Savadhan's Blog


परदेशी विद्यापीठे व मोफत शिक्षण !

परदेशी विद्यापीठे व मोफत शिक्षण !
भारतासारख्या विकसनशील देशात आता परदेशी विद्यापीठे शिक्षणासाठी उपलब्ध होत आहेत.या विद्यापीठातून भारतातील खुल्या गटातील गुणवंत विद्यार्थ्याना सहज प्रवेश मिळेल. गुणवंत विद्यार्थ्यांवर त्यामुळे इकडे तिकडे भटकण्याची वेळ येणार नाही. आरक्षणामुळे खुल्या गटातील गुणवंत विद्यार्थ्याना हव्या त्या ठिकाणी आणि हव्या त्या विषयाच्या अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यात अनेकदा अडचणी येत होत्या त्या अडचणीचं आपोआपच निराकरण होईल.एका दृष्टीने विचार करता परदेशी विद्यापीठांचे भारतातील आगमन हे अनेक चांगल्या गोष्टीस खत पाणी घालणारे ठेरावे अशी अपेक्षा आहे.अगदी दोनच दिवसापूर्वी महाराष्ट्रातील एका विद्यापीठातील पदवीपरीक्षेच्या परीक्षा सुरू झाल्यावर, विद्यार्थ्यांनी कॉपी करण्यास परवानगी दिली नाही म्हणून परीक्षेवर दोन-तीन तास बहिष्कार घातला अशी बातमी दैनिकात झळकली होती.नंतर त्या मुलांनी परीक्षा दिली किंवा नाही याविषयी माझ्या वाचनात काही आले नाही. अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यास या परदेशी विद्यापीठांनापण तोंड द्यावे लागेल. ते अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या मागण्याना कसा प्रतिसाद देतील ? कां असल्या मागण्या त्या परदेशी विद्यापीठाकडे आमचे विद्यार्थी करणारच नाहीत.मात्र परदेशी जाणारे भारतीय विद्यार्थी तेथे जे काही नियम असतील त्यांचे काटेकोरपणे पालन करतात असं दिसून येते.
२-३ वर्षापूर्वी एका  पदवीधर (?) मुलाने एका मासिकात एक लेख लिहिला होता. लेखाचा विषय होता ” महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील एकाच अर्हतेच्या पदवीधरांना मुलाखतीसाठी बोलावताना समान निकष कां लावले जात नाहीत?” म्हणजे असं कि पुणे,मुंबई इ. विद्यापीठातील पदवीधरांना झुकतं माप दिलं जातं तर कोल्हापूर,नागपूर इ.इतर विद्यापीठातील पदवीधरांना जरा डावललं जातं.एकाच अर्हतेच्या वेगवेगळ्या विद्यापीठातील उमेदवारांना एकाच फूटपट्टीने मोजावे असं त्या लेखाचा मथितार्थ होता. म्हणजे असं कि कोल्हापूर विद्यापीठाचा बी.ई. आणि नागपूर विद्यापीठाचा बी.ई.याना एकच निकष लावून निवड करावी. एकाअर्थी त्याच म्हणणं अगदी रास्त वाटत होतं. पण त्या पदवीधराने लिहिलेला तो लेख अतिशय सुमार दर्जाचा होता.असं वाटलं कि हा पदवीधर झालाच कसा ? जो पदवीधर आपले विचार मातृभाषेत मुद्देसूद मांडू शकत नाही तो इतर भाषेत तरी काय मांडू शकणार? असा मला प्रश्न पडला.त्या अनुषंगाने मी त्या सद्‍गृहस्थाचे दुसर्‍या एका तांत्रिक विषयावरचे लेख वाचले तर तेथे ही तो आपला विषय मांडण्यात उणा पडत असल्याचे जाणवले.मग तो ज्या विद्यापीठाचा पदवीधर होता, त्या विद्यापीठाचा दर्जा या एकावरून ठरवणे कितपत योग्य ठरेल? येथे शीतावरून भाताची परीक्षा योग्य होईल का? असे प्रश्न मला सतावू लागले. कोणाला कमी किंवा कोणाला अधिक दर्जा द्यावा असा येथे अजिबात हेतू नाही.परंतु संघटनेच्या बळावर आपल्याला हवे ते हिसकावून घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागलेली आहे. त्याला ही परदेशी विद्यापीठे कसं तोंड देतील? कां ती ही प्रवाहपतीत होतील ? सामुदायिक कॉपी सारख्या प्रकरणी काय मार्ग निघेल ? खरं तर याला पुस्तके समोर ठेऊन उत्तरे लिहिण्याची मुभा देणे आणि प्रश्नांची काठिण्य पातळी वाढवणे हा उपाय ठरू शकतो. पण या उपायातील उत्तरार्धाचे पालन होईल का? हे कोण आणि कसे ठरवणार ? काळच याचं उत्तर देईल असं वाटतं.
३-४ वर्षापूर्वी आम्ही ९-१०वीच्या मुलांसाठी १५ दिवसाचा निवासी मोफत प्रशिक्षण वर्ग घेतला होता. मोफत प्रशिक्षण असूनही बहूतांश पालकवर्ग याबाबत उदासीन होता. असं कां, त्याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळचे आमचे अनुभव अतिशय उद्‍बोधक असेच आहेत.याविषयीचा आढावा घेणारा एक लेख मी   येथे  दिलेला आहे,तो पहावा. जवळजवळ ४० % मुलांना मराठी लिहिताच येत नव्हते. मग ही मुले १० वी पर्यंत कसे आली ? ९वी उत्तीर्ण या निकषावर या मुलांची निवड कारकून या पदावर करणं कितपत योग्य ठरावे ? पण सध्या असंच होत आहे असं वाटतं. २००४ साली मी महाराष्ट्र शासनाच्या सेवेत होतो.माझ्याच ऑफिसमध्ये एक एम.ए.झालेली कारकून होती.पण तिला ना मराठी येत होतं ना इंग्रजी.झकमारत तिची सगळी कामं इतर कर्मचारी करत असत. करणार काय? ही बया एम.ए.(मराठी) कशी झाली असेल ? असो.या मुलांपैकी १०वीला ४०% गुणाने उत्तीर्ण झालेल्या मुलांनी पुढे वाणिज्य शाखेतील पदवीसाठी प्रवेश घेतल्याचे आम्हाला समजले. मग या मुलांचा पदवीचा दर्जा कुठल्या प्रकारचा असेल ? अशा पदवीधरांना परदेशी विद्यापीठात कसा प्रवेश मिळू शकेल ? म्हणजे परदेशी विद्यापीठाचा सरसकट सगळ्याना फायदा होईल असं म्हणता येत नाही. शिकण्याची कुवत असूनही गरीबीमुळे ज्यांना शिक्षण घेता येत नाही,त्या मुलांना गुणवत्तेच्या जोरावर पुढील शिक्षणाची दारे आपोआप उघडतील, त्यांना शिष्यवृत्तीचा आधार मिळेल, परदेशी न जाता येथेच त्या दर्जाचे शिक्षण त्या गरीब मुलांना मिळेल.असे काही फायदे होतील असं मला वाटते. आपल्याला काय वाटते?

Advertisements
परदेशी विद्यापीठे व मोफत शिक्षण ! वर टिप्पण्या बंद

%d bloggers like this: