Savadhan's Blog


देशाच्या विद्रुपीकरणास आळा कोण घालणार ?

Posted in सामाजिक by savadhan on 16/03/2010
Tags:

देशाच्या विद्रुपीकरणास आळा कोण घालणार ?
दहा एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे.हॉलंडहून दोन मुली पुण्यात इथल्या सामाजिक गोष्टींचा, रितीरिवाजांचा अभ्यास करण्यासाठी आल्या होत्या.तशा त्या वयाने लहान म्हणजे १६-१७ वर्षाच्या होत्या. पण त्यांची सामाजिक जबाबदारीची जाण फारच चांगली होती.त्यांचा इथला अभ्यासाचा कार्यक्रम ५-६ महिन्याचाच होता.त्यांची राहण्याची व्यवस्था आमच्याच सोसायटीमध्ये केली होती.त्यांना वेळोवेळी लागणारी मदत, त्यांच्या अभ्यासक्रमांच्या अनुषंगाने इथल्या सामाजिक चालीरिती, सणवार इ. माहिती त्या अधूनमधून मला विचारत असत.अभ्यासक्रम संपता संपता त्यानी एक प्रश्नावली तयार केली होती. त्याची उत्तरे त्यांनी समाजातल्या वेगवेगळ्या लोकांकडून गोळा केली होती.त्यात त्यानी मलाही ती प्रश्नावली दिली होती.त्यातले त्यांचे प्रश्न वाचून मी सुन्न झालो होतो त्यावेळी.त्यानी विचारलेले काही प्रश्न !
१) मुंबई पुणे प्रवास आम्ही डेक्कन क्वीनने केला. डेक्कन क्वीनमधील सुशिक्षित दिसणारे प्रवाशी चहा, कॉफी घेत होती आणि त्याचे प्लॅस्टीकचे पेले गाडीच्या खिडकीतून बाहेर टाकत होते.आम्ही खिडकीतून बाहेर पाहिले तर संपूर्ण रेल्वे ट्रॅक प्लॅस्टिक पिशव्या,चहाचेपेले यांनी भरून गेलेला दिसत होता.गाडीमध्ये कचरा गॊळा करण्यासाठी टॊपली होती पण त्यात हा कचरा टाकण्याचं कष्ट फारसं कॊणी घेत नव्हतं. याचं कारण काय? आमच्या इथे लहान मुलांना स्वच्छतेची शिकवण घरी आईवडिल देत असतात तसंच शाळेत पण आमचे शिक्षक स्वच्छतेचं महत्त्व पटवून देत असतात. त्यामुळे आम्ही आमचा देश स्वच्छ कसा राहील याबाबत कायम दक्ष असतो. असं शिक्षण येथे तुम्हाला मिळत नाही का?
काय उत्तर देणार मी? असं शिक्षण मिळत असेल तर मग आपण तसे वागत कां नाही? कोठे चुकतेय आमचं?
२) या मुलींनी इथल्या महानगरपालिकेस भेट दिली.तिथल्या कामकाजाबाबत माहिती करून घेतली.आणि कचराकुंड्याबाबत काही प्रश्न विचारले. कचराकुंड्यावर कचरा विस्कटून त्यातील प्लॅस्टिकच्या पिशव्या, इतर काही मोडक्या तुटक्या वस्तू निवडून नेणार्‍या काही स्त्रिया त्यानी पाहिल्या. त्या स्त्रियाना हे काम कोणी दिले आहे, आणि त्याकामाचा त्यांना कोणी मोबदला वगैरे देते काय? त्यांच्या आरोग्याची काळजी कोण घेते ?
या प्रश्नाला पण माझ्याकडे संयुक्तिस असं काहीच उत्तर नव्हतं. त्यावेळचे महानगरपालिकेचे स.आयुक्ताबरोबर त्यांनी याविषयी चर्चा केली पण महानगरपालिकेकडून काय उत्तर मिळाले ते मला समजले नाही.
३) शहरात फिरत असताना बसस्टॉपवर, मुतार्‍यावर,वीजकंपनीच्या लाल रंगाच्या पॆट्यावर (पिलर बॉक्सेस),टेलेफोन च्या निळ्या पेट्यावर,वीजकंपनी ट्रॅन्सफॉर्मरजवळ,खांबावर, रस्त्याकडेच्या भिंतीवर असं सगळीकडे अनेक प्रकारच्या जाहिराती चिकटवलेल्या असतात. जसं–मुळव्याधीवर उपचारासाठी,संगणक प्रशिक्षणासाठी,दमा, मिरगी इ.च्या उपचारासाठी,इंटरनेटसाठीच्या जाहिराती. त्यामुळे शहराचा तोंडवळा विद्रुप होतो. पिलर बॉक्सवर,खांबावर इ.ठिकाणी लावलेली धोक्याच्या सूचना लोकांना दिसत नाही, कारण जाहिराती त्यावरच चिकटवलेल्या असतात. बसस्टॉपवर बसच्या जाण्या-येण्याचे वेळापत्रक जाहिरातीखाली गेल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. कोणीच कसे या बाबत बोलत नाही याचे आम्हाला आश्चर्य वाटते असं म्हणून, याबाबत त्यांनी खालील प्रश्न मला विचारले.
शहराचा तोंडवळा विद्रुप करणार्‍याला अशा जाहिराती लावण्यास अटकाव कां करण्यात येत नाही?
अशा जाहिराती लावण्यासाठी कोण परवानगी देते ?
जर परवानगी देण्यात येत नसेल तर ह्या “पब्लिक-प्रापर्टी” विद्रुप करणार्‍या आणि शहराच्या सौंदर्य नष्ट करणार्‍या या लोकांवर कारवाई कां करण्यात येत नाही ? जर पुण्यात असं आहे तर देशाच्या इतर भागात पण असंच असेल ना?
सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण करण्याची जबाबदारी कुठल्या अधिकार्‍याकडे आहे?
एक जबाबदार नागरिक म्हणून त्या संबंधीताला विचारण्याची तुमची वैयक्तिक काही जबाबदारी आहे का? वगैरे, वगैरे .

काय उत्तर देणार मी ? मी तर पुरता निरुत्तर झालो होतो.आज परत एकदा या सार्‍या प्रश्नांची मला आठवण झाली बसस्टॉपवर लावलेल्या जाहिराती बघून. आपल्याजवळ आहेत या प्रश्नांची उत्तरं?

गुढीपाडव्य़ानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

[देशाच्या विद्रुपीकरणास आळा कोण घालणार ? असा लेख मी ४-५ दिवसापूर्वी लिहिला आणि आज २० मार्च२०१०च्या दैनिक सकाळ- टुडे च्या पान क्र.९ वर थांब्याची उभारणी कोणासाठी? या शिर्षकाखाली सकाळने या विषयास वाचा फोडली आहे. खाली चौकटीत बसथांबे केवळ जाहिरातीसाठीच बांधले आहेत असे नमूद केले आहे. धन्यवाद सकाळ ! त्रिवार धन्यवाद !

कर्वे रस्त्यावरील अनेक बसथांब्याचा वापर केवळ जाहिरतीसाठी केला जात असल्यामुळे प्रवाशाना भर उन्हात रस्त्यावर उभे रहावे लागत आहे अशी तक्रार एका ठिकाणी केली आहे.पीएम्पी च्या काही बसथांब्यावर जहिरातीचे बोर्ड लावले आहेत त्यापासून महानगरपालिकेस उत्पन्न मिळते. या जाहिरातीबद्दल आपला काहिच आक्षेप नाही. पण बसथांब्यावर ज्या जाहिराती चिकटवून बसथांबा अगदी ओंगळ आणि विद्रुप  केला जात आहे, त्याला आक्षेप आहे.अशा जाहिराती चिकटवणार्‍या लोकांवर प्रशासनाने कारवाई करणे अपेक्षित आहे. ]
Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s


%d bloggers like this: