Savadhan's Blog


१.खडतर आणि कष्टदायक साधना-विपश्यना !

विपश्यना साधना ही अत्यंत खडतर अशी ध्यान साधना आहे. मनाचा निग्रह करूनच या साधनेस सुरुवात करावी लागते. साधनेस सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला काय करायचे आहे याची निश्चित माहिती दिली जाते. दिलेल्या सूचनांचे अत्यंत कठोरपणे पालन केल्यास त्यात आपली योग्य दिशेने प्रगती होत राहते. प्रत्येक पायरीवर प्रत्यक्ष अनुभूती घेत पुढची वाटचाल करत राहणे हेच या साधनेत अपेक्षित असते. अडथळा आल्यास सहाय्यक आचार्य मार्गदर्शनासाठी असतात. जाणीवपूर्वक आणि आळस न करता त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेणे आवश्यक असते.

साधना स्थळी आगमन होताच आपली नावनोंदणी करून, आपल्याजवळील मूल्यवान वस्तू ,ताईत, गंडे,दोरे,जे असेल ते तेथील एका पिशवीत भरून व्यवस्थापकाकडे जमा केल्यावर,आपल्याला आपला खोली क्रमांक व त्याची चावी दिली जाते. सायंकाळी ठराविक  वेळी साधनेची माहिती दिल्यावर १० दिवसाच्या मौनास सुरूवात होते. हावभाव किंवा करपल्लवीच्या माध्यमाने किंवा दृष्टीने  देखिल एकमेकाशी संपर्क साधण्यास संपूर्ण मनाई असते.दृष्टी जमिनेकडे ठेऊनच मर्यादित क्षेत्रातच   चालायचे असे बंधन असते. शीलाचे पालन अनिवार्य असते.शील म्हणजे मौन,अहिंसा,ब्रह्मचर्य यांचे कडक पालन करणे होय. तंबाखू बिडी,इ. वस्तुंचे सेवन  वर्ज्य असते, स्त्री व पुरुष साधकाने पुर्ण अंग झाकले जाईल असे कपडे वापरणे आवश्यक असते. तसेच साधना काळात कुठलाही जप,भजन,व्यायाम इ.सर्व अन्य बाबी करण्यास पूर्णता बंदी असते. साधकाने केवळ याच साधनेचा अभ्यास करावयाचा असतो. रोज ४ सत्रात ही साधना केली जाते. २तास+ ३तास+ ४तास+ ३तास अशी एकूण १२ तासाची ध्यानासाठीची बैठक सिध्द करावयाची असते. पहिल्या दिवशी जेवणानंतर रात्री ९ वाजता झोपून दुसरे दिवशी पहाटे ४वा उठावयाचे असते. येथूनच साधनेस खरी सुरूवात होत असते.शील,समाधी,प्रज्ञा असे तीन मुख्य टप्पे या साधनेत असतात. आपण या १० दिवसात समाधी च्या १ल्या पायरीपर्यंत प्रगती करू शकतो, असे मला वाटते.

अगदी पहिल्या दिवसापासून पुढे रोज ११दिवस पहाटे ४ते ४-३० यावेळात उठून हात,पाय ,तोंड धुवून ध्यानास तयार हॊणे अपेक्षित असते. पहाटे ४.०० वाजता आपल्याला जाग यावी म्हणून,आपल्या खोलीच्या दाराशी स्वयंसेवक साधक येऊन अत्यंत मंजुळ आवाजात घंटी वाजवून साद घालतो, साधकाने लगेच उठून ध्यानासाठी तयार व्हावयाचे असते.

रोजचा दिनक्रम प्रमुख आचार्य प.पू.सत्यनारायण गोयंका यांनी ठरवून दिल्याप्रमाणे आखलेला असतो. साधकाने त्याचे कठोरपणे पालन करणे अपेक्षित असते. प्रत्येक ध्यानाचे वेळी ध्यान कसे करावे ,कसे बसावे,कुठली क्रिया करावी याची माहिती प.पू. गोयंका यांच्या आवाजात क्यासेट किंवा व्हिसीडी च्या द्वारे दिली जात असते. प्रत्येक वेळी “तेरा मंगल—–तेरा मंगल—-तेरा मंगल होय रे——-“ आणि  “ भवतु सब्ब मंगलं—, भवतु सब्ब मंगलं—, भवतू—– सब्ब— मंगलं— “ असा त्रिवार घोष होतो त्यास आपण “ साधू–,साधू—- साधू — “ असा प्रतिसाद देत विनम्र भावाने ध्यानाची सांगता होते. हा दिनक्रम खाली दिल्याप्रमाणे असतो.

पहाटे ४ते४.३० जागरण,पहाटे ४-३० ते ६-३० ध्यान,  ६-३० ते ८ न्याहरी, चहापान, विश्रांती

सकाळी ८ ते ११ ध्यान. ११ ते दुपारी १ विश्रांती, दुपारी १२ पुर्वी भोजन,

दुपारी १ ते ५ ध्यान, ५ ते ६ न्याहरी -फक्त नवीन साधकासाठी, सरबत- फक्त ज्येष्ठ साधकांसाठी,

सायंकाळी ६ते७ ध्यान ,रात्री७ते८.३० प्रवचन, रात्री८.३० ते ९ ध्यान,

रात्री ९.३० पर्यंत ज्याना अडचणी असतील त्यांचॆ शंकासमाधान,इतरांनी रात्री ९ते पहाटे ४ विश्रांती.

याप्रमाणे हा दिनक्रम पाळून साधकास या साधनेचे सर्व लाभ मिळवणे शक्य असते. पहिले दोन दिवस “आनापाना” ध्यान क्रिया शिकवली जाते. या ध्यानाचे सूत्र एका श्लोकाने सांगितले जाते ते असे—

“आतेजाते सांसपर रहे निरंतर ध्यान । कर्मके बंधन टुटे होये परम कल्याण ॥ . ध्यानकक्षाच्या  प्रवेशद्वारा जवळ्च सूचना फलकावर हे सर्व लिहिलेले असते. रोजची कार्यक्रम-पत्रिका तेथे लावलेली असते. “ आनापाना ध्याना मध्ये साधकाने नाक आणि वरचा ओठ येथे होणा-या संवेदनेवर लक्ष केंद्रित करावयाचे असते,मात्र त्या संवदनेप्रति समत्व भाव ठेवावयाचा असतो.हे कसे साधायचे ते प्रवचनातून सांगितले जाते “आनापाना” ध्याना नंतर सायंकाळच्या प्रवचनात आधी,”अधिष्ठानाचे महत्व ” सांगून  “विपश्यना ध्यान” कसे करावयाचे हे शिकवले जाते. त्यात हळूहळू जशी प्रगती होईल तसतसे साधकास मन सूक्ष्म कसे करत जायचे हे शिकवले जाते.प्रत्यक्ष अनुभूतीस येथे खूपच महत्व असते. ८दिवस विपश्यना साधना केल्यावर, मौनाची समाप्ती होते. शेवटच्या दिवशी मैत्री साधनेचे महत्व विशद केले जाते त्यास “मित्त “ असे संबोधले जाते.मौन संपले तरी ध्यानकक्षात मौन पाळावयाचे असते,तसेच हा परीसर सोडण्याचीही अनुमती नसते. या दिवशी आपण जमा केलेल्या मौल्यवान वस्तु परत घेता येतात.इतर व्यवहार पूर्ण करावे लागतात.

१ला दिवस शिबीरास उपस्थित राहून पुढे १० दिवस विपश्यना साधना शिकून १२व्या दिवशी पहाटे ४.३०ते ६.३० ध्यान केल्यावर सकाळी ७ पर्य़ंत न्याहरी करून व खोलीची चावी परत करून आपण अत्यंत प्रसन्न मनाने शिबीराचे आवार सोडू शकतो.

सर्वांचे कल्याण होवो ! सर्वांचे कल्याण होवो!! सर्वांचे कल्याण हो—–वो—-!!!हा मंत्र मनात जपतजपत!!

हा लेख अवश्य वाचा https://savadhan.wordpress.com/2010/02/20/३-विपश्यना-एक-आनंददायी-अन/

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s


%d bloggers like this: