Savadhan's Blog


विद्युत कायद्यातील काही व्याख्यांचा आढावा.

विद्युत कायद्यातील व्याख्या
२००३ च्या विद्युत कायद्यातील तरतुदींचा थोडक्यात आढावा .
२००३ चा विद्युत कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी भारतीय विद्युत कायदा १९१० मधील तरतुदीनुसार आणि त्याखाली तयार करण्यात आलेली १९५६ ची भारतीय विद्युत नियमावली इ.नुसार विजेच्या संदर्भातील कामकाज चालत असे. भारत स्वतंत्र झाला इ.स.१९४७ ला पण इ.स.२००३ उजाडले तरी अजूनही १९१० चाच कायदा वापरात होता. विजेची गरज वाढत चालली होती,त्याप्रमाणात मागणी पण वाढत चालली होती.ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणाबरोबरच सर्वत्र वीजपुरवठा व्हावा, विद्युत उद्योगाच्या विकासास मदत व्हावी म्हणून चालना देण्याच्या उद्देशापोटी,विद्युत निर्मिती,विद्युत वहन,विद्युत वितरण आणि विजेचा वापर व विद्युत-व्यावसायिक व्यापार याबाबतच्या कायद्याचे, नियमावलींचे एकत्रीकरण करणे आवश्यक वाटू लागले होते. त्याअनुषंगाने वीजदराची तर्कनिष्ठ पुनर्रचना करण्याचा,सब्सिडीच्या बाबतीत पारदर्शक धोरणाची खात्री देण्याचा, पर्यावरणानुकूल कार्यक्षम धोरणास प्रोत्साहन देण्याचा,केंद्रीय विद्युत प्राधिकरण गठित करण्याचा, विद्युत नियामक आयोगाच्या स्थापनेचा आणि याचिका-लवादाच्या (अपेलेट ट्रायब्युनल) आस्थापनेविषयीचे विचार प्राधान्यक्रमाने समोर आले.
विद्युत कायदा २००३ मध्ये वरील विचाराच्या अनुषंगाने भारतीय विद्युत कायदा १९१०,विद्युत (पुरवठा) अधिनियम १९४८ आणि विद्युत नियामक आयोग अधिनियम १९९८ चे एकत्रीकरण करण्यात आलेले आहे. सर्वसामान्य माणसास वीजेसंदर्भातील वेगवेगळ्या कायद्यासाठी विनाकारण इकडेतिकडे भटकावे लागू नये या उद्देशाने २००३चा कायदा साधा नि तर्कनिष्ठ करण्यात आला आहे असे दिसून येते.
२००३चा विद्युत कायदा हा एकूण १८ भागात व १८५ कलमात विभागला असून या कायद्याच्या १ल्या भागात कायद्याचे नांव आणि या कायद्यात वापरलेल्या अनेक महत्वाच्या विद्युत संकल्पनाच्या स्पष्टीकरणासाठी त्यांच्या व्याख्या देण्यात आल्या आहेत. एखाद्या शब्दसंचाचा शब्दकोषात जरी काही अर्थ दिलेला असला तरी कायदेशीरदृष्ट्या येथे दिलेल्या व्याख्येनुसारच त्या त्या बाबींचा अर्थ समजण्यात येतो हे आपण ध्यानात घेणे आवश्यक असते. कलम १ नुसार या कायद्याचे नांव ” विद्युत अधिनियम (कायदा) २००३ असे आहे.या आधीच्या कायद्याचे “भारतीय विद्युत अधिनियम १९१०” असे नाव होते. त्यातील ’भारतीय” हा शब्द जाणीवपूर्वक गाळण्यात आला आहे, हे ध्यानात घ्यावे.जो कायदा भारतीयांनी, भारतीयांसाठी, भारतीय संसदेने मंजूर केला आहे त्याला “भारतीय” असे संबोधण्याचे प्रयोजन नाही.मात्र हा कायदा “जम्मू-काश्मिर” वगळून उर्वरीत भारतासाठी लागू होईल असे ही येथे नमूद केले आहे.
कलम २ मध्ये एकूण ७७ बाबींच्या व्याख्या दिलेल्या आहेत.नमुन्य़ादाखल काही व्याख्या आपण येथे पाहणार आहोत.[कंसात कलम-उपकलम क्र.नमूद केला आहे]
[२(८)] “स्वांतसुखाय विद्युत निर्मिती यंत्र”[ कॅप्टीव जनरेटींग प्लॅंट]:- केवळ स्वतःच्या उपयोगासाठी विद्युत निर्मिती करण्याकरीता उभारलेला विद्युत जनित्र संच. एखाद्या सहकारी संस्थेने त्याच संस्थेच्या सभासदांच्या वापरासाठीच हा जनित्र संच प्रामुख्याने वीज निर्मिती करेल.अशा प्रकारच्या तरतूदीमुळेच मी याला “स्वांतसुखाय” असा शब्द योजला आहे, आणि तो जास्त समर्पक असाच आहे. पुढे ८ जून २००५ ला याबाबत एक स्पष्टीकरण देण्यात आले. वापरकर्त्या सदस्यांची जनित्र संचात किमान २६ टक्के मालकी हक्क असला पाहिजे आणि दरवर्षी एकूण उत्पादन केलेल्या विद्युत उर्जेच्या किमान ५१ टक्के वीजेचा वापर स्वतः सदस्यानी केला पाहिजे. असे असेल तरच त्यास “स्वांतसुखाय” (कॅप्टीव) समजण्यात येईल. [म्हणजेच ७४ टक्के भांडवल इतर वैध मार्गाने उभारुन आणि प्रचलित नियमानुसार ४९टक्के निर्मित-वीज वीजकंपनीस देऊन एखादी संस्था कॅप्टीव जनरेटींग प्लॅंट बाळगू शकेल अशी तरतूद त्यावेळी केलेली होती.]
२(१२) [को-जनरेशन]-सहनिर्मिती :-एकाच प्रक्रिये दरम्यान वीजनिर्मितीसह किंवा वीजनिर्मितीशिवाय एकाचवेळी दोन किंवा दोनपेक्षा अधिक ’उपयुक्त-उर्जेची’ निर्मिती होत असेल तेव्हाच या प्रक्रियेत “सहनिर्मिती” होत आहे असे समजावे.
२(१४) [कॉन्झरवेशन]-“उर्जा-संतुलन” :-विद्युत उर्जेचा संतुलित वापर व्हावा म्हणून वीजवापराची किंवा वीजपुरवठ्याची कार्यक्षमता वाढवल्यामुळे वीजेच्या खपात होणार्‍या घटीस “उर्जा-संतुलन” असे समजावे.
२(१५) ग्राहक:-ग्राहक कुणाला म्हणावे ते या व्याख्येने स्पष्ट केले आहे. शासनाने किंवा अनुज्ञाप्तीधारक कंपनीने किंवा या कायद्यानुसार वीजपुरवठा करण्याचा व्यवसाय करणार्‍या कोणाही व्यक्तीने किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यान्वये वीजपुरवठा वापरणारी व्यक्ती किंवा इतर कोणीही व्यक्ती, जिच्या संचमांडणीस वीज पुरवठा करण्यासाठी ती संचमांडणी शासनाच्या किंवा वीजकंपनीच्या वीजपुरवठासंचास जोडली असेल, अशी त्या संचमांडणीची उपभोक्ती व्यक्ती होय. [म्हणजे ती संचमांडणी ज्या व्यक्तीच्या ताब्यात असेल, जी त्याचा उपभोग घेत असेल मग ती मालक असेल किंवा भाडेकरू असेल तरी ती ग्राहक असेल असा याचा अर्थ होतो.]
२(१९)[डिस्ट्रीब्युशन सिस्टिम]-वितरण प्रणाली :- पारॆषण (ट्रॅन्समिशन) वाहकावरील वीजवितरणाचा बिंदू किंवा वीजनिर्मिती केंद्रास जोडण्याचा बिंदू आणि ग्राहक-संचमांडणीचा आरंभ बिंदू यास जोडावयाच्या इतर सुविधेसह असणारी वायर-प्रणाली होय.
[आपण रोजच्या व्यवहारात पारेषण, वीजवितरणाचा बिंदू (डिलिवरी पॉईंट्स), सुविधा (फॅसिलिटीज) या तांत्रिक शब्दांचा आवर्जुन उपयोग केला तर या व्याख्या समजण्यात अडचण येणार नाही.अन्यथा हे सर्व अगम्य आणि बोजड वाटण्याचा संभव असतो.]
२(२०)[इलेक्ट्रीक लाइन]-विद्युत वाहिनी:- कोणत्याही कारणासाठी वीज-वाहून नेण्याकरीता वापरण्यात येणारा वाहक आणि त्याला आधार देणारे खांब, मनोरा इ.सह वीज वहनासाठी येथे जोडलेली इतर सर्व यंत्रोपकरणे व सामुग्री यांचा यात समावेश होतो.
२(२२) [इलेक्ट्रीक प्लॅंट] विद्युत साधन सामग्री:- पारेषण, वितरण किंवा वीजपुरवठयासाठी वापरण्यात आलेले कोणतेही विद्युत साधन,यंत्र,उपकरण याचा यात समावेश असेल.मात्र वीजवाहिनी,विद्युत उर्जामापक,आणि ग्राहकाच्या नियंत्रणात असलेल्या इतर विद्युत उपकरणाचा यात समावेश नसेल.[म्हणजे वीज निर्मिती पासून ग्राहकाच्या वीजपुरवठ्याच्या आरंभ बिंदूपर्यंत वापरण्यात आलेल्या सर्व साधनसामग्रीचा,यंत्रोपकरणाचा यात समावेश असतो.]
२(३०)[जनरेटींग स्टेशन]-विद्युत जनन केंद्र:-आरोहित्र (स्टेपप ट्रॅन्स.),स्विचगियर,स्विचयार्ड,केबलसह वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणार्‍या / ठरवलेल्या आवारासह, इतर संबंधीत कोणतीही इमारत/वसाहत, संबंधीत जलाशय आणि अन्य सर्व (स्थापत्य,यांत्रिकी,विद्युत)इ.अनुषंगिक कामे यांचा यात समावेश असेल.मात्र उपकेंद्राचा यात समावेश नसेल.
२(४१)[लोकल अथॉरिटी]-स्थानिक प्राधिकारी:-ग्रामपंचायत,नगरपालिका,महानगरपालिका किंवा राज्य/केंद्र शासनाच्या नियंत्रणाखाली एखाद्या क्षेत्रासाठी अधिकृतपणे जबाबदारी सोपवलेला अधिकारी किंवा बंदर आयोगा सारखे कायदेशीर अधिकारी हा स्थानिक प्राधिकारी असेल.
२(४९)[पर्सन]-व्यक्ती:- कोणतीही कंपनी,सामुदायक मंडळ किंवा संघटन,व्यक्तिगत संयुक्त मंडळ किंवा न्यायालयीन नियुक्त व्यक्तीचा या व्याख्येत समावेश असेल.[ही व्याख्या काळजीपूर्वक पहा. “व्यक्ती” म्हटल्यावर आपल्या मनासमोर काय येते आणि या व्याख्येने काय अभिप्रेत आहे ते समजून घेणे आवश्यक ठरते.]
२(५०)[पॉवर सिस्टिम]-शक्ति प्रणाली:- निर्मिती केंद्र,पारेषण वाहिनी,उपकेंद्र,जोड-वाहिन्या,भार-प्रेषण उपक्रम (लोड-डिस्पॅच अक्टीविटी),मुख्य वा इतर वितरण वाहिनी,उपरी तारमार्ग,सर्वीस लाईन्स,आणि कामे यापैकी काहीसह निर्मिती,पारेषण,वितरण यांच्या विविध अंगासह वीजपुरवठा करणारी यंत्रणा यांचा यात समावेश असेल.
येथे आपण मोजक्याच काही शब्दांच्या-शब्दसमुहांच्या व्याख्यांची माहिती घेतली आहे.नमुन्यादाखल पाहिलेल्या या व्याखेवरून आपल्याला येथे दिलेल्या व्याख्या कशा व किती महत्वाच्या आहेत हे ध्यानात येईल असे वाटते.तसेच मूळ कायदा[अधिनियम] हे इंग्रजीत असल्याने एखाद्या शब्दाचा,वाक्यांशाचा काय अर्थ घ्यायचा याबाबतचे स्पष्टीकरण तेथे त्या भाषेत जे दिले असेल तेच ग्राह्य धरावे असे स्पष्ट निर्देश संशयास्पद स्थिती टाळण्यासाठी म्हणून दिलेले असतात.
मराठी ही समृद्ध भाषा आहे. तिचे शब्दवैभव जरी अफाट असले तरी रोज अनेकानेक तांत्रिक शब्दांची भर पडत आहे. त्याअनुषंगाने आपण जाणिवपूर्वक जेथेजेथे शक्य असेल तेथेतेथे सुलभ मराठी शब्द वापरण्याचा निर्धार करूया. म्हणजे तांत्रिक बाबी सुद्धा सहजतेनं आपल्याला मराठीत मांडणं सोयीचं होईल.

Advertisements
विद्युत कायद्यातील काही व्याख्यांचा आढावा. वर टिप्पण्या बंद