Savadhan's Blog


वीजतंत्री- मोफत प्रशिक्षणाचा प्रयोग-एक आढावा

पूर्वतयारी :गोष्ट आहे एप्रिल २००६ची. त्याची तयारी आधी वर्षभर चालू होती. तसं १९९५-९६ पासून या प्रयोगाचे जनक श्री.सुधाकर शेठ महाड तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांमधून वेगवेगळ्या  योजना मनात धरून त्या राबविण्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या आणि पालक-शिक्षकांच्या संपर्कात होते.दर वर्षी या विद्यालयांतील मुलांना मनाच्या श्लोकांची पुस्तिका मोफत वाटून श्लोक पाठांतर स्पर्धा आयोजन करणे,सूर्य नमस्काराचा प्रचार व्हावा व मुलांनी तंदुरुस्त रहावे म्हणून त्याना प्रोत्साहन देणे,त्यासाठी सूर्यनमस्काराचे तक्ते विनामूल्य उपलब्ध करणे, शिवथरघळ येथे समर्थ रामदास स्वामीच्या दर्शनासाठी पुण्यातील मुलांच्या सहलीचे वर्षासहलींचे नाममात्र खर्चात आयोजन करणे. असले विधायक उपक्रम सतत चालू असल्यामुळे हा वीजतंत्रीचा मोफत प्रशिक्षणाचा प्रयोग विनासायास पार पडू शकला.

जुलै २००५ ला मी सेवानिवृत झालो नि महाराष्ट्र विद्युत व्यावसायिक संघटनांच्या महासंघाचे संस्थापक सदस्य श्री सुधाकर शेठ,स्मॅश  ईलेक्ट्रिकल्स चे चितळे,अरिहंत ईलेक्ट्रिकल्स चे ओसवाल यांनी एक योजना माझ्यासमोर विचारार्थ ठेवली. “समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना मोफत “वीजतंत्रीचे व्यावसायिक मार्गदर्शन देणे” ही संकल्पना  त्यांनी माझ्यासमोर ठेवली आणि काय करावे लागेल ते ही सांगितले.

त्यानुसार वीजतंत्रीचे व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यास इच्छुक  अशा इ.९वी,१०वी च्या मुलांची निवड त्यांनी केली.त्यासाठी ६-७ महिने महाड तालुक्यातील विविध गावातील १८ माध्यमिक शाळांना भेट दिली व जवळजवळ १०० इच्छुक मुलांची यादी तयार ठेवली.हे शिबिर १५दिवसाचे शिबिर निवासी असून संर्वांगिण मोफत प्रशिक्षण देणारे असेल,अशी याची पूर्व कल्पना पालकांसह मुलांना दिलेली होती.

प्रशिक्षणासाठी प्रत्यक्ष निवड खालील निकष लावून केली.

१)     “आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील” ९वी उत्तीर्ण किंवा  १०वी अनुत्तीर्ण मुलांना प्राधान्य ,

२)     १०वी नंतर पुढील शिक्षण घेण्यास असमर्थ अशी ३५-५०%पर्यंत गुण मिळणारी मुले,

३)     विद्युत तांत्रिक विषयात रस असणारी व पुढे हा व्यवसाय करण्याची इच्छा असणारी मुले.

इकडे असे काम चालू होते त्याच दरम्यान माझी त्यासाठी वेगळीच तयारी चालू होती. महाराष्ट्र शासनाच्या तारतंत्री परवान्यासाठी असलेला अभ्यासक्रम, डोळ्यासमोर ठेवून व भारतीय विद्युत मानके,विद्युत नियमावली,विद्युत कायदा २००३, म.वि.नियामक आयोगाचे विनियमन इ.विद्युत तांत्रिक विषयातील अनेक पुस्तकांचा आधार घेत मराठीत  एक टिपणी तयार केली.

प्रशिक्षणासाठी  मराठीत केलेले हे टिपण उपरोक्त त्रयींकडे अवलोकनार्थ  दिले.सुधाकर शेठ यानी त्याच्या संगणकीय प्रती करून महासंघाच्या सदस्यांना ,विद्युतनिरीक्षकांना(वि.नि,) व महाराष्ट्र शासनाच्या सा.बां.-विद्युत- विभागाच्या मुख्य अभियंत्याना अभिप्रायार्थ पाठवून दिल्या.पुण्याचे  चितळे,ओसवाल, औरंगाबादच्या सत्या इलेक्ट्रिकल्स चे चांडक यांनी ताबडतोब काही महत्वाच्या सूचना दिल्या त्यानुसार लगेच दुरूस्ती करण्यात आली. मुख्य अभियंता विद्युत-म.शा., वि.नि. आणि इतर अनेकांनी हे टिपण उपयुक्त असल्याचे कळ्वल्यावर  या टिपणीचे रुपांतर एका हात-पुस्तिकेत झाले.यासाठी जवळ्जवळ ६महिने मला अथक कष्ट  घ्यावे लागले. ३० मार्च २००६रोजी ही पुस्तिका दक्षवीजतंत्री या नावाने  मोफत खाजगी वितरणास सिद्ध झाली. त्याच पुस्तिकेचे मुखपृष्ठ वर दिले आहे, ते पहा.

शिबिरास सुरूवात: दि.१-०४-२००६ रोजी  सकाळी ९-३०वाजता  शिवथरघळ येथे पोचलो.मुले आलेलीच होती. महाड तालुक्यातील १८ शाळातून ८० मुलांनी प्रशिक्षणासाठी येण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण प्रत्यक्ष ६० मुलांनीच अर्ज करून  नांवे नोंदवली होती.नावनोंदणी करून शिबिरास सुरुवात होण्यास सकाळ्चे १०-३० वाजले.एकूण ४८ मुले मुले प्रत्यक्षात हजर होती. महासंघाच्या चितळे,शेठ,सरदेसाई या सदस्यांनी शिबीराचे स्वरुप मुलाना समजावून सांगितले.सर्व मुलांची व माझी सुंदर मठ संस्थानाच्या प्रशस्त आवारातच राहाण्याची सोय केली होती. या निवासी शिबीराचा कालावधी १-०४-२००६ ते १५-०४-२००६ असा ठरवण्यात आला होता.रोजचा दिनक्रम अभियंता सुधाकर शेठ यानी ठरवलेला होता.

सकाळी ७ते ८-०० सूर्यनमस्कार,प्रार्थना,मनाचे श्लोक, इ.सकाळी ८-००ते ९-०० अंघोळ इ.

सकाळी ९ते १२-३०विद्युत तारतंत्रीचा अभ्यास-[दक्षवीजतंत्री पुस्तिकेवरुन ]

दुपारी १२-३० ते १-४५ भोजन ,दुपारी १-४५ ते ४.०० स्वयंअभ्यास, विश्रांती,चहा.

दुपारनंतर ४-००ते ७-००विद्युत तारतंत्रीचा अभ्यास-,आकलन चर्चा ,चहापान इ.

सायंकाळ ७-३०ते रात्री ८-३० मनोरंजनाचे कार्यक्रम,गाणी, विनोद, किस्से इ.

रात्री ८-३० ते ९ -३०भोजन,रात्री ९-३०ते पहाटे ६-०० झोप.सकाळी ६-७ उठणे,तोंड धुणे’

अशी खडतर दिनचर्या आखून त्याचे पालन प्रत्येक विद्यार्थी कसोशीने करतो किंवा नाही, हे स्वतः सुधाकर शेठ  जातीने पहात होते. शेठांच्या घराशेजारीच एक शेड उभारली असून तेथेच सूर्यनमस्कारासाठी व अभ्यासाच्या वर्गाची व्यवस्था केली होती. मुलांची जेवणाची सोय उत्तम व्हावी म्हणून स्वयंपाक पण त्याच आवारात करण्यात येत असे.

अशी सुंदर व्यवस्था शिबीरासाठी केलेली होती. १एप्रिल ते ३एप्रिल सर्व ४८ मुले सुधाकर शेठ यांनी घालून दिलेल्या नियमांचे काळजीपुर्वक पालन करत होती. प्रत्येकास दक्षवीजतंत्री ही पुस्तिका, एक वही व पेन मोफत देण्यात आला होता. रोज शिकवलेले पुस्तिकेत पाहून संध्याकाळपर्यंत लिहून काढणे सक्तीचे केले होते. पुस्तिकेतील प्रत्येक संज्ञा,आकृती  मुलांना नीट समजेल याची काळजी मी घेत होतो. दुपारच्या सत्रात सकाळ्च्या अभ्यासाची उजळ्णी केली जात असे.पण एकूण दिनक्रम हा असा खडतर स्वरूपाचा होता.

३एप्रिल ला संध्याकाळी २० मुले शिवथर (कसबे) येथे सप्ताहाचा प्रसाद व दर्शन घेण्यासाठी म्हणून सुधाकर शेठ यांची परवानगी घेवून गेली ती पुनः परत आलीच नाहीत. त्यांच्या दोन दिवसाच्या अभ्यासाचा आढावा घेतला तेव्हा असे लक्षात आले कि या मुलांना मराठी ही लिहिता येत नव्हते.मग ही मुले हे शिबीर कसे पूर्ण करू शकली असती ?आणि मराठी लिहिता न येणारी हि मुले ९वी,१०वी पर्यंत आली कशी हा प्रश्न मनात येत राहिला.                                                                                                                                                                               आता शिल्ल्क राहिली २८ मुले. कोकणातील ह्या मुलांच्या पालकांना शिक्षणाची कुठलीही पार्श्वभूमी नाही कि त्याबद्दल आस्था नाही. मुलांना मोफत शिक्षण उपलब्ध करून देऊनही त्याचा लाभ उठवण्याची इच्छा नाही.त्याला इतरही अनेक कारणे आहेत.अठराविश्वे दारिद्र्य,मुलांनी अर्थाजन करावे व परंपरागत व्यवसायात मदत करावी अशी पालकांची रास्त इच्छा,कुपोषण,अनारोग्य ही आणखी काही कारणॆ.

२८ मुलानी १५ दिवसाचे हे निवासी प्रशिक्षण शिबीर व्यवस्थित पार पाडले.काही मुलांचे सुशिक्षित पालक मुद्दाम शिबीरास भेट देण्यासाठी आले.त्याना आम्ही या मुलांना काय व कसे शिकवतोय याची माहिती दिली. त्यानी त्याविषयी समाधान व्यक्त केले. मुलांनी या व्यवसायात पडल्यास त्याना उपयोगी पडेल अशी योजना या प्रशिक्षणाची आखलेली होती हे सूज्ञ पालकांच्या ध्यानात येत होते.

मुलांचे पालक

शिवथर् घळ शिबीर

या शिबीरात प्रात्यिक्षिकाचा पण भाग होता. प्रत्यक्ष काम करताना काय काळ्जी घ्यावी याची माहिती, हत्यारे कशी हाताळावीत,शिडिचा वापर कसा करावा, अपघात होवू नये म्हणून काय काळ्जी घ्यावी,अनावधानाने अपघात झालाच तर काय करावे,  अर्थींग कसे करावे, त्याची काळ्जी कशी घ्यावी इ. आवश्यक ती सर्व माहिती मुलांना स्विचबोर्डवरच्या वायरींगसह दिली गेली. अर्थींगसाठी(भुईता) खड्डा कसा व किती आकाराचा घ्यावा, तो कसा भरावा या बाबतची माहिती अभियंता सुधाकर शेठ यांनी समक्ष दिली.त्याचॆ प्रात्यक्षिक मुलांकडून करून घेतले.त्यामुळे त्यांना या कामाबाबत आत्मविश्वास आला.  सुधाकर शेठ मुलांकडून अर्थींगचा खड्डा भरून घेत आहेत ते खालील फ़ोटोत दिसत आहे. भूईतासाठी खड्ड्यात घालावयाचे कोळसा,मीठ,मातीचे मिश्रण (3.p-shivthar येथे चित्र पहा) मुलांकडून करून घेतले.आणि खड्डा त्यांचे कडूनच बुजवून घेतला.या अनुभवाचा पुढील आयुष्यात चांगलाच  हॊणार आहे. सोबतच्या फोटोत अर्थप्लेट खड्ड्यात उभी करून  कोळसा, माती ,मीठ याचे मिश्रण ओतत असल्याचे दिसत आहे. प्रत्यक्ष व्यवहारात अर्थप्लेट कशी ठेवावी याची माहिती नसल्याने हे दाखवणे आवश्यक होते. मुलांना अर्थ टेस्ट कशी घ्यावयाची ते प्रत्यक्ष दाखवले.मेगरची कनेक्शन्स त्यांचे कडून करून घेतली.यासाठी मी एक पद्यरचना तयार केली व ती मुलांकडून पाठ करून घेतली.ती पुढे दिली आहे.

कंडक्टर व अर्थ मध्ये आय आर टेस्ट (दि.१२-०४-२००६)

वाहक आणि जमिनीमधल्या ।आवरणरोधाच्या चांचणीला ॥

तयार करूया मांडणीला ॥हो तयार करूया मांडणीला ॥

ऑफ करूनी मेनस्विचला ।फ्युज काढुया तयामधला॥

वितरण पेटितल्या फ्युजला।तारांसकट हो ठेवून दिला ॥

फ्यान,दिवे अन इतरांना । तसेच ठेवून देवूया ॥

स्विच सगळे ऑन करूनी ।  प्लग सारे ते शार्ट करूया ॥

मेगरची अर्थ आता जोडुया । सिस्टिम अर्थ च्या तारेला॥

मेनस्विचच्या फेज अग्राला। जोडून घेऊ न्युट्रलला ॥

शार्ट केलेल्या फेज न्युट्रलला । जोडू मेगरच्या एल अग्राला॥

आता फिरवू हैंडल मेगरचे।रिडींगघेण्या आयआर  चे॥

वाहक आणि जमिनीमधल्या ।आवरणरोधाच्या चांचणीचे ॥

वाहक आणि जमिनीमधल्या ।आवरणरोधाच्या चाचणीचे ॥

या प्रशिक्षणाचा समारोप दि.१५-०४-२००६ रोजी झाला.या समारोपासठी पुण्याहून इंडियन इलेक्ट्रीक कंपनीचे संचालक अनिल घोडके (श्री.घोडके यांचे नुकतेच निधन झाले) हे सहकुटुंब हजर होते.शिवथरचे सरपंच आणि इतर ग्रामस्थ ही आवर्जुन उपस्थित होते.समारोप च्या निमिताने मुलांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले कि असे जिव्हाळ्याने शिकवणारे शिक्षक आम्हाला लाभत नाहीत, आमच्या शंकाचे निरसन होत नाही, म्हणून असे विषय आम्हाला कठीण वाटतात.या वेळी काही मुलांना  बोलताना गहिवरून आले.

निष्कर्ष :२८पैकी एका मुलाची तांत्रिक आकलन शक्ती उत्तम असल्याचे समजून आले.८जणांना वीजतंत्रीचा विषय चांगला समजला असल्याचे दिसून आले. ५जणांनी वीजतंत्री या पुस्तिकेतीम अनेक व्याख्या तोंडपाठ केल्याचे दिसून आले.हे सर्व मराठीतून शिकवल्यामुळे घडून आले.३जणांनी पुढे याच विषयात अभ्यास करण्याचा मनोदय व्यक्त केला.यापैकी १जण सद्या अभियांत्रिकेचे शिक्षण घेत आहे.

सर्वांगिण मोफत प्रशिक्षण प्रतिष्ठान ची वाटचाल:      या प्रशिक्षण वर्गाचा आमचा अनुभव उत्साहवर्धक असाच होता. त्यामुळे असे मोफत प्रशिक्षणाचे वर्ग “डा.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ ,लोणेरे ता. महाड च्या विद्युत विभागाचे प्रा.तानवडे “ यांच्या सहकर्याने आणि “सर्वांगिण मोफत शिक्षण प्रतिष्ठान” शिवथरघळ पायथा, महाड यांच्या मार्गदर्शना -खाली सद्या वरंद,शिवथर इ. माध्यमिक विद्यालयातून मोजक्या प्रमाणात चालू आहेत. या कार्यात महाडचे माजी खाजदारांचे सुपुत्र मा. अरविंद सावंत यांनी मोलाचे सहकार्य दिले हे आवर्जुन नमूद करत आहे , जे  सुहृद  या कार्यत  भाग घेऊ इच्छितात त्यानी विरोपाद्वारे अवश्य संपर्क साधावा अशी नम्र विनंती.

जादा महितीसाठी हे वाचा-http://www.education.nic.in/tech/Guidelines-CDTP.pdf

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s


%d bloggers like this: