Savadhan's Blog


अर्धनारी नटेश्वराची जाणीव !

Posted in मराठीप्रेमी,social by savadhan on 14/06/2010
Tags: , ,

अर्धनारी नटेश्वराची जाणीव !
”स्त्रीहृदयाचा सहजभाव वात्सल्य! वात्सल्याचा रंग शुभ्र ! वात्सल्यातच प्रेम—आदी विविध भावना— शृंगरादी सगळे रस अंतर्भूत असतात–इंद्रधनुच्या रंगाप्रमाणे! पतिप्रेम ही त्यातलीच एक सर्वश्रेष्ठ आणि नैसर्गिक भावना !
पुरुषाला स्त्रीकडून धीर मिळवावा लागतो,आणि स्त्रीला पुरुषाचा आधार लागतो .म्हणून तर “अर्धनारीनटेश्वर हे देवाचे आणि त्याने निर्माण केलेल्या माणसाचे खरे —मूळ भावनिक रूप! —-मग स्त्रीपुरुषांची भांडणे ? हे मूळ रुप न ओळखल्या मुळे—! पुरुषापासून स्त्रीला धोका –? या मूळ रुपाची जाणीव नसल्यामुळे !—–शॄंगाररसाने मन फुलते—– बीभत्सरसाने करपून–जळून जाते—! ”(संदर्भ: तपस्या-सुमती क्षेत्रमाडे.)
स्त्रीपुरुषांची भांडणे कां ते सुमतीबाईनी किती स्पष्टपणे नोंदवलंय ? स्त्रीला पुरुषांपासून धोका कां ? तर हे मूळ रूप —अर्धनारीनटेश्वराचे -न ओळखल्यामुळे ! पण कॊणी ? स्त्रीनं की पुरुषानं? या मूळ रूपाची जाणीव कुणाला होत नसावी? हे मूळ भावनिक रूप का जाणवत नसावं? असले प्रश्न मनात उगीचच रुंजी घालतात ? असं कां व्हावं? कां एव्हढा कल्लॊळ ऊठावा मनात?
माझं बालपण खॆड्यात गेलेलं. बालपणी म्हणजे ५०-५५ वर्षापूर्वी रेडीऒसुद्धा नव्हता त्यावेळी मनोरंजनासाठी. गावातील संगीतप्रेमी मंडळी संध्याकाळी भजन नाहीतर भेदिक गाणी म्हणायची. रात्री उशीरापर्यंत ही गाणी चालायची.रात्रीच्या निरव शांततेत ही गाणी लांबपर्यंत ऐकायला यायची.या गाण्याच्या माध्यमातून जीवनाचं तत्त्वज्ञान सांगितलं जायचं. अशाच एका भेदिक गाण्यातील मथितार्थ मला यावेळी आठवतोय.” स्त्री आणि पुरूष ही या संसारगाड्याची दोन चाकं असून ती सारख्या अंतरावरून समान गतीने गेली तरच हा संसार सुखाचा होईल . ही दोन्हीही चाकं महत्वाची आहेत. यात कोणी श्रेष्ट नाही कोणी कनिष्ट नाही. स्त्री-पुरुष दोघेही मुक्त ,दोघेही स्वतंत्र पण दोघेही एका भावनिक बंधनात ” याद्वारे ऐकणार्याला अगदी सहजपणे संदेश दिला जायचा नि जनमानसाच्या मनावर सहजपणे कोरलाही जायचा. स्त्री आणी पुरूष याना एकमेकांची जरूरी आहे. एकमेकांची साथ आवश्यक आहे , त्याशिवाय हा संसार तरून जाता येणं अशक्य आहे. अशा प्रकारच्या भेदिक गाण्यातून त्या भावनिक रुपाची –अर्धनारीनटेश्वराची –जाणीव दोघा स्त्री-पुरुषांना होत असे. अशी अनेक जोडपी गुण्यागोविंदाने आणि उत्कटपणे आपला संसार हाकत असल्याचं माझ्या पाहण्यात आलंय.पती आणि पत्नी एकाच नाण्याच्या दोन बाजूच जणू काही.स्त्रीकडून धीर आणी पुरुषाचा आधार सुखी संसारासाठी आणि हा भवसागर तरून जाण्यासाठी आवश्यक. मला या क्षणी ”साधी माणसं” या चित्रपटातील ”ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे—–,आभाळागत माया तुझी आम्हावरी राहूदे—!!” या सुप्रसिद्ध गीताची आठवण होतेय. त्या चित्रपटातील लोहारणीचं आणि लोहराचं पती-पत्नीच्या नात्यांनं एकमेकावर निस्सिम प्रेम आहे . पण ऐरण रुपी देवाला येथे ती अथांग मायेची पखरण आमच्या संसारावर राहूदे अशी मागणी करतेय !
स्त्रीहृदयाचा सहजभाव वात्सल्य ! आपल्या बाळावर स्त्री आई म्हणून वात्सल्याचा वर्षाव करते. हे वात्सल्य निरपेक्ष असते. यात त्या बाळाकडून त्या मातेस कसलीही अपेक्षा नसते. माझं बाळ निरोगी राहावं, मोठं व्हावं, खेळावं ,बागडावं एवढीच त्या माऊलीची अपेक्षा ! त्याच्यासाठी ती स्वतःचा प्राणही पणाला लावायला तयार असते. बाळाच्या ओढीने काळोख्या रात्री अत्यंत अवघड असा कडा उतरण्याचे दिव्य हिरकणी पार पाडते , म्हणूनच हिरकणीच्या नावाने तो अवघड कडा प्रसिद्ध पावतो. श्यामची आई, विनूची आई ही वात्सल्य, करूणा,जिव्हाळा,मातृभक्ती,राष्ट्रभक्तीच्या संस्काराची प्रत्यक्ष प्रतीकं होत. माता आपल्या बाळात बाळकृष्णाच्या लीला अनुभवत असते. हे वात्सल्य, माया,भक्ती, हा उत्कट जिव्हाळा, विश्वात जेथे जेथे आढळतो ती व्यक्ती माऊलीरुपच होऊन जाते ! म्हणूनज्ञानेश्वर महाराज हे सार्या भागवतसंप्रदायी मंडळींची ज्ञानोबा-माऊली होतात. आणि म्हणूनच ” ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम” असा अखंडित घोष महाराष्ट्रभर सर्वत्र दुमदुमत असल्याचे अनुभवास येते.
वात्सल्य, माया,जिव्हाळा,भक्ती ,प्रेम अशी ही एकाच भावनेची रुपं ! आईचं वात्सल्य,भावा-बहिणींची माया,वडिलांचा जिव्हाळा, भक्तांची भक्ती,प्रियकर-प्रेयसीचं प्रेम अशी या भावनेची विविध प्रतीकं ! ही भावना बिभत्स होणार नाही याची जाणिवपूर्वक जपणूक म्हणजे अर्धनारी नटेश्वराची उपासना ! भारतीय संस्कृति मध्ये भावाबहिणीचं नातंही एक उत्कट नातं समजलं जातं ! हे नातं अत्यंत पवित्र समजलं जातं ! येथे वासनेला थारा नसतो,तर भावाचे बहिणीवर आणि बहिणीची भावावर नितांत आणि निरपेक्ष अशी माया असते. अशी ही बहिण आपल्या भावासाठी स्वतःचे मूत्रपिंड सहज दान करते असं चित्र दिसतं ! तिच बहिण ” सोनियाच्या ताटी,उजळल्या ज्योती,ओवाळते भाऊराया ,वेड्याबहिणीची वेडी ही माया” अशी साद घालते. तर भाऊ आपल्या बहिणीसाठी आपलं सर्वस्व पणाला लावायला तयार असतो , अशी कितीतरी उदाहरणं भारतीय समाजात पहायला मिळतात. अहो, एखाद्या दरोडेखोरास एखाद्या माऊलीने भाऊराया म्हणून साद घातली तर तो त्या शब्दाला जागत असे, त्या माऊलीस बहिण मानून अभय देत असे, अशी कित्येक उदाहरणं महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदली गेली आहेत.असा आहे महिमा या भावा बहिणीच्या मायेचा ! अर्धनारीनटेश्वराची अशी अनेक रुपं अनुभवायला मिळतात या भारतीय संस्कृतीमध्ये ! पण अलिकडच्या काळात पाश्चात्यांच्या प्रभावामुळे भारतीय संस्कृतीस झळ पोचलीय असं जाणवू लागलंय ! ते त्यांनी आखलेल्या खास धोरणामुळे ! दोन फ़ेब्रु.१८३५ ला ब्रिटीश पार्लमेंटमध्ये लॉर्ड(?) मेकॉले  म्हणाला होता– “I have traveled across the Length & Breadth of India & I haven’t seen a single person who is a beggar, who is a thief, such wealth I have seen in this country, such high moral values, people on such caliber that I don’t think we would ever conquer this country unless we break the back bone of this nation which is Spiritual & Cultural Heritage and Therefore , I propose that we replace her old & ancient education system, her culture for if the Indians think that all that is foreign & English is good & greater than own(?), they will lose their self esteem, their native culture and they will become that we want them a truly Dominated Nation. [Readers are requested to provide reference for this quote]” दोनशे वर्षापूर्वी आखलेल्या या धोरणाची परिणती म्हणून आज आपण संपृर्ण नितीमत्ता हरवून बसण्याच्या मार्गावर आहोत. या बदलाचं उत्तम चित्रण मालगुडी डेज मधल्या मिठाईवाला कथेत केलेलं आढळतं.पती-पत्नीचं प्रेम,बंधुप्रेम,पुत्रप्रेम,राष्ट्रभक्ती,कौटुंबिक जिव्हाळा आणि विरक्तीचे व निर्लोभी वृत्तीचे दर्शन मिठाईवाल्याच्या जीवनात दिसून येतं तर त्याचा मुलगा माली हा अमेरिकन ललनेशी मोटारीत प्रेमाचे चाळे करत असल्याचे दाखवून बिभत्सतेचं दर्शन घडते. आजच्या शिक्षण पद्धतीचं हे फार मोठं अपयश आहे असं मला वाटतं. आजच्या शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होण्याऐवजी तो रानटी बनत चालला आहे काय याचा शोध घेणं आवश्यक आहे.पत्नीच्या निधनानंतर मिठाईवाला पुढील सारं आयुष्य एकाकी आणि व्रतस्थ वृत्तीने राहून लहानग्या मुलाचे तो संगोपन करतो.समाजातल्या अशा अनेक विधुरांचे प्रतीक म्हणजे हा मिठाईवाला होय. ऊत्तम संस्कार हे भारतीय संस्कृतीचं बलस्थान आहे पण तेच कमकुवत होत आहे की काय असा प्रश्न माझ्या मनात वारंवार येतोय. आणि हेच त्या कल्लोळाचं कारण असावं !
भारतीय संस्कृति ही निस्सिम त्यागावर आधारलेली आहे. भूक लागली असता खाणं ही प्रकृति,भूक लागली नसता खाणं म्हणजे विकृती तर भूक लागली असता आपल्या ताटातील अर्धी भाकर भुकेल्याला देण्याची वृत्ती असणं ही संस्कृति असं समजलं जातं आणि ती जाणीवपूर्वक जोपासली जाते. हे तत्त्व जीवनाच्या इतर व्यवहारातही सदोदीत पाळलं जाणं म्हणजेच अर्धनारी नटेश्वराची जाणीव असणं असं तर नव्हे? होय ! मला तर असंच वाटतं ! निकोप समाजाचा आणि आनंदी जीवनाचा हाच खरा राजमार्ग होय !!

Advertisements
अर्धनारी नटेश्वराची जाणीव ! वर टिप्पण्या बंद

%d bloggers like this: