Savadhan's Blog


आपली अनुपस्थिती जोड्याने मारावे अशी—-!

आपली अनुपस्थिती जोड्याने मारावे अशी—-!
लग्नाची,बारशाची, समारंभाची निमंत्रणं येतात. कुणी प्रत्यक्ष घरी येऊन देतं,कुणी फोनवरुन देतं,तर कुणी निमंत्रण पत्रिका पाठवून समारंभास येण्याविषयी गळ घालतं.प्रत्येकाची एकेक तर्‍हा असते.मी प्रत्येकवेळी कोण कसं बोलवतंय याचं अगदी बारकाईनं निरिक्षण करत असतो.खरं म्हणजे यात कोण काय चूका करतंय हे पाहण्याचा उद्देश अजिबात नसतो. पण काही वेळेला काय होतं की अशी चूक आपण करत आहोत हे त्या यजमानाच्या गांवीही नसतं.निमंत्रण पत्रिकेचा एक नमूना कोणीतरी दाखवतो,त्यावर पसंतीचा शिक्का मारला जातो आणि ती निमंत्रण पत्रिका सगळ्यांना अगदी दिमाखात वाटली जाते.
मी हे असं गेली अनेक वर्षं पहात आलोय.बरोबर काय,चूक काय याविषयी दैनिकातून अनेकदा लेख लिहून आले आहेत.मग या चूका आपण टाळायला काय हरकत आहे? शिकल्यासवरल्या लोकांनाही जर आपण काय चूक करत आहोत हे ध्यानात येत नसेल तर इतर अडाणी लोकांना काय बोलणार ? म्हंटलं यावर आपण लिहिलं तर ? मी काही कोणी भाषा तज्ञ (तज्ज्ञ?) नाही. तरीही मला यावर लिहिण्याची इच्छा झालीच. त्याला कारण पण तसेच झाले.आजच मला एका सुप्रसिद्ध लेखकाच्या स्मृतीसमारोहाच्या निमित्ताने हॊणार्‍या सोहळ्यास येण्याविषयी निमंत्रण पत्रिका मिळाली. लगेच दुसर्‍याही एका कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका मिळाली. दोन्ही निमंत्रण पत्रिकेत एक वाक्य मला खुणावत होते ” आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे”. मला हे फारच खटकले. हे दोघेही माझी “उपस्थिती प्रार्थनीय” आहे असं म्हणत आहेत. म्हणजे माझी ’उपस्थिती’ प्रार्थना करण्याच्या लायकीची आहे. असं काहीतरी माझ्या मनात घोळू लागलं.मी मनाशीच विचार केला आणि अशा प्रकारच्या इतर शब्दांचा मागोवा घेतला.त्यात मला लगेच सापडलेले शब्द म्हणजे वंदनीय-वंदन करण्यायोग्य, चिंतनीय-चिंतन करण्यायोग्य,आदरणीय-आदर करण्यायोग्य, वगैरे,वगैरे. याविषयीचे माझे मत मी लगेच त्या समारोह आयोजकास कळवले. आणि हे ही सुचवले की आपल्यासारख्याच्या निमंत्रण पत्रिकेत अशा चूका हॊणार नाहीत याची कृपया काळजी घ्यावी,कारण इतर समाज आपलं अनुकरण करत असतो.
मग माझी “अनुपस्थिती” काय करण्यायोग्य असेल ? असा प्रश्न माझ्या मनात आला.अर्थात त्याचे उत्तर आपोआपच प्रार्थना न  करण्याच्या योग्यतेची असेल. म्हणजे कशी असेल? तर—जोड्याने मारण्याच्या योग्यतेची असेल असं उत्तर आलं. अरे बापरे !! खरं म्हणजे आपण प्रार्थना फक्त देवाची करतो, ईश्वराची करतो. सामान्य माणसाची प्रार्थना करण्याचा प्रश्नच येत नाही. पण  कुणीतरी, केव्हातरी ही टूम काढली.लोकांना वाटलं काय सुंदर शब्दयोजना आहे. आणि सगळेच लोक काहीही विचार न करता आपली उपस्थिती “प्रार्थनीय आहे ” असा अयोग्य शब्दप्रयोग करू लागले. मग येथे काय लिहिणे योग्य होईल असं मला एकाने फोन करून विचारले. मी त्यांना सुचवले—–“आपली उपस्थिती अपेक्षित आहे किंवा आपण उपस्थित रहावे ही विनंती किंवा आपल्या उपस्थितीने समारंभास शोभा येईल आणि आम्हाला अतिशय आनंद होईल.” आपल्याला काय वाटते ? आपले मत अवश्य कळवा. मराठी समृद्ध आहेच तिला आणखी समृद्ध करुया !!

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s


%d bloggers like this: