या औषधाच्या सेवनामुळे जी लक्षणे शरीरात निर्माण होतील त्या लक्षणाच्या रोगावर त्याचा ईलाज करता यॆईल. यासाठी त्याने “लाईक क्युअर्स लाईक” असं सूत्र मांडले. तसेच त्या औषधाची मात्रा जशी उणावत नेऊ [पातळ करु] तसं ते औषध रोगावर जास्त परीणामकारक ठरेल आणि इतर दुष्परीणामही कमी होतील असं त्याने जाहीर केलं. त्याचबरोबर ते पातळ औषधीद्रव्य जितके जोरात हलवू तितके ते जास्त परीणामकारक [पोटेंशी] होईल असंही त्यानं जाहिर केलं.
जोरात हलवून पातळ औषधाची [पोटेंशी] शक्ती वाढवणे-
त्याच्या या उपचार पद्धतीसाठी १८०७ मध्ये हानिमानने ’होमिओपॅथी’ या शब्दाची योजना केली. मराठीत त्यास समचिकित्सा असं म्हणता येईल. रोगाच्या लक्षणासारखी लक्षणं निर्माण करणारे औषध देऊन तो रोग बरा करणे म्हणजे समचिकित्सा होय. यासाठी औषध तयार करण्याची रीत पाहिली की आपल्याला बर्‍याच गोष्टी ध्यानात येतील. एका परीक्षानळीत मूळ औषधाचे १०० रेणू घेतले असं समजू. ते औषध दुसर्‍या परीक्षानळीत एकास दहा या प्रमाणात उर्ध्वपातीत जलाने पातळ केले आणि जोरजोरात हलवले की त्याची [पोटेंशी] रोग बरे करण्याची शक्ती वाढते असं समजले जाते.या दुसर्‍या परीक्षानळीतील १० औषधी-रेणूच्या मिश्रणास १x असं म्हणतात. आता तिसर्‍या परीक्षानळीत १x मिश्रण घेऊन ते एकास दहा या प्रमाणात उ.जलाने पातळ करून जोरजोरात हलवले की या १ औषधी-रेणुच्या मिश्रणाची [पोटेंशी]शक्ती २x झाली असं समजलं जातं.आता चौथ्या परीक्षानळीत २x मिश्रण घेऊन ते एकास दहा या प्रमाणात उ.जलाने पातळ करून जोरजोरात हलवले की शून्य औषधी रेणूच्या मिश्रणाची [पोटेंशी] शक्ती ३x झाली असं समजतात. आणि अशा रीतीने ही पोटेंशी वाढवण्याची प्रक्रिया पुढे ४x,५x ——साठी चालू राहते.
येथे x याचा अर्थ १० असा असतो. म्हणून ४x याचा अर्थ हे औषध १०चा चतुर्थ घात इतकं ते पातळ करण्यात आलं आहे. होमिओपॅथिक औषधनिर्माते मूळ औषधाचा एक भाग ९९ भाग उ.जलात मिसळून ते पातळ करतात. याला १०० [पोटेंशीचं]शक्तीचं औषध म्हणजेच १C [पोटेंशीचं]शक्तीचं औषध म्हणतात. पुनःपुन्हा पातळ करून ते २C, ३C.४C—–इत्यादी [पोटेंशीचं]शक्तीची औषधं तयार केली जातात.बाजारात ३०C [पोटेंशीची]शक्तीची औषधं उपलब्ध असतात.याचा अर्थ या औषधामध्ये मूळ औषध १००चा ३०वा घात म्हणजेच १०चा ६० वा घात इतकं अल्पांश [पातळ केलेलं असल्यामुळे]असतं.किंबहूना जवळजवळ काहीच नसतं.कसं ते पहा .
आता याचं विश्लेषण असं होतं की एक ग्रॅम मूळ औषधात १०चा २४ घात इतके रॆणू असतात आणि ते पातळ करतात १०चा ६० घात इतकं.म्हणजे त्यातील रेणूंच्या एकूण संखेच्या कितीतरी अधिकपट ते पातळ केलेले असते. म्हणजेच ३०c होमिओपॅथिक औषधात शुद्ध पाण्याशिवाय काहीच नसतं असं गणिताने सिद्ध होतं.आणि म्हणूनच संशोधक होमिओपॅथिक उपचार पद्धतीस कशी मान्यता द्यावी असा प्रश्न विचारतात. प्लेसबो परीणामाची ताकद इतकी प्रचंड आहे की जोपर्यंत रुग्णाचा या होमिओपॅथी उपचार पद्धतीवर गाढ विश्वास आहे तोपर्यंतच ती एक चांगली पॅथी म्हणून मान्य असेल. इतकंच नव्हे तर सर्व रोगांपैकी ९० टक्के रोगी हे आपोआप- ”प्लेसबो परिणामामुळे”-बरे होत असतात.ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.एकाही रोगाबाबत महत्वाचा असा ठोस पुरावा न मिळाल्याने विविध आजारासाठी होमिओपॅथी औषधाच्या  घेतलेल्या शेकडो ट्रायल्स निरर्थक ठरल्या आहेत. त्यामुळे संशोधक,शास्त्रज्ञ या उपचारपद्धतीस संपूर्णपणे अमान्य करतात.मग या औषधाने आजार बरा झाला असं वाटतं याचं गुपित समजण्यासाठी   प्लेसबो म्हणजे काय याची माहिती करून घेणं आवश्यक ठरतं. त्यासाठी अधोरेखीत प्लेसबो शब्दावर क्लिक करा.

हे सारं ध्यानात घेतलं तर होमिओपॅथी महाविद्यालये आजारी कां आहेत ते लक्षात यायला वेळ लागणार नाही.असं जर आहे तर हे जनता जनार्दनाच्या समोर कां मांडण्यात येत नाही ? कशाला अशा महाविद्यालयावर जनतेचा पैसा खर्च करावा? यावर भारतीय विद्वानानी, विचारवंतानी चर्चा करुन योग्य तो मार्ग काढला पाहिजे असं वाटत नाही कां? सत्य कटू असतं ते असं !

pl.reqad this http://www.guardian.co.uk/lifeandstyle/2010/jan/29/sceptics-homeopathy-mass-overdose-boots

Advertisements
होमिओपॅथी महाविद्यालयाची दयनीय अवस्था ! वर टिप्पण्या बंद

दुधाचे भाव वाढले पुढे काय ?

हल्ली वर्तमानपत्र वाचायला घेतलं रे घेतलं की भाव वाढल्याची बातमी हमखास माझ लक्ष वेधून घेते. आज काय भाज्यांचे भाव वाढले, तर कधी दूधाचे भाव वाढले.अशीच “जिल्हा दूध संघाने खरेदीचे दर वाढविले” ही बातमी.आताशा ’दर वाढले’ असे शब्द वाचले की पोटात गोळा उठतो. आपल्याला अजून कोठे काटकसर करावी लागणार याचा विचार सुरू होतो. सेवानिवृत्त होताच मोटारसायकल बंद करून जास्तीत जास्त पायी चालण्याचा परिपाठ ठेवला. जरा दूर जायचे असेल तर लवकर निघून बसनेच जायचे. अगदीच आवश्यकता असेल तेव्हाच रिक्षाचा वापर करायचा,वगैरे वगैरे. आता “दर वाढले” हे शब्द वाचताच विचार चक्र सुरु झाले. परत एकदा बातमी वाचली तेव्हा कोठे डोक्यात प्रकाश पडला की ’दूध खरेदीचे दर’ वाढले म्हणून ! मग जरा स्थिरावलो, मनातच म्हंटले ” ठिक आहे, आपल्या खिशाला आज चाट नाहीए तर !” संघाने खरेदीचे दर वाढवून दूध उत्पादकांना दिलासा दिला आहे. काही हरकत नाही. त्यांचे ही काही प्रश्न असणारच नाही का? त्यांना ही जरा यामुळे चार पैसे जास्त मिळतील ! असा विचार मनात चालू होता आणि क्षणार्धात एक विचार मनात चमकून गेला सोयादूधाचा. सोयादूधाचा पर्यायी दूध म्हणून वापर करता येईल असं नुकतंच कशात तरी वाचलं होतं. पण त्यात त्याची कृती दिली नव्हती. कोठे मिळेल याची कृती ? जालकावर शोध घेऊन पहावे, असं ही एकदा मनात येऊन गेलं.असेच दोन दिवस निघून गेले. हा विषय मी विसरून पण गेलो.
घरी आलेल्या पाहुण्यांच्या पाहुणचारात दोन दिवस असेच निघून गेले. वर्तमानपत्राकडे दुर्लक्ष झाले.हे असं नेहमीच घडतं. महत्वाच्या बातम्या दूरदर्शनवर पाहायला मिळाल्याने जूने पेपर वाचण्याच्या फंदात मी सहसा पडत नाही. पण झालं काय की बेकरीतून लादीपाव आणला होता.बेकरीवाल्याने तो पेपरमध्ये बांधून दिला होता.लादीपाव काढून घेऊन तो पेपरचा तुकडा टेबलवर तसाच घडी घालून ठेवला होता. दुसर्‍या दिवशी सकाळी चहा पीत बसलो होतो तेव्हा सहजच माझं लक्ष त्या पेपरच्या तुकड्यावरील एका चौकटीकडे गेलं. विषय होता —-”सोयाबिनपासून दूध करण्याची कृती”
दूधाचे दर वाढल्यापासून लोक पर्यायाच्या शोधात असावेत असं मला जाणवलं.मी एकटाच याचा शोध घेतोय असं काही नाही. पण येथे फक्त दूध कसे तयार करतात याचीच माहिती दिली होती.मागं एकदा मी असंही वाचलं होतं की सोयाबिन मध्ये ट्रिप्सिन विरोधी घटकद्रव्य असून ते विषारी असते,त्यामुळे कच्चे सोयाबिन पचनास जड जात असते, म्हणून सोयाबिन भाजून घेतल्यास विषारी द्रव्याचा परीणाम होत नाही असं आणि पचनास पण हलके होते, असं मी वाचलं होतं.याविषयी या लेखात काहीच उल्लेख नव्हता.पण जी काही माहिती दिलेली आहे, ती केव्हांही लोकांना उपलब्ध असावी म्हणून येथे देत आहे.
निवडलेले सोयाबिन २४ तास पाण्यात भिजत घालावेत.त्याची टरफले पटकन निघण्यासाठी त्यात थोडेसे सोडियम कार्बोनेट टाकावे. टरफले काढून सोयाबिन वाळवावे.आणि मग त्याचे पीठ दळून आणावे.एक भाग सोयाबिन पीठ व तीन भाग पाणी घेऊन हे मिश्रण मिक्सर मधून फिरवून घ्यावे.तयार झालेल्या एक कप पीठाच्या मिश्रणात सात कप पाणी घालून ढवळावे म्हणजे सोया दूध तयार होईल. हे दूध नेहमीच्या दूधाइतकेच पौष्टीक असते.या दूधाचे दही, पनीर,ताक इ.तयार करता येते.शास्त्रीय दृष्टीकोनातून या दूधाची उपयुक्तता नेहमीच्या दूधाइतकीच असल्याचे आढळून आले आहे.अन्नशास्त्राच्या पुस्तकात सोयाबिनमधील प्रथिनांचे प्रमाण त्याच्या वजनाच्या ४३.२% व ४३२ कॅलरीज उष्मांक मिळतात असते असं नमूद केले आहे. माणसाला त्याच्या किलोग्रॅम मधील जितके वजन असेल तितके ग्रॅम प्रथिनांची रोज गरज असते असेही यात नमूद केले आहे.
मग हा प्रयोग करून पहायला काय हरकत आहे ? जादा माहिती येथे वाचा

http://www.soya.be/soy-milk.php

प्लेसबो प्रतिसाद

Posted in शास्त्रीय by savadhan on 01/04/2010
Tags:

प्लेसबो प्रतिसाद
”आपोआप” आणि ”आपल्या नकळत मिळणारा”शरीराचा प्रतिसाद ज्यावर आपला अजिबात ताबा नसतो किंवा त्या प्रतिसादाविषयी निश्चितपणे असं काहीही सांगता येत नसते त्यांना ’प्लेसबो प्रतिसाद’ म्हणून संबोधले जाते.अशा प्रकारच्या प्रतिसादाचा आधुनिक (मेडिकल) वैद्यकीय शास्त्रात जाणीवपूर्वक अभ्यास करण्यात आला. मेंदूच्या उपजत प्रणालीत, स्मरणमंजूषेत आणि काल्पनिक गोष्टीत या प्लेसबो प्रतिसादाचा अत्यंत गुंतागुंतीचा संपर्क होत असल्याचे दिसून आले.”प्लेसबो-प्रतिसाद” हा वरवर पाहता सर्व रोगोपचारांच्या परीणामांचा अत्यंत गुंतागुंतीचा असा भाग असतो आणि तो ’प्लेसबो प्रतिसाद’ स्वतःच्या स्वतंत्र रोगचिकित्सेचं प्रदर्शन करत असतो.
” प्लेसबो प्रतिसाद” आणि ”आपल्या नकळत बरे होण्याची शक्ती” हे दोन्ही ही त्यांना स्वतःसाठी आवश्यक असणार्‍या मूलभूत घटकांची तपासणी करत असतात. ”प्लेसबो प्रतिसाद” ही काही एखादी गोळी नसते तर ती एक सुप्त प्रक्रिया असते. ही सुप्तप्रक्रिया त्या रुग्णाचा त्याच्या डॉक्टरावर असलेल्या गाढ विश्वासामधून सुरू होऊन त्याच्या ”रोगप्रतिकारक यंत्रणेपर्यंत” आणि ” नकळत बरे होण्याच्या शक्ती प्रणालीपर्यंत” अत्यंत कार्यक्षमतेने कार्यरत असते. रुग्णामधील ही प्रक्रिया त्याला दिलेल्या औषधात असलेल्या गुणधर्मामुळे कार्यरत झालेली नसते तर त्या रुग्णाच्याच शरीराने निर्मिलेल्या सर्वोत्कृष्ठ आणि परीणामकारक अशा रोगप्रतिकारक सुप्त द्रव्यामुळे सुरु झालेली असते.
”बरे हॊणे” याचा अर्थच मुळी ”संपूर्ण सुदृढ होणे”, ”बरे होणे” म्हणजे शरीराच्या भागात जी काही उणीव निर्माण झाली असेल ती आपोआप भरून येणे. म्हणजे असं की एखाद्यास फुफ्फुसाचा कर्करोग झाला असेल तर डॉक्टर ती फुफ्फुस-गांठ संपूर्ण काढून टाकून त्यास रोगमुक्त करेल,पण त्यामुळे त्यास श्वासोच्छ्वासास पुर्वीप्रमाणेच सुलभ वाटेल असं नव्हे. म्हणजेच तो सुदृढ झाला असे म्हणता येणार नाही. डॉक्टर रुग्णास रोगमुक्त करतो तर निसर्ग रुग्णास संपूर्ण सुदृढ करतो.
उत्स्फुर्त आणि नैसर्गिकरीत्या बरे हॊण्याच्या प्रक्रियेत १)पेशी अंतर्गत आपोआप जनुक-दुरुस्ती २) पेशीची रोगप्रतिकारयंत्रणा कार्यरत होणे, ३)रक्त गोठणे,४) जखमा भरून येणे, ५) उलटी,खोकला,जुलाब याद्वारे संसर्गजन्य आणि घातक द्रव्ये शरीरातून बाहेर पडणे इ.प्रक्रियांचा समावेश होतो.
रोगोपचाराशी संबंधीत डॉक्टरच्या वर्तनामुळे रुग्णाच्या प्लेसबो परीणामांचे संवर्धन होऊ शकते. जसे-१) डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील असमान उत्साहवर्धक प्रेरणास्रोत २) शारिरीक जवळीक-स्नेहार्द्र भाव ३) रुग्णावर लक्ष ठेवणे ४) रुग्णाचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकण्याचे कसब असणे ५) रुग्णाप्रति डॉक्टरचा जिव्हाळ्याचा नेत्रसंकेत ६) हळूवार स्पर्श ७) रुग्णाशी सुसंवादाची रीत ८) हसतमुखाने रुग्णाचे स्वागत इ. अशा बाबीना प्लेसबोप्रतिसादात खूपच महत्व असते.
आणि म्हणूनच अनेक रूग्ण मिथ्या औषधोपचारात स्वाभाविकपणे आपोआप शरीरांतर्गत सुप्तप्रक्रियेने यथावकाश आश्चर्यकारकपणे संपूर्ण बरे झालेले दिसून येतात.

(संदर्भ:-The placebo response and the powers of unconscious healing- Dr.Richard Kradin)

१.आरोग्य

कुष्ठरोग: एक भयानक रोग पण वेळीच उपचार केले तर पूर्ण बरा होणारा !!

अत्रि ऋषीची कन्या-अपाला. ही विद्वान ब्रह्मवादिनी होती.लग्नानंतर तीला कुष्ठरोग झाला.ती इंद्राची भक्त होती. इंद्राला प्रिय असलेला सोमरस अर्पण करण्याचे व्रत तीने घेतले होते. त्यासाठी  सोमवल्ली वनस्पती ती आपल्या दातानी चावायची. त्याचा रस काढायची आणि अत्यंत भक्तिभावाने तो रस ती इंद्राला अर्पण करायची. इन्द्र ही तिने अर्पण केलेला सोमरस अत्यंत आनंदाने  प्राशन करायचा.अपालाची ही निस्सिम भक्ति पाहून इंद्र तिच्यावर प्रसन्न झाला. आणि त्याच्या कृपेमुळे तिचा कुष्ठरोग पूर्ण बरा झाला. असी कथा आपल्याला वाचायला मिळते. या कथेचे तात्पर्य काय असावे? असा प्रश्न सूज्ञ वाचकास पडणे स्वाभाविक आहे.

अपालाने तिच्या दातानी चावून काढलेला रस   इंद्र प्यायचा. म्हणजेच अपालाचा कुष्ठरोग असांसर्गिक प्रकाराचा होता, आणि सोमवल्ली चावताना काही रस तिच्या पोटात गेला असणार आणि त्या सोमरसामुळे तिचा कुष्ठरोग बरा झाला असणार. म्हणजेच सोमरसात कुष्ठरोग नाहीसा करणारा गुणधर्म असणार, असा निष्कर्ष या कथेमधून आपोआपच बाहेर पडतो.

आपल्या देशात ८०% कुष्ठरोगी असांसर्गिक ( नॉन लेप्रो)प्रकारचे तर २०% कुष्ठरोगी सांसर्गिक (लेप्रो) प्रकारचे आहेत.दोन्ही प्रकारामध्ये सुरुवातीस त्वचेवर चट्टे उमतात. पण त्याचे प्रमाण कमी जास्त असते.

लेप्रोत (सांसर्गिक रोगात) जास्त चट्टे असतात,कान,चेहरा,त्वचा सुजते. पुढच्या टप्प्याला त्वचेवर गाठी येतात. लेप्रोत पुढचा टप्पा म्हणजे शरीर विकृती. शरीराचे भाग, हातापायाची बोटे झडतात,,नाकाची केवळ भोकेच उरतात,चेहरा विद्रुप सिंहाच्या तोंडासारखा होतो.या रोगात जी काही पडझड होते ती बाह्य शरीराची.आतले अवयव  सहीसलामत राहतात.बाह्य शरीराची पूर्ण वाताहत करून हे  जंतू  आपोआप नाहीसे होतात. अशा रोग्याला “बर्न्ट आउट “ असे म्हणतात.एम लेप्रा जंतू शरीराच्या आतल्या अवयवाना अजिबात धक्का लावत नाहीत. रस्त्यावर जे भिकारी दिसतात ते या प्रकारचे संसर्गशून्य प्राणी असतात. म्हणून हा रोग भयानक –किळसवाणा, अंगावर शहारे आणणारा असा वाटतो. म्हणून अंगावर चट्टे दिसताच लगेच “काटन-पीन टेस्ट ने” संवदेने विषयी निदान करून घेणे अत्यंत महत्वाचे असते.संवेदना नष्ट झाल्याचे निदान असेल तर त्यावर ताबडतोब उपचार सुरु करणे अत्यंत आवश्यक असते. ताबडतोब उपचार सुरु केल्यास पुढे निर्माण होणारी विकृती टळून रोगी लवकर बरा होऊ शकतो.  मात्र चट्ट्यास खाज असेल तर ते गजकर्ण, नायटे, सोरायसिस इ.त्वचा रोगाचे असू शकतात. त्यासाठी वेगळा उपचार त्वचा-रोग तज्ञाकडून करून घेणे इष्ट असते.

नॉन लेप्रो (असांसर्गिक रोगात) प्रकारात हातापयाचे,चेहर्‍याचे,बाह्य शरीराला पुरवठा कराणारे मज्जातंतू विकृत होतात. त्यामुळे हाताचे पंजे वेडेवाकडे,तळ्पायाना व्रण ,क्षतं पडतात,जखमा होतात. या प्रकारचे रोगी अगदी तुरळक असतात.

४-१४ वयोगटात लेप्रसीचे प्रमाण अधिक आढळते.मुलांना येणारे चट्टे लहान,फिकट, आणि फारच थोडे असतात.५४५ केसेस मध्ये हे  चट्टे मांड्या १९%, हात१३%,पाय८%,ढुंगण१८% या प्रमाणात आढळले.

कुष्ठरोगासाठी सद्या डिडीस /डेपसोन –’डायमिनो डायफिनिल सल्फोन ’ या  गोळ्या बरेच दिवस द्याव्या लगतात. दुसरं औषध Refampicine or Clofazimine  ही दोन औषधे लेप्रो (सांसर्गिक रोगासाठी) इन्फेक्शनसाठी असतात. नान लेप्रोसाठी (असांसर्गिक रोगासाठी) देण्याची आवश्यकता नसते. मात्र DDS गोळ्या दोन्ही प्रकारात द्याव्याच लगतात. रुग्ण बरा झाला तरी बरेच दिवस ह्या गोळ्या घ्याव्या लागतात त्यामुळे हा रोग कधीच बरा होत नाही, अशी काहींची गैरसमजूत झालेली असते . मनातली या रोगाबद्दल असलेली भिती आणि गैरसमज काढून टाकून ताबडतॊब उपचार घेणे सुरू करावे अशी कळकळीची विनंती आहे. (संदर्भ:तपस्या–डॉ.सुमती क्षेत्रमाडे)