Savadhan's Blog


विद्युत कायद्यातील काही व्याख्यांचा आढावा.

विद्युत कायद्यातील व्याख्या
२००३ च्या विद्युत कायद्यातील तरतुदींचा थोडक्यात आढावा .
२००३ चा विद्युत कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी भारतीय विद्युत कायदा १९१० मधील तरतुदीनुसार आणि त्याखाली तयार करण्यात आलेली १९५६ ची भारतीय विद्युत नियमावली इ.नुसार विजेच्या संदर्भातील कामकाज चालत असे. भारत स्वतंत्र झाला इ.स.१९४७ ला पण इ.स.२००३ उजाडले तरी अजूनही १९१० चाच कायदा वापरात होता. विजेची गरज वाढत चालली होती,त्याप्रमाणात मागणी पण वाढत चालली होती.ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणाबरोबरच सर्वत्र वीजपुरवठा व्हावा, विद्युत उद्योगाच्या विकासास मदत व्हावी म्हणून चालना देण्याच्या उद्देशापोटी,विद्युत निर्मिती,विद्युत वहन,विद्युत वितरण आणि विजेचा वापर व विद्युत-व्यावसायिक व्यापार याबाबतच्या कायद्याचे, नियमावलींचे एकत्रीकरण करणे आवश्यक वाटू लागले होते. त्याअनुषंगाने वीजदराची तर्कनिष्ठ पुनर्रचना करण्याचा,सब्सिडीच्या बाबतीत पारदर्शक धोरणाची खात्री देण्याचा, पर्यावरणानुकूल कार्यक्षम धोरणास प्रोत्साहन देण्याचा,केंद्रीय विद्युत प्राधिकरण गठित करण्याचा, विद्युत नियामक आयोगाच्या स्थापनेचा आणि याचिका-लवादाच्या (अपेलेट ट्रायब्युनल) आस्थापनेविषयीचे विचार प्राधान्यक्रमाने समोर आले.
विद्युत कायदा २००३ मध्ये वरील विचाराच्या अनुषंगाने भारतीय विद्युत कायदा १९१०,विद्युत (पुरवठा) अधिनियम १९४८ आणि विद्युत नियामक आयोग अधिनियम १९९८ चे एकत्रीकरण करण्यात आलेले आहे. सर्वसामान्य माणसास वीजेसंदर्भातील वेगवेगळ्या कायद्यासाठी विनाकारण इकडेतिकडे भटकावे लागू नये या उद्देशाने २००३चा कायदा साधा नि तर्कनिष्ठ करण्यात आला आहे असे दिसून येते.
२००३चा विद्युत कायदा हा एकूण १८ भागात व १८५ कलमात विभागला असून या कायद्याच्या १ल्या भागात कायद्याचे नांव आणि या कायद्यात वापरलेल्या अनेक महत्वाच्या विद्युत संकल्पनाच्या स्पष्टीकरणासाठी त्यांच्या व्याख्या देण्यात आल्या आहेत. एखाद्या शब्दसंचाचा शब्दकोषात जरी काही अर्थ दिलेला असला तरी कायदेशीरदृष्ट्या येथे दिलेल्या व्याख्येनुसारच त्या त्या बाबींचा अर्थ समजण्यात येतो हे आपण ध्यानात घेणे आवश्यक असते. कलम १ नुसार या कायद्याचे नांव ” विद्युत अधिनियम (कायदा) २००३ असे आहे.या आधीच्या कायद्याचे “भारतीय विद्युत अधिनियम १९१०” असे नाव होते. त्यातील ’भारतीय” हा शब्द जाणीवपूर्वक गाळण्यात आला आहे, हे ध्यानात घ्यावे.जो कायदा भारतीयांनी, भारतीयांसाठी, भारतीय संसदेने मंजूर केला आहे त्याला “भारतीय” असे संबोधण्याचे प्रयोजन नाही.मात्र हा कायदा “जम्मू-काश्मिर” वगळून उर्वरीत भारतासाठी लागू होईल असे ही येथे नमूद केले आहे.
कलम २ मध्ये एकूण ७७ बाबींच्या व्याख्या दिलेल्या आहेत.नमुन्य़ादाखल काही व्याख्या आपण येथे पाहणार आहोत.[कंसात कलम-उपकलम क्र.नमूद केला आहे]
[२(८)] “स्वांतसुखाय विद्युत निर्मिती यंत्र”[ कॅप्टीव जनरेटींग प्लॅंट]:- केवळ स्वतःच्या उपयोगासाठी विद्युत निर्मिती करण्याकरीता उभारलेला विद्युत जनित्र संच. एखाद्या सहकारी संस्थेने त्याच संस्थेच्या सभासदांच्या वापरासाठीच हा जनित्र संच प्रामुख्याने वीज निर्मिती करेल.अशा प्रकारच्या तरतूदीमुळेच मी याला “स्वांतसुखाय” असा शब्द योजला आहे, आणि तो जास्त समर्पक असाच आहे. पुढे ८ जून २००५ ला याबाबत एक स्पष्टीकरण देण्यात आले. वापरकर्त्या सदस्यांची जनित्र संचात किमान २६ टक्के मालकी हक्क असला पाहिजे आणि दरवर्षी एकूण उत्पादन केलेल्या विद्युत उर्जेच्या किमान ५१ टक्के वीजेचा वापर स्वतः सदस्यानी केला पाहिजे. असे असेल तरच त्यास “स्वांतसुखाय” (कॅप्टीव) समजण्यात येईल. [म्हणजेच ७४ टक्के भांडवल इतर वैध मार्गाने उभारुन आणि प्रचलित नियमानुसार ४९टक्के निर्मित-वीज वीजकंपनीस देऊन एखादी संस्था कॅप्टीव जनरेटींग प्लॅंट बाळगू शकेल अशी तरतूद त्यावेळी केलेली होती.]
२(१२) [को-जनरेशन]-सहनिर्मिती :-एकाच प्रक्रिये दरम्यान वीजनिर्मितीसह किंवा वीजनिर्मितीशिवाय एकाचवेळी दोन किंवा दोनपेक्षा अधिक ’उपयुक्त-उर्जेची’ निर्मिती होत असेल तेव्हाच या प्रक्रियेत “सहनिर्मिती” होत आहे असे समजावे.
२(१४) [कॉन्झरवेशन]-“उर्जा-संतुलन” :-विद्युत उर्जेचा संतुलित वापर व्हावा म्हणून वीजवापराची किंवा वीजपुरवठ्याची कार्यक्षमता वाढवल्यामुळे वीजेच्या खपात होणार्‍या घटीस “उर्जा-संतुलन” असे समजावे.
२(१५) ग्राहक:-ग्राहक कुणाला म्हणावे ते या व्याख्येने स्पष्ट केले आहे. शासनाने किंवा अनुज्ञाप्तीधारक कंपनीने किंवा या कायद्यानुसार वीजपुरवठा करण्याचा व्यवसाय करणार्‍या कोणाही व्यक्तीने किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यान्वये वीजपुरवठा वापरणारी व्यक्ती किंवा इतर कोणीही व्यक्ती, जिच्या संचमांडणीस वीज पुरवठा करण्यासाठी ती संचमांडणी शासनाच्या किंवा वीजकंपनीच्या वीजपुरवठासंचास जोडली असेल, अशी त्या संचमांडणीची उपभोक्ती व्यक्ती होय. [म्हणजे ती संचमांडणी ज्या व्यक्तीच्या ताब्यात असेल, जी त्याचा उपभोग घेत असेल मग ती मालक असेल किंवा भाडेकरू असेल तरी ती ग्राहक असेल असा याचा अर्थ होतो.]
२(१९)[डिस्ट्रीब्युशन सिस्टिम]-वितरण प्रणाली :- पारॆषण (ट्रॅन्समिशन) वाहकावरील वीजवितरणाचा बिंदू किंवा वीजनिर्मिती केंद्रास जोडण्याचा बिंदू आणि ग्राहक-संचमांडणीचा आरंभ बिंदू यास जोडावयाच्या इतर सुविधेसह असणारी वायर-प्रणाली होय.
[आपण रोजच्या व्यवहारात पारेषण, वीजवितरणाचा बिंदू (डिलिवरी पॉईंट्स), सुविधा (फॅसिलिटीज) या तांत्रिक शब्दांचा आवर्जुन उपयोग केला तर या व्याख्या समजण्यात अडचण येणार नाही.अन्यथा हे सर्व अगम्य आणि बोजड वाटण्याचा संभव असतो.]
२(२०)[इलेक्ट्रीक लाइन]-विद्युत वाहिनी:- कोणत्याही कारणासाठी वीज-वाहून नेण्याकरीता वापरण्यात येणारा वाहक आणि त्याला आधार देणारे खांब, मनोरा इ.सह वीज वहनासाठी येथे जोडलेली इतर सर्व यंत्रोपकरणे व सामुग्री यांचा यात समावेश होतो.
२(२२) [इलेक्ट्रीक प्लॅंट] विद्युत साधन सामग्री:- पारेषण, वितरण किंवा वीजपुरवठयासाठी वापरण्यात आलेले कोणतेही विद्युत साधन,यंत्र,उपकरण याचा यात समावेश असेल.मात्र वीजवाहिनी,विद्युत उर्जामापक,आणि ग्राहकाच्या नियंत्रणात असलेल्या इतर विद्युत उपकरणाचा यात समावेश नसेल.[म्हणजे वीज निर्मिती पासून ग्राहकाच्या वीजपुरवठ्याच्या आरंभ बिंदूपर्यंत वापरण्यात आलेल्या सर्व साधनसामग्रीचा,यंत्रोपकरणाचा यात समावेश असतो.]
२(३०)[जनरेटींग स्टेशन]-विद्युत जनन केंद्र:-आरोहित्र (स्टेपप ट्रॅन्स.),स्विचगियर,स्विचयार्ड,केबलसह वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणार्‍या / ठरवलेल्या आवारासह, इतर संबंधीत कोणतीही इमारत/वसाहत, संबंधीत जलाशय आणि अन्य सर्व (स्थापत्य,यांत्रिकी,विद्युत)इ.अनुषंगिक कामे यांचा यात समावेश असेल.मात्र उपकेंद्राचा यात समावेश नसेल.
२(४१)[लोकल अथॉरिटी]-स्थानिक प्राधिकारी:-ग्रामपंचायत,नगरपालिका,महानगरपालिका किंवा राज्य/केंद्र शासनाच्या नियंत्रणाखाली एखाद्या क्षेत्रासाठी अधिकृतपणे जबाबदारी सोपवलेला अधिकारी किंवा बंदर आयोगा सारखे कायदेशीर अधिकारी हा स्थानिक प्राधिकारी असेल.
२(४९)[पर्सन]-व्यक्ती:- कोणतीही कंपनी,सामुदायक मंडळ किंवा संघटन,व्यक्तिगत संयुक्त मंडळ किंवा न्यायालयीन नियुक्त व्यक्तीचा या व्याख्येत समावेश असेल.[ही व्याख्या काळजीपूर्वक पहा. “व्यक्ती” म्हटल्यावर आपल्या मनासमोर काय येते आणि या व्याख्येने काय अभिप्रेत आहे ते समजून घेणे आवश्यक ठरते.]
२(५०)[पॉवर सिस्टिम]-शक्ति प्रणाली:- निर्मिती केंद्र,पारेषण वाहिनी,उपकेंद्र,जोड-वाहिन्या,भार-प्रेषण उपक्रम (लोड-डिस्पॅच अक्टीविटी),मुख्य वा इतर वितरण वाहिनी,उपरी तारमार्ग,सर्वीस लाईन्स,आणि कामे यापैकी काहीसह निर्मिती,पारेषण,वितरण यांच्या विविध अंगासह वीजपुरवठा करणारी यंत्रणा यांचा यात समावेश असेल.
येथे आपण मोजक्याच काही शब्दांच्या-शब्दसमुहांच्या व्याख्यांची माहिती घेतली आहे.नमुन्यादाखल पाहिलेल्या या व्याखेवरून आपल्याला येथे दिलेल्या व्याख्या कशा व किती महत्वाच्या आहेत हे ध्यानात येईल असे वाटते.तसेच मूळ कायदा[अधिनियम] हे इंग्रजीत असल्याने एखाद्या शब्दाचा,वाक्यांशाचा काय अर्थ घ्यायचा याबाबतचे स्पष्टीकरण तेथे त्या भाषेत जे दिले असेल तेच ग्राह्य धरावे असे स्पष्ट निर्देश संशयास्पद स्थिती टाळण्यासाठी म्हणून दिलेले असतात.
मराठी ही समृद्ध भाषा आहे. तिचे शब्दवैभव जरी अफाट असले तरी रोज अनेकानेक तांत्रिक शब्दांची भर पडत आहे. त्याअनुषंगाने आपण जाणिवपूर्वक जेथेजेथे शक्य असेल तेथेतेथे सुलभ मराठी शब्द वापरण्याचा निर्धार करूया. म्हणजे तांत्रिक बाबी सुद्धा सहजतेनं आपल्याला मराठीत मांडणं सोयीचं होईल.

Advertisements
विद्युत कायद्यातील काही व्याख्यांचा आढावा. वर टिप्पण्या बंद

होमिओपॅथी महाविद्यालयाची दयनीय अवस्था !

होमिओपॅथी
महाराष्ट्रातील होमिओपॅथी महाविद्यालयाची अवस्था विद्यार्थी व शिक्षकाअभावी दयनीय झाल्याची बातमी आज वर्तमानपत्रात वाचली. तसं याआधी पण अशा प्रकारच्या बातम्या वाचनात आल्या होत्या. आता होमिओपॅथी महाविद्यालयाच्या इमारतीचे ४-५ मजले गायब झाले असल्याची बातमी वाचली आणि तेव्हा शेतातल्या विहिरी गायब झाल्याचे वाचले होते, त्यामुळे डॊक्याला हात लावायची पाळी माझ्यावर आली. पायाभूत सुविधांच्या अभावामुळे दर्जाहिन शिक्षणाकडे सगळयानीच पाठ फिरवली. हे झाली काही कारणं पण अजून एक महत्वाचं कारण आहे तिकडं कोणीच लक्ष देत नाही असं कां ? हा प्रश्न मनात आल्याशिवाय रहात नाही. तो म्हणजे या पॅथीच्या विश्वासार्हतेचा !
१७९० मध्ये सॅम्युएल हानेमान यानी या पॅथीचा पाया घातला. मलेरियासाठी उपयोगी पडणारे, सिंकोना झाडापासून तयार केलेले क्विनाइन त्याने स्वतः टॉनिक म्हणून घेण्यास सुरूवात केली तेव्हा त्यास मलेरीयाची लक्षणे जशी असतात त्याप्रमाणे थंडी भरून आली.यावरून त्याने निष्कर्ष काढला की ज्या औषधाच्या सेवनामुळे जी लक्षणे शरीरात निर्माण होतील त्या लक्षणाच्या रोगावर त्याचा ईलाज करता यॆईल. यासाठी त्याने “लाईक क्युअर्स लाईक” असं सूत्र मांडले. तसेच त्या औषधाची मात्रा जशी उणावत नेऊ [पातळ करु] तसं ते औषध रोगावर जास्त परीणामकारक ठरेल आणि इतर दुष्परीणामही कमी होतील असं त्याने जाहीर केलं. त्याचबरोबर ते पातळ औषधीद्रव्य जितके जोरात हलवू तितके ते जास्त परीणामकारक [पोटेंशी] होईल असंही त्यानं जाहिर केलं.
जोरात हलवून पातळ औषधाची [पोटेंशी] शक्ती वाढवणे-
त्याच्या या उपचार पद्धतीसाठी १८०७ मध्ये हानिमानने ’होमिओपॅथी’ या शब्दाची योजना केली. मराठीत त्यास समचिकित्सा असं म्हणता येईल. रोगाच्या लक्षणासारखी लक्षणं निर्माण करणारे औषध देऊन तो रोग बरा करणे म्हणजे समचिकित्सा होय. यासाठी औषध तयार करण्याची रीत पाहिली की आपल्याला बर्‍याच गोष्टी ध्यानात येतील. एका परीक्षानळीत मूळ औषधाचे १०० रेणू घेतले असं समजू. ते औषध दुसर्‍या परीक्षानळीत एकास दहा या प्रमाणात उर्ध्वपातीत जलाने पातळ केले आणि जोरजोरात हलवले की त्याची [पोटेंशी] रोग बरे करण्याची शक्ती वाढते असं समजले जाते.या दुसर्‍या परीक्षानळीतील १० औषधी-रेणूच्या मिश्रणास १x असं म्हणतात. आता तिसर्‍या परीक्षानळीत १x मिश्रण घेऊन ते एकास दहा या प्रमाणात उ.जलाने पातळ करून जोरजोरात हलवले की या १ औषधी-रेणुच्या मिश्रणाची [पोटेंशी]शक्ती २x झाली असं समजलं जातं.आता चौथ्या परीक्षानळीत २x मिश्रण घेऊन ते एकास दहा या प्रमाणात उ.जलाने पातळ करून जोरजोरात हलवले की शून्य औषधी रेणूच्या मिश्रणाची [पोटेंशी] शक्ती ३x झाली असं समजतात. आणि अशा रीतीने ही पोटेंशी वाढवण्याची प्रक्रिया पुढे ४x,५x ——साठी चालू राहते.
येथे x याचा अर्थ १० असा असतो. म्हणून ४x याचा अर्थ हे औषध १०चा चतुर्थ घात इतकं ते पातळ करण्यात आलं आहे. होमिओपॅथिक औषधनिर्माते मूळ औषधाचा एक भाग ९९ भाग उ.जलात मिसळून ते पातळ करतात. याला १०० [पोटेंशीचं]शक्तीचं औषध म्हणजेच १C [पोटेंशीचं]शक्तीचं औषध म्हणतात. पुनःपुन्हा पातळ करून ते २C, ३C.४C—–इत्यादी [पोटेंशीचं]शक्तीची औषधं तयार केली जातात.बाजारात ३०C [पोटेंशीची]शक्तीची औषधं उपलब्ध असतात.याचा अर्थ या औषधामध्ये मूळ औषध १००चा ३०वा घात म्हणजेच १०चा ६० वा घात इतकं अल्पांश [पातळ केलेलं असल्यामुळे]असतं.किंबहूना जवळजवळ काहीच नसतं.कसं ते पहा .
आता याचं विश्लेषण असं होतं की एक ग्रॅम मूळ औषधात १०चा २४ घात इतके रॆणू असतात आणि ते पातळ करतात १०चा ६० घात इतकं.म्हणजे त्यातील रेणूंच्या एकूण संखेच्या कितीतरी अधिकपट ते पातळ केलेले असते. म्हणजेच ३०c होमिओपॅथिक औषधात शुद्ध पाण्याशिवाय काहीच नसतं असं गणिताने सिद्ध होतं.आणि म्हणूनच संशोधक होमिओपॅथिक उपचार पद्धतीस कशी मान्यता द्यावी असा प्रश्न विचारतात. प्लेसबो परीणामाची ताकद इतकी प्रचंड आहे की जोपर्यंत रुग्णाचा या होमिओपॅथी उपचार पद्धतीवर गाढ विश्वास आहे तोपर्यंतच ती एक चांगली पॅथी म्हणून मान्य असेल. इतकंच नव्हे तर सर्व रोगांपैकी ९० टक्के रोगी हे आपोआप- ”प्लेसबो परिणामामुळे”-बरे होत असतात.ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.एकाही रोगाबाबत महत्वाचा असा ठोस पुरावा न मिळाल्याने विविध आजारासाठी होमिओपॅथी औषधाच्या  घेतलेल्या शेकडो ट्रायल्स निरर्थक ठरल्या आहेत. त्यामुळे संशोधक,शास्त्रज्ञ या उपचारपद्धतीस संपूर्णपणे अमान्य करतात.मग या औषधाने आजार बरा झाला असं वाटतं याचं गुपित समजण्यासाठी   प्लेसबो म्हणजे काय याची माहिती करून घेणं आवश्यक ठरतं. त्यासाठी अधोरेखीत प्लेसबो शब्दावर क्लिक करा.

हे सारं ध्यानात घेतलं तर होमिओपॅथी महाविद्यालये आजारी कां आहेत ते लक्षात यायला वेळ लागणार नाही.असं जर आहे तर हे जनता जनार्दनाच्या समोर कां मांडण्यात येत नाही ? कशाला अशा महाविद्यालयावर जनतेचा पैसा खर्च करावा? यावर भारतीय विद्वानानी, विचारवंतानी चर्चा करुन योग्य तो मार्ग काढला पाहिजे असं वाटत नाही कां? सत्य कटू असतं ते असं !

pl.reqad this http://www.guardian.co.uk/lifeandstyle/2010/jan/29/sceptics-homeopathy-mass-overdose-boots

होमिओपॅथी महाविद्यालयाची दयनीय अवस्था ! वर टिप्पण्या बंद

तांत्रिक महाविद्यालयीन योजनांद्वारे सामाजिक विकास-एक नम्र आवाहन !

तांत्रिक महाविद्यालयीन योजनांद्वारे सामाजिक विकास-एक नम्र आवाहन !
केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने सामाजिक विकास साधण्यासाठी एक उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी तांत्रिक महाविद्यालयीन योजनांचा उपयोग करून घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय-कौशल्य विकसन मंडळाने इ.स.२०२० पर्यंत ५००दशलक्ष कुशल कर्मचारी तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.मंडळाचे हे ध्येय साध्य करण्यासाठी विविध मंत्रालयीन विभागांनी कंबर कसली आहे.[http://www.education.nic.in/tech/Guidelines-CDTP.pdf येथे संपुर्ण तपशिल पहा]
या योजनेची मुख्य वैशिष्ट्ये आणि उपक्रम असे असतील–
१) तंत्रशास्त्र आणि प्रशिक्षण याची किती गरज आहे याचा शोध घेणे
२) निवड केलेल्या गटास कौशल्य-विकसन प्रशिक्षण देणे.
३) उत्पादनात वाढ व्हावी म्हणून उचित तंत्रशास्त्राचा प्रसार करणे.
४) झोपडपट्टी रहिवाशी आणि खॆडूत लोकांना तांत्रिक व इतर सहाय्यक सेवा उपलब्ध करून देणे.
५) महत्वाच्या आणि अत्याधुनिक तांत्रिक प्रगतीबाबत संबंधित गटास माहिती देणे
.
वरील उपक्रम यशश्वी करण्यासाठी तांत्रिक महाविद्यालयाची निवड करण्यात येईल आणि त्यांचे मार्फत त्या भागाची तांत्रिक गरज काय आहे याचा शोध घेण्यात येईल. तिथल्या स्थानिक गरजांनुसार व मागणीनुसार प्राधान्याने विविध व्यावसायिक-तांत्रिक कौश्यल्याचे ३ते६ महिने कालावधीचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येईल. असे कुशल प्रशिक्षित स्वयंरोजगार निर्माण करु शकतील अशी व्यवस्था करण्यात येईल. त्यासाठी संबंधीत इच्छुक गटास योग्य ते तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येईल.
तांत्रिक आणि सहाय्यक सेवा-
ग्रामीण भागात हल्ली विविध प्रकारची यंत्रसामुग्री वापरली जाते. त्यात शेतीसाठी तसेच बिगर शेतीसाठी म्हणून अद्यावत यंत्रोपकरणांचा समावेश होतो. अशा यंत्रोपकरणांची देखभाल,दुरुस्ती आणि डागडूजीची सोय त्याच भागात होण्यासाठी तांत्रिक महाविद्यालयानी पुढाकार घेऊन याविषयांचे अद्यावत प्रशिक्षण देण्याची योजना आखली पाहिजे, असं शासनाचं धोरण आहे. यात खालिल गोष्टींचा प्रामुख्याने समावेश असेल.
१) यंत्रोपकरणांची जागेवरच किरकोळ दुरुस्ती व देखभाल.
२) ग्रामसमुहास तांत्रिक सेवा देणारी सेवाकेंद्रे.[सर्विस सेंटर्स]
३) अशी सेवाकेंद्रे आणि दुरुस्ती केंद्रे यात प्रामुख्याने ग्रामस्थांचा सहभाग राहील असे पाहणे.
४) ग्रामीण भागात ठराविक दिवसांच्या अंतराने तांत्रिक सेवा मेळावे भरवणे.
५) प्रशिक्षित मनुष्यबळाचा वापर करून ग्रामीण स्तरावर तांत्रिक सल्ला-सेवा उपलब्ध करुन देणे.

यासाठी ग्रामीण स्तरावर ग्रामस्थांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी शेतकरी मेळावे,प्रदर्शने,चर्चासत्रे इ. आयोजन करण्यात येईल. रेडिओ, टि.व्ही, व्हि.डी.ओ.वर्तमानपत्रे, जाहिराती वगैरे, या माध्यमांचा मुक्त हस्ते वापर करण्यात येईल.
आर्थिक पाठबळ-
ही सामाजिक विकासाची ही योजना राबवण्यासाठी तांत्रिक महाविद्यालयाची [पॉलिटेकनिक्स] निवड करण्यात येईल.केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या-उच्च शिक्षण विभागातर्फे [Ministry of Human Resourses Developement -Dept.of Higher Education] जास्तीत जास्त २० लाख रुपयांचे अनुदान तांत्रिक महाविद्यालयाच्या प्राचार्याकडे/ संचालकाकडे देण्यात येईल.तसेच दरवर्षी पुनरावृत्ती अनुदान म्हणून जास्तीत जास्त १७ लाख रूपये देण्यात येतील. अशा प्रकारची आर्थिक तरतूद या मंत्रालयाने केलेली आहे.
या योजनेचा लाभ घेण्याची पात्रता-
[AICTE] ने मान्यता दिलेली तांत्रिक महाविद्यालयाना या योजनेत भाग घेता येईल.पूर्वोत्तर राज्ये,डोंगराळ आणि सीमावर्तीय भाग आणि मागासवर्गीय अनुसूचित-जाती-जमाती,[SC/ST]अल्पसंख्यांकाचे जिल्हे-येथील तांत्रिक महाविद्यालयाना [पॉलिटेक्निस] प्राधान्य देण्यात येईल.
वरील योजनेची अंमलबजावणी प्रभावी झाल्यास देशाचा विकास आणि भरभराट हॊण्यास हातभार लागेल. हा दृष्टीकोन समोर ठेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,लोणारे, महाड,जिल्हा रायगड यांच्या सहकार्याने ”सर्वांगिण मोफत प्रशिक्षण प्रतिष्ठान, शिवथरघळपायथा,ता.महाड जि.रायगड” ही संस्था गेली पाच वर्षे निरलसपणे आणि समर्पित भावनेने विद्युत तांत्रिक मोफत प्रशिक्षणाचा लाभ रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील काही शाळांतील विद्यार्थीना देत आहे. यामध्ये प्रामुख्याने इयत्ता ९वी आणि १० वी च्या इच्छुक मुलांची निवड विद्युत तांत्रिक प्रशिक्षणासाठी करण्यात येत असते. या विद्युत तांत्रिक मोफत प्रशिक्षणासाठी प्रतिष्ठान ने दक्षवीजतंत्री ही पुस्तिका मोफत उपलब्ध करून दिलेली आहे.[याची माहिती देणारा लेख येथे वाचा-[ https://savadhan.wordpress.com//2010/01/30/वीजतंत्री-मोफत-प्रशिक्ष किंवा http://mr.wordpress.com/tag/social/ ] परीणामस्वरूप या भागात विद्युत तांत्रिक विषयाशी संबंधीत कामासाठी वायरमन,इलेक्ट्रीशियन यांची उपलब्धता वाढत असल्याचे दिसून येत आहे. हे दृश्य केंद्र शासनाच्या धोरणांशी सुसंगत असेच आहे.
आम्ही या पत्रकाद्वारे नम्र विनंती करतो की आपल्या सहभागासह केंद्र शासनाच्या अनुदानाचा लाभ घेऊन अशा प्रकारचे मोफत प्रशिक्षण इतर व्यावसायिक विषयासाठी [जसे- वेल्डर,मोटर-रिवांडींग,विद्युत उपकरणे-दुरुस्ती व देखभाल,हाऊस वायरींग इ.] राबवण्यासाठी समाजातील विद्युत कंत्राटदार, विद्युतव्यावसायिक,  विद्युतसंघटना, उत्पादक आणि इतर सर्व प्रकारचे उद्योजक यानी पुढे येऊन शासनाचा हा उपक्रम यशस्वी करण्यास हातभार लावावा. जेणेकरून त्याभागात या प्रशिक्षित मनुष्यबळाचा उपयोग आपण आपल्या व्यवसाय वाढीसाठी करू शकाल. आणि याचसाठी येत्या ४-६ महिन्यात विद्युत व्यावसायिकांचा मेळावा घेण्याचा आमचा मानस आहे.या कामात महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या  विद्युत कंत्राटदार महासंघाने सक्रिय सहभाग घेण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

मला आवडलेली काही इंग्रजी पुस्तके.

Posted in मोफत शिक्षण by savadhan on 08/04/2010
Tags:

मी नुकतीच वाचलेली आणि मला आवडलेली काही इंग्रजी पुस्तके.

१) द सिंकिंग ऑफ द टायटॅनिक -थॉमस स्ट्रेइस्गुथ ,बुक एडिटर २००२
२) आय कॅन मेक यु थीन-पॉल मॅक केन्ना-एम्.डी.
३) लव्ह,मेडिसिन, ऍण्ड मिरॅकल्स -बर्मी सिगल-एम्.डी.
४) लाईफ अब्रोड द स्पेस शटल- रॉबर्ट टेलर–[www.spaceflight.nasa.gov]
५) ८०६२९ ए मेंगेल एक्स्पेरीमेंट- ट्रु लाईफ स्टोरी ऑफ जॅक-ओरान [यॉकॉफ सुर्निक-मूळ नाव] इन कॉन्सन्ट्रेशन कॅंप-जीन चर्च
६) द पॉवर ऑफ सोल- डॉ.झी गॅंग शॉ. एम.डी.
७) द दाविंची कोड-डॅन ब्राउन.
८) द प्लेसबो रिस्पॉन्स ऍण्ड द पॉवर ऑफ अन्कॉन्सिअस हिलिंग-डॉ.रिचर्ड क्रॅडिन.
९) इन्व्हिजीबल चायना-ए जर्नी थ्रो एथ्निक बॉर्डर लाईन्स-कोलिन लेगर्टन,जॅकोब रावसन.
१०) ट्रिक ऑर ट्रीटमॆंट-द अन्बिलीवेबल फॅक्ट्स अबॉउट अल्टरनेटिव मेडिसिन-सायमन सिंग,एड्झार्ड अर्न्स्ट एम.डी. यासाठी संदर्भ वेबसाइटस् -1) the james lind library: http://www.jameslindlibrary.org/ 2)http://www.cochrane.org/ 3)evidence basedwebsite  :http://www.medicine.ox.ac.uk/bandolier/ 4) http://www.pharmpress.com/shop/journals.asp 5) http://www.nih.gov/ 6) http://www.healthwatch-uk.org/ 7) http://www.pms.ac.uk/compmed/ 8) http://www.simonsingh.net/ 9) http://www.trickortreatment.com/

मला आवडलेली काही इंग्रजी पुस्तके. वर टिप्पण्या बंद

कडाडणाऱ्या वीजॆ पासून, असॆल हवी सुरक्षा !

गेल्या आठवड्यात आभाळातील वीज अंगावर पडून काही माणसे दगावली अशी बातमी वाचली आणि मला राहवले नाही म्हणून हा लेख लिहायला घेतला. खरं म्हणजे शालेय जीवनापासून याविषयी काय काळजी घ्यावी हे शिकवलेले असते.पण आपण अश्यावेळी तेव्हढे सजग नसतो, जागृत नसतो, सावध नसतो. समाजात वावरत असताना, मुळात कुठल्याच नियमावलीचं पालन करायचंच नाही असं आपल्या मनावर बिंबलेले असते. मग ते वाहतु्कीचे नियम असोत, वीजवापरासंबंधीचे असोत, बांधकामासंबंधी असोत , आगीसंबंधी असोत वा इतर कुठले असोत !! काय करेल प्रशासन, काय करेल पोलीस खाते, काय करेल विद्युत कंपनी, काय करेल निसर्ग? बर्‍याच गोष्टी तर आपणच करायच्या आहेत आपल्या सुरक्षेसाठी ! वाचा नि अंमलात आणा ही कळकळीची नम्र विनंती !!
आभाळातल्या वीजॆपासून धॊका पॊहचू नयॆ, सुरक्षितता मिळावी यासाठी काय काळजी घ्यावी, या बाबत १९९२मध्यॆ कॉक्स नावाच्या अभियंत्यानॆ काही सूचना दिल्या. त्या सूचनांचे पालन केल्यास आपण आभाळातल्या विजेपासून बर्‍याच अंशी सुरक्षित राहू शकतो.
आपल्या घरात आपण वापरत असलेली वीज आणि आभाळातील वीज यात तत्वतः काहिही फरक नसतो,परंतु घरातील विजेचा प्रवाह हा एक ते पाच अम्पियर इतक्या तीव्रतेची तर आभाळातील विजेची तीव्रता वीस ते दोनशे किलोअम्पियर इतकी असते.
जमिनीवर वीज पडतॆ, तॆव्हा जमिनीतून किमान वीसहजार अम्पियर इतका वीजप्रवाह वाहू लागतो. आणि अशावेळी तेथे उभ्या असलेल्या माणसाच्या दोन्ही पायातील अंतरावरील त्या दॊन बिंदूत व्हॊल्टॆजमध्ये वाढ होते.यालाच अर्थ पॊटॆंशियल राइज(EPR) वा स्टॆप व्हॊल्टॆज(Vs) म्हंटले जाते. ऍन्ड्रुज नावाच्या अभियंत्याने हे व्होल्टेज मोजण्यासाठी पुढील सूत्र दिले ते असे Vs = (Iρ/2π)[s/d(d+s)] . या सूत्रात I=current in amperes, ρ=earth resistivity in ohm-M, d= distance to the lightning strike in M , s= dist. Bet.2pts. (step) in M.असे समजतात.
वीज नेहमी जवळच्या आणि वीज प्रवाहास किमान विरोध करणार्‍या मार्गानेच भूमिगत होण्याचा प्रयत्न करते. उघड्यावर चालणार्‍या, खेळणार्‍या किंवा समुद्र किनारी फिरणार्‍या माणसाच्या डोक्यावर/खांद्यावर वीज पडल्यास ती शरीराच्या पृष्ठभागावरून समांतर मार्गाने भूमीगत होते. (As Vhf > ABDV). तसेच जर मनुष्य झाडाजवळून जात असेल तेव्हा वीज पडली तर ती अगोदर झाडावर पडून नंतर माणसावर पडते आणि त्याच्या शरीराच्या पृष्ठभागावरून समांतर मार्गाने भूमिगत होते.पहिला वीजेचा धक्का झाडावर हॊऊन दुसरा धक्का माणसावर झाल्यास त्याची तीव्रता अतिशय धोकादायक पातळीस पोचलेली असते.( V bet. Tree & subject >ABDV results in Second Strike- very dangerous). तसेच माणसाच्या पावलातील अंतर जसजसे वाढत जाते तसतसे स्टेप व्होल्टेज वाढत जाते. हे तत्त्व ध्यानात घेता पावलातील अंतर जितके कमी तितकी सुरक्षितता जास्त असते. भूमिगत होऊ पाहणारा वीजप्रवाह नेहमी सर्वात उंच वस्तुवरच आधी धडकतो, तोच त्याला सर्वात जवळचा मार्ग असतो.त्यामुळे विजांचा गडगडाट चालू असतांना आपण सर्वात उंच वस्तु होता कामा नये. तसेच वीजप्रवाह नेहमीच किमान विरोध करणार्‍या वस्तुवर आधी धडकतो हा मुद्दा ही तितकाच महत्वाचा असतो.
वरील मुद्दे ध्यानात घेता विजांचा गडगडाट हॊत असताना उघड्या मैदानातील माणसाने दोन्ही पाय जवळ घेऊन, उकिडवे बसावे,दोन्ही गुडघ्यात डोके घालून एखाद्या चेंडूसारखा शरीराचा आकार होईल असे पहावे, म्हणजे त्याला जास्तीत जास्त सुरक्षितता मिळते.
आभाळातल्या वीजॆचा मनुष्य दॆहावर निर्माण हॊणारा दाब:-मनुष्य दॆहाचा रॊध( R)=१०००ऒहम्स गृहित धरून किमान तडितपात प्रवाह (I) २० किलो अम्पियर असेल तर डॊकॆ तॆ पाय यातील दाब= IR=Vhf = [२० x१०६] व्हॊल्ट इतका येतो.
हवॆचॆ डायइलॆक्ट्रिक ब्रॆकडाऊन व्हॊल्टॆज (ABDV) =३x१०३ व्हॊल्ट / सॆंमी असतॆ.माणसाची सरासरी ऊंची १७०सॆंमी (गृहित) धरल्यास डॊकॆ तॆ पाय या ऊंचीच्या हवेच्या स्तंभाचे डायइलॆक्ट्रिक ब्रॆकडाऊन व्होल्टेज= ABDV= (३x१०३ x १७०) = [५.१ x१०६ ] व्हॊल्ट यॆतॆ.
[२० x१०६] व्हॊल्ट हॆ माणसाच्या ऊंचीइतक्या हवेच्या स्तंभाच्या व्होल्टेजच्या (ABDV च्या) चौपट असल्यामुळॆ बहुतॆकवॆळा वीजप्रवाह शरीरातून न जाता, शरीराच्या पृष्ठभागावरुन समांतर मार्गाने भूमिगत हॊतो. त्यामुळे शरीरावर गंभिर अशा भाजण्याच्या जखमा होतात. मनुष्य चालत असेल आणि त्याचा हात अगोदर विजेच्या मार्गात आला तर दुसरी काहीही इजा न होता कोपरापसून हात कापल्याप्रमाणे तुटून पडल्याचॆ काही अपघात प्रकरणात दिसून आले आहे. वरील सर्व मुद्दे ध्यानात घेऊन आपण योग्य ती काळजी घेतली तर आभाळातल्या विजेपासून सुरक्षितता मिळू शकते.
याच बरोबरीने काही इतर मुद्देही लक्षात घेऊन त्याची अंमलबजावणी जाणिवपुर्वक करणे आवश्यक ठरते.
जर एखाद्या उंच इमारतीजवळ असतांना विजांचा कडकडाट ऐकू आला तर ताबडतोब त्या उंच इमारतीचा आश्रय घ्यावा. आपण घरात असाल तर घरातील नळ, टेलीफोन,खिडक्या आणि विद्युत उपकरणापासून दूरच राहावे.
जर विजांचा चमचमाट होऊन अर्ध्या मिनिटाच्या आत गडगडाट ऐकू आला तर ताबडतोब मोठ्या इमारतीचा, शाळेच्या पटांगणात असाल तर शाळेचा आश्रय घ्यावा आणि पुढील आर्धा तास त्या इमारतीमध्येच निवांत बसून रहावे.
जर आपण मोटारसायकलने प्रवास करत असाल किंवा इतर कुठल्याही ट्रक्टर सारख्या उघड्या वाहनात असताना विजांचा कडकडाट ऐकू आला तर अशा वाहनापासून ताबडतोब दूर जावे आणि वर नमूद केल्याप्रमाणे चेंडू सारखे शरीराचा आकार करून उकिडवे बसावे. तेच आपण बस सारख्या बंद वाहनात असाल तर आतच बसून रहावे.तेथे आपण सुरक्षित असता हे ध्यानात घ्यावे.

हे सारे सहज लक्षात रहावे यासाठी एक कविता केली आहे. या कवितेत राणा नावाचा एक सिंहाचा छावा आपल्याला आभाळातल्या विजेपासून सुरक्षा हवी असेल तर काय काय काळजी घ्यावी ते गर्जना करुन सांगत आहे.

“छावा हा सिंहाचा” नियम शिकवतॊ सुरक्षॆचा !
सिंहाचा हा छावा, हॊता शूर आणि धीराचा !
सगळीकडॆ फिरुन माहिती गॊळा करायचा !!
नाव त्याचॆ राणा, करतॊ नियमांची गर्जना !
बाबांनॊ ! आभाळातल्या वीजॆपासून असॆल हवी सुरक्षा,
नियम साधॆ जाणा आणि पाळा,हीच करतॊ अपॆक्षा ! पुढे वाचण्यासाठी   येथे जा.

अधिक माहितीसाठी वाचा https://savadhan.wordpress.com/2010/02/25/निसर्गप्रेमी-संत/
अधिक माहितीसाठी हा दुवा पहा http://www.lightningsafety.noaa.gov

वीजतंत्री- मोफत प्रशिक्षणाचा प्रयोग-एक आढावा

पूर्वतयारी :गोष्ट आहे एप्रिल २००६ची. त्याची तयारी आधी वर्षभर चालू होती. तसं १९९५-९६ पासून या प्रयोगाचे जनक श्री.सुधाकर शेठ महाड तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांमधून वेगवेगळ्या  योजना मनात धरून त्या राबविण्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या आणि पालक-शिक्षकांच्या संपर्कात होते.दर वर्षी या विद्यालयांतील मुलांना मनाच्या श्लोकांची पुस्तिका मोफत वाटून श्लोक पाठांतर स्पर्धा आयोजन करणे,सूर्य नमस्काराचा प्रचार व्हावा व मुलांनी तंदुरुस्त रहावे म्हणून त्याना प्रोत्साहन देणे,त्यासाठी सूर्यनमस्काराचे तक्ते विनामूल्य उपलब्ध करणे, शिवथरघळ येथे समर्थ रामदास स्वामीच्या दर्शनासाठी पुण्यातील मुलांच्या सहलीचे वर्षासहलींचे नाममात्र खर्चात आयोजन करणे. असले विधायक उपक्रम सतत चालू असल्यामुळे हा वीजतंत्रीचा मोफत प्रशिक्षणाचा प्रयोग विनासायास पार पडू शकला.

जुलै २००५ ला मी सेवानिवृत झालो नि महाराष्ट्र विद्युत व्यावसायिक संघटनांच्या महासंघाचे संस्थापक सदस्य श्री सुधाकर शेठ,स्मॅश  ईलेक्ट्रिकल्स चे चितळे,अरिहंत ईलेक्ट्रिकल्स चे ओसवाल यांनी एक योजना माझ्यासमोर विचारार्थ ठेवली. “समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना मोफत “वीजतंत्रीचे व्यावसायिक मार्गदर्शन देणे” ही संकल्पना  त्यांनी माझ्यासमोर ठेवली आणि काय करावे लागेल ते ही सांगितले.

त्यानुसार वीजतंत्रीचे व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यास इच्छुक  अशा इ.९वी,१०वी च्या मुलांची निवड त्यांनी केली.त्यासाठी ६-७ महिने महाड तालुक्यातील विविध गावातील १८ माध्यमिक शाळांना भेट दिली व जवळजवळ १०० इच्छुक मुलांची यादी तयार ठेवली.हे शिबिर १५दिवसाचे शिबिर निवासी असून संर्वांगिण मोफत प्रशिक्षण देणारे असेल,अशी याची पूर्व कल्पना पालकांसह मुलांना दिलेली होती.

प्रशिक्षणासाठी प्रत्यक्ष निवड खालील निकष लावून केली.

१)     “आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील” ९वी उत्तीर्ण किंवा  १०वी अनुत्तीर्ण मुलांना प्राधान्य ,

२)     १०वी नंतर पुढील शिक्षण घेण्यास असमर्थ अशी ३५-५०%पर्यंत गुण मिळणारी मुले,

३)     विद्युत तांत्रिक विषयात रस असणारी व पुढे हा व्यवसाय करण्याची इच्छा असणारी मुले.

इकडे असे काम चालू होते त्याच दरम्यान माझी त्यासाठी वेगळीच तयारी चालू होती. महाराष्ट्र शासनाच्या तारतंत्री परवान्यासाठी असलेला अभ्यासक्रम, डोळ्यासमोर ठेवून व भारतीय विद्युत मानके,विद्युत नियमावली,विद्युत कायदा २००३, म.वि.नियामक आयोगाचे विनियमन इ.विद्युत तांत्रिक विषयातील अनेक पुस्तकांचा आधार घेत मराठीत  एक टिपणी तयार केली.

प्रशिक्षणासाठी  मराठीत केलेले हे टिपण उपरोक्त त्रयींकडे अवलोकनार्थ  दिले.सुधाकर शेठ यानी त्याच्या संगणकीय प्रती करून महासंघाच्या सदस्यांना ,विद्युतनिरीक्षकांना(वि.नि,) व महाराष्ट्र शासनाच्या सा.बां.-विद्युत- विभागाच्या मुख्य अभियंत्याना अभिप्रायार्थ पाठवून दिल्या.पुण्याचे  चितळे,ओसवाल, औरंगाबादच्या सत्या इलेक्ट्रिकल्स चे चांडक यांनी ताबडतोब काही महत्वाच्या सूचना दिल्या त्यानुसार लगेच दुरूस्ती करण्यात आली. मुख्य अभियंता विद्युत-म.शा., वि.नि. आणि इतर अनेकांनी हे टिपण उपयुक्त असल्याचे कळ्वल्यावर  या टिपणीचे रुपांतर एका हात-पुस्तिकेत झाले.यासाठी जवळ्जवळ ६महिने मला अथक कष्ट  घ्यावे लागले. ३० मार्च २००६रोजी ही पुस्तिका दक्षवीजतंत्री या नावाने  मोफत खाजगी वितरणास सिद्ध झाली. त्याच पुस्तिकेचे मुखपृष्ठ वर दिले आहे, ते पहा.

शिबिरास सुरूवात: दि.१-०४-२००६ रोजी  सकाळी ९-३०वाजता  शिवथरघळ येथे पोचलो.मुले आलेलीच होती. महाड तालुक्यातील १८ शाळातून ८० मुलांनी प्रशिक्षणासाठी येण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण प्रत्यक्ष ६० मुलांनीच अर्ज करून  नांवे नोंदवली होती.नावनोंदणी करून शिबिरास सुरुवात होण्यास सकाळ्चे १०-३० वाजले.एकूण ४८ मुले मुले प्रत्यक्षात हजर होती. महासंघाच्या चितळे,शेठ,सरदेसाई या सदस्यांनी शिबीराचे स्वरुप मुलाना समजावून सांगितले.सर्व मुलांची व माझी सुंदर मठ संस्थानाच्या प्रशस्त आवारातच राहाण्याची सोय केली होती. या निवासी शिबीराचा कालावधी १-०४-२००६ ते १५-०४-२००६ असा ठरवण्यात आला होता.रोजचा दिनक्रम अभियंता सुधाकर शेठ यानी ठरवलेला होता.

सकाळी ७ते ८-०० सूर्यनमस्कार,प्रार्थना,मनाचे श्लोक, इ.सकाळी ८-००ते ९-०० अंघोळ इ.

सकाळी ९ते १२-३०विद्युत तारतंत्रीचा अभ्यास-[दक्षवीजतंत्री पुस्तिकेवरुन ]

दुपारी १२-३० ते १-४५ भोजन ,दुपारी १-४५ ते ४.०० स्वयंअभ्यास, विश्रांती,चहा.

दुपारनंतर ४-००ते ७-००विद्युत तारतंत्रीचा अभ्यास-,आकलन चर्चा ,चहापान इ.

सायंकाळ ७-३०ते रात्री ८-३० मनोरंजनाचे कार्यक्रम,गाणी, विनोद, किस्से इ.

रात्री ८-३० ते ९ -३०भोजन,रात्री ९-३०ते पहाटे ६-०० झोप.सकाळी ६-७ उठणे,तोंड धुणे’

अशी खडतर दिनचर्या आखून त्याचे पालन प्रत्येक विद्यार्थी कसोशीने करतो किंवा नाही, हे स्वतः सुधाकर शेठ  जातीने पहात होते. शेठांच्या घराशेजारीच एक शेड उभारली असून तेथेच सूर्यनमस्कारासाठी व अभ्यासाच्या वर्गाची व्यवस्था केली होती. मुलांची जेवणाची सोय उत्तम व्हावी म्हणून स्वयंपाक पण त्याच आवारात करण्यात येत असे.

अशी सुंदर व्यवस्था शिबीरासाठी केलेली होती. १एप्रिल ते ३एप्रिल सर्व ४८ मुले सुधाकर शेठ यांनी घालून दिलेल्या नियमांचे काळजीपुर्वक पालन करत होती. प्रत्येकास दक्षवीजतंत्री ही पुस्तिका, एक वही व पेन मोफत देण्यात आला होता. रोज शिकवलेले पुस्तिकेत पाहून संध्याकाळपर्यंत लिहून काढणे सक्तीचे केले होते. पुस्तिकेतील प्रत्येक संज्ञा,आकृती  मुलांना नीट समजेल याची काळजी मी घेत होतो. दुपारच्या सत्रात सकाळ्च्या अभ्यासाची उजळ्णी केली जात असे.पण एकूण दिनक्रम हा असा खडतर स्वरूपाचा होता.

३एप्रिल ला संध्याकाळी २० मुले शिवथर (कसबे) येथे सप्ताहाचा प्रसाद व दर्शन घेण्यासाठी म्हणून सुधाकर शेठ यांची परवानगी घेवून गेली ती पुनः परत आलीच नाहीत. त्यांच्या दोन दिवसाच्या अभ्यासाचा आढावा घेतला तेव्हा असे लक्षात आले कि या मुलांना मराठी ही लिहिता येत नव्हते.मग ही मुले हे शिबीर कसे पूर्ण करू शकली असती ?आणि मराठी लिहिता न येणारी हि मुले ९वी,१०वी पर्यंत आली कशी हा प्रश्न मनात येत राहिला.                                                                                                                                                                               आता शिल्ल्क राहिली २८ मुले. कोकणातील ह्या मुलांच्या पालकांना शिक्षणाची कुठलीही पार्श्वभूमी नाही कि त्याबद्दल आस्था नाही. मुलांना मोफत शिक्षण उपलब्ध करून देऊनही त्याचा लाभ उठवण्याची इच्छा नाही.त्याला इतरही अनेक कारणे आहेत.अठराविश्वे दारिद्र्य,मुलांनी अर्थाजन करावे व परंपरागत व्यवसायात मदत करावी अशी पालकांची रास्त इच्छा,कुपोषण,अनारोग्य ही आणखी काही कारणॆ.

२८ मुलानी १५ दिवसाचे हे निवासी प्रशिक्षण शिबीर व्यवस्थित पार पाडले.काही मुलांचे सुशिक्षित पालक मुद्दाम शिबीरास भेट देण्यासाठी आले.त्याना आम्ही या मुलांना काय व कसे शिकवतोय याची माहिती दिली. त्यानी त्याविषयी समाधान व्यक्त केले. मुलांनी या व्यवसायात पडल्यास त्याना उपयोगी पडेल अशी योजना या प्रशिक्षणाची आखलेली होती हे सूज्ञ पालकांच्या ध्यानात येत होते.

मुलांचे पालक

शिवथर् घळ शिबीर

या शिबीरात प्रात्यिक्षिकाचा पण भाग होता. प्रत्यक्ष काम करताना काय काळ्जी घ्यावी याची माहिती, हत्यारे कशी हाताळावीत,शिडिचा वापर कसा करावा, अपघात होवू नये म्हणून काय काळ्जी घ्यावी,अनावधानाने अपघात झालाच तर काय करावे,  अर्थींग कसे करावे, त्याची काळ्जी कशी घ्यावी इ. आवश्यक ती सर्व माहिती मुलांना स्विचबोर्डवरच्या वायरींगसह दिली गेली. अर्थींगसाठी(भुईता) खड्डा कसा व किती आकाराचा घ्यावा, तो कसा भरावा या बाबतची माहिती अभियंता सुधाकर शेठ यांनी समक्ष दिली.त्याचॆ प्रात्यक्षिक मुलांकडून करून घेतले.त्यामुळे त्यांना या कामाबाबत आत्मविश्वास आला.  सुधाकर शेठ मुलांकडून अर्थींगचा खड्डा भरून घेत आहेत ते खालील फ़ोटोत दिसत आहे. भूईतासाठी खड्ड्यात घालावयाचे कोळसा,मीठ,मातीचे मिश्रण (3.p-shivthar येथे चित्र पहा) मुलांकडून करून घेतले.आणि खड्डा त्यांचे कडूनच बुजवून घेतला.या अनुभवाचा पुढील आयुष्यात चांगलाच  हॊणार आहे. सोबतच्या फोटोत अर्थप्लेट खड्ड्यात उभी करून  कोळसा, माती ,मीठ याचे मिश्रण ओतत असल्याचे दिसत आहे. प्रत्यक्ष व्यवहारात अर्थप्लेट कशी ठेवावी याची माहिती नसल्याने हे दाखवणे आवश्यक होते. मुलांना अर्थ टेस्ट कशी घ्यावयाची ते प्रत्यक्ष दाखवले.मेगरची कनेक्शन्स त्यांचे कडून करून घेतली.यासाठी मी एक पद्यरचना तयार केली व ती मुलांकडून पाठ करून घेतली.ती पुढे दिली आहे.

कंडक्टर व अर्थ मध्ये आय आर टेस्ट (दि.१२-०४-२००६)

वाहक आणि जमिनीमधल्या ।आवरणरोधाच्या चांचणीला ॥

तयार करूया मांडणीला ॥हो तयार करूया मांडणीला ॥

ऑफ करूनी मेनस्विचला ।फ्युज काढुया तयामधला॥

वितरण पेटितल्या फ्युजला।तारांसकट हो ठेवून दिला ॥

फ्यान,दिवे अन इतरांना । तसेच ठेवून देवूया ॥

स्विच सगळे ऑन करूनी ।  प्लग सारे ते शार्ट करूया ॥

मेगरची अर्थ आता जोडुया । सिस्टिम अर्थ च्या तारेला॥

मेनस्विचच्या फेज अग्राला। जोडून घेऊ न्युट्रलला ॥

शार्ट केलेल्या फेज न्युट्रलला । जोडू मेगरच्या एल अग्राला॥

आता फिरवू हैंडल मेगरचे।रिडींगघेण्या आयआर  चे॥

वाहक आणि जमिनीमधल्या ।आवरणरोधाच्या चांचणीचे ॥

वाहक आणि जमिनीमधल्या ।आवरणरोधाच्या चाचणीचे ॥

या प्रशिक्षणाचा समारोप दि.१५-०४-२००६ रोजी झाला.या समारोपासठी पुण्याहून इंडियन इलेक्ट्रीक कंपनीचे संचालक अनिल घोडके (श्री.घोडके यांचे नुकतेच निधन झाले) हे सहकुटुंब हजर होते.शिवथरचे सरपंच आणि इतर ग्रामस्थ ही आवर्जुन उपस्थित होते.समारोप च्या निमिताने मुलांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले कि असे जिव्हाळ्याने शिकवणारे शिक्षक आम्हाला लाभत नाहीत, आमच्या शंकाचे निरसन होत नाही, म्हणून असे विषय आम्हाला कठीण वाटतात.या वेळी काही मुलांना  बोलताना गहिवरून आले.

निष्कर्ष :२८पैकी एका मुलाची तांत्रिक आकलन शक्ती उत्तम असल्याचे समजून आले.८जणांना वीजतंत्रीचा विषय चांगला समजला असल्याचे दिसून आले. ५जणांनी वीजतंत्री या पुस्तिकेतीम अनेक व्याख्या तोंडपाठ केल्याचे दिसून आले.हे सर्व मराठीतून शिकवल्यामुळे घडून आले.३जणांनी पुढे याच विषयात अभ्यास करण्याचा मनोदय व्यक्त केला.यापैकी १जण सद्या अभियांत्रिकेचे शिक्षण घेत आहे.

सर्वांगिण मोफत प्रशिक्षण प्रतिष्ठान ची वाटचाल:      या प्रशिक्षण वर्गाचा आमचा अनुभव उत्साहवर्धक असाच होता. त्यामुळे असे मोफत प्रशिक्षणाचे वर्ग “डा.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ ,लोणेरे ता. महाड च्या विद्युत विभागाचे प्रा.तानवडे “ यांच्या सहकर्याने आणि “सर्वांगिण मोफत शिक्षण प्रतिष्ठान” शिवथरघळ पायथा, महाड यांच्या मार्गदर्शना -खाली सद्या वरंद,शिवथर इ. माध्यमिक विद्यालयातून मोजक्या प्रमाणात चालू आहेत. या कार्यात महाडचे माजी खाजदारांचे सुपुत्र मा. अरविंद सावंत यांनी मोलाचे सहकार्य दिले हे आवर्जुन नमूद करत आहे , जे  सुहृद  या कार्यत  भाग घेऊ इच्छितात त्यानी विरोपाद्वारे अवश्य संपर्क साधावा अशी नम्र विनंती.

जादा महितीसाठी हे वाचा-http://www.education.nic.in/tech/Guidelines-CDTP.pdf